Friday, 6 June 2014

प्रभू...
- - - -

''साहेब, मी प्रभू''
''हां ...बोला''
''एक प्रकरण आहे''
''कसलं''?
''एक खून झालाय. त्याची माहिती द्यायचीय''
''कुणाचा खून?''
''माझाच खून झालाय . . ''
हे ऐकून मी खूर्चीतून पडायचाच बाकी होतो. क्राईम रिपोर्टींगच्या गेल्या बावीस वर्षांमध्ये अनेक प्रकरणे जवळून पाहिली. काही उकरून काढली. खूप निराळ्या माणसांनी महत्वाच्या ख़बरा दिल्या. पण स्वत:चाच खून झालाय हे सांगत आलेला प्रभू पहिलाच ठरला. माझ्या चर्येवरील अस्वस्थता पाहत
प्रभू शांतपणे शेजारी बसला होता.
मी पुन्हा विचारलं ''कुणाचा खून?''
''अहो माझाच्‌..पण गेल्या जन्मात झालायं. मी तपास लावलाय बराच. निम्मी केस उलगडलीय. उरलेली सोडवायला मदत करा प्लीझ...''
प्रभूचे बोलणे, देहबोली, यातून नेमकं रसायन काय आहे,हे लक्षात आलं होतंच. तरीही उत्सुकता होतीच. सक्रीय पत्रकार आणि त्यातही क्राईम रिपोर्टर असला की माणसं अभ्यासायची सवय जडते अनेकदा. मग पहिल्या मिनिटात समोरच्या माणसाचा अंदाज येतो.(अर्थात जवळच्या कित्येक माणसांच्या त-हेवाईकपणाचा मात्र अद्याप अर्थ् लागलेला नाही. असो.) प्रभूची मानसिक स्थिती विमनस्क असणार हे त्याच्या भिरभिरत्या नजरेवरूनच लक्षात आले होते. पण माझा पुनर्जन्म झालाय या त्याच्या वाक्यामुळे एकंदर प्रकरणाबाबत मला उत्सुकता निर्माण झाली होती. मी जरा तपशील जाणून घ्यायचा प्रयत्न् केला. हा प्रभू मूळचा भंडारा जिल्ह्यातला रहिवासी. एका व्यक्तीचा चारजण खून करतात असे दृश्य त्याला डोळ्यासमोर दिसायचे. ही व्यक्ती म्हणजे गतजन्मातील तोच आहे असे त्याला वाटते. खून झालेले गाव समजायचे. काही व्यक्ती दिसायच्या. त्यामुळे किशोरावस्थेपासूनच ते गाव आणि त्या व्यक्तींच्या शोधार्थ् बाहेर तो बाहेर पडला. पुण्याजवळच्या मोशीत हा प्रकार घडला असल्याचा त्यांचा दावा आहे.
पंधरा-वीस मिनिटे संवाद झाल्यावर प्रभू फारच असंबद्ध् बोलायला लागला. 25 वर्षे तो मेंटल हॉस्पिटलमध्ये दाख़ल होता, हे त्याने जाताना सांगितले आणि प्रभूचे प्रकरण मी मनातून कायमचे पुसून टाकले. पण, सर माझा मर्डर झालाय...हे त्याचे वाक्य आठवले की आजही प्रभूची ती अजिजीने बोलणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते.. . 

No comments:

Post a Comment