Friday, 6 June 2014

पाकिस्तानचा मराठी हेर!
- - - - - - - - - - - - - - - - - -
देशात अलिकडच्या काळात पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे हेर सापडण्याच्या एक-दोन प्रकार घटना घडल्या आहेत. पण नव्वदच्या दशकात अशा काही घटनांचा मागमूसही नव्हता. त्याकाळात चक्क एक पाकिस्तानी हेर गुप्तचर विभागाच्या हाती लागला. हा हेर मराठी आणि चक्का पुणेरी होता. त्यामुळे महाराष्टÑ पोलिसांची अक्षरश: झोप उडाली. कासारवाडीत १८ वर्षांपूर्वी घडलेली ही घटना ना या हेराचे कु टुंबिय विसरले, ना त्याचे नातलग. एवढेच नव्हे, तर स्थानिक पोलिसांच्या गुप्तवार्ता शाख़ेत अद्यापही या प्रकरणाची फाइल संदर्भासाठी ठेवण्यात आली आहे.
कपील कांबळे हे या हेराचे (?) नाव. कांबळे दांपत्याचा तो मुलगा. जेमतेम विशीतला. एके दिवशी सकाळी कामाला जातो म्हणून तो घराबाहेर पडला आणि बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी मित्रांकडे- नातलगांकडे चौकशी केली. कपीलचा डॉक्टर भाऊ संदेश यानेही त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला. पण, व्यर्थ. कपीलचा तपास काही लागला नाही. अखेर, त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी बिनतारी संदेश वाहन यंत्रणेद्वारे राज्यभर ही माहिती कळवली. रागाने तो कुठेतरी गेला असेल; थोड्या दिवसांनी परत येईल या आशेवर त्याचे कुटुंबिय होते. ३० मार्च १९९५ चा तो दिवस होता. कपीलच्या काळजीने मन:स्वास्थ्य हरवलेले त्याचे कुटुंबिय त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. त्यावेळी बाहेरून कोणीतरी दार वाजवले. कपिलच्या आईने दार उघडले. दारात गुप्तचर विभागाचे पोलीस उभे असल्याचे पाहून कांबळे कुटुंबियांचे अवसान गळाले. साहजिकच आहे. कोणत्याही मध्यम कुटुंबातील घराच्या दारात पोलीस उभे राहीले तर लोक घाबरणारच ना! तसंच झालं कांबळे कुटुंबियांचं. काहीतरी गंभीर घडलेय एवढेच कांबळे कुटुंबियांनी ताडले. कपिलला सुख़रूप ठेव असे ईश्वराला साकडे घालून ते पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेले.
गुप्तचर विभागाचे पोलीस खूप बारीकसारीक माहिती विचारत होते. त्याचे कारणही ते नेमकेपणाने सांगत नव्हते. त्यामुळे कपिलचे आई -वडिल अधिक काळजीत पडले. योग्यवेळी तुमच्याशी संपर्क साधू असे सांगून हे पोलीस निघून गेले. त्याच्या दुसºयाच दिवशी एका वृत्तपत्रात आलेली बातमी वाचून कांबळे कुटुंबीय हैराण झाले. त्या बातमीनुसार कपिल सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात होता. आपण पाकिस्तानी गुप्तचर विभागाचे (आयएसआय) हस्तक असून त्या संघटनेतील अन्य हेरांसमवेत आपण नागपूरला काही संवेदनशील ठिकाणी गेलो असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली होती. मुळात कपिल काश्मीर पोलिसांच्या हाती लागला होता. तेथे त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली होती. पुण्याचा युवक चक्क पाकिस्तानचा हेर म्हणून पकडला गेल्याचे समजल्यावर पोलीस दलात ख़ळबळ उडाली. या प्रकरणाची तपशीलवार माहिती काढा असे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्यावर नागपूर पोलिसांनी तपासासाठी त्याला ताब्यात घेतले. आपला मुलगा पाकिस्तानचा हेर कसा झाला? हेच कांबळे कुटुंबियांना समजेना. अख़ेर, कपिलचा भाऊ नागपूरला गेला आणि सगळया घटनेचा उलगडा झाला.
कपिल अभ्यासात चांगला हुशार होता.पण काहीसा लहरीही होता. थापा मारायची त्याला सवय होती. सणसवाडी येथील एका कंपनीत तो नोकरीस लागला. त्याच्या कामावर वरिष्ठ खुष होते. पण त्याची सिगारेट ओढायची सवय काही त्यांना आवडत नव्हती. त्याबाबत ते वारंवार त्याला समजावून सांगत. त्यामुळे कपिलने नोकरी सोडली. पण, ही बाब त्याने घरच्यांपासून लपवून ठेवली. पुढे एक महिनाभर तो घरून डबा घेऊन कामावर जाण्याच्या निमित्ताने बाहेर पडायचा आणि दिवसभर कुठेही भटकून रात्री घरी जायचा. अर्थात ही बाबही त्याच्या पालकांना तो बेपत्ता झाल्यानंतर कळाली. ते कंपनीत त्याची चौकशी करायला गेले, तेव्हा कपिल महिनाभरापासून कामावर येत नसल्याचे समजले आणि त्यांना चांगलाचा धक्का बसला. मध्यंतरीच्या काळात मित्रांसोबत पार्ट्या करायचे व्यसन त्याला जडले होते. त्यासाठी तो निरनिरा़ळया लोकांकडून निरनिरा़ळया थापा मारून पैसे जमवायचा. त्याच्या नातलगांनी त्याच्या आई वडिलांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर कपिलचे हे उद्योग उजेडात आले.
कपिल बेपत्ता झाला त्या दिवशी तो पुण्यातून निघाला. काहीजणांकडून त्याने पैसे उसने घेतले होते. फिरत फिरत तो काश्मिरला पोचला. मग त्याच्या मनात काय आले कोणास ठाऊक? तो दोडा जिल्ह्याच्या पोलीस मुख़्यालयात गेला व आयएसआयचा एजंट असल्याचे सांगून तेथे आत्मसमर्पण केले. तेथे पोलिसांनाही त्याने चार निरनिराळी नावे सांगून संभ्रमात टाकले होते. त्याने नागपूरला काही संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचे जबाबात सांगितल्याने काश्मिर पोलिसांनी त्याला नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तेथे तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. कपिल कोणत्याही गुप्तहेर संघटनेचा कधीही सदस्य नव्हता. केवळ काहीतरी जगावेगळे करण्याची हौस आणि थापा मारण्याची सवय त्याला नडली. त्यातूनच काश्मिर पोलिसांना त्याने आयएसआयचा हेर असल्याची थाप मारली. ते नीट ठसवण्यासाठी त्याने इतर बाता मारल्या आणि पोलीस चक्रावून गेले. त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे त्याची सविस्तर माहिती दिल्यावर आणि पोलिसांनी कपिलकडे बारकाईने तपास केल्यावर या बाबीवर शिक्कामोर्तब झाली आणि पोलिसांची डोकेदुख़ी दूर झाली.

No comments:

Post a Comment