Thursday, 5 June 2014

अंकुश हातात  ठेवा
उष:काल होतो आहे
- - - - - - - - - - - -
देशात कधी नव्हे इतके घवघवीत यश नरेंद्र मोदी यांनी प्रथमच कॉंग्रेसेतर पक्षाला मिळवून दिले आहे....आणिबाणीनंतर इंदिरा कॉंग्रेसला मिळालेले यश अथवा इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत कॉंग्रेसला मिळालेल्या यशापेक्षाही मोदींचे हे यश लक्षणीय आहे.....मोदींनी वैयक्तिक देशभर निर्माण केलेला करिष्मा आणि त्याचे मतांत रुपांतर करण्याची साधलेली किमया निर्विवाद अभिनंदनीय आहे.....त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षातील धुरिणांना चांगलाच धडा देणारी आहे....आपण सर्वकाळ जनतेला भ्रमात ठेवू शकत नाही आणि आपली मनसबदारीही दीर्घकाळ चालू शकत नाही याचे आत्मभान कॉंग्रेसच्या नेत्यांना देणारी ही निवडणूक ठरली आहे.......मोदींच्या लाटेबरोबरच प्रस्थापितांना जमीनदोस्त करण्याची सूप्त लाट सा-या देशभर पसरली होती, हे निवडणूक निकालांवरून सहज लक्षात येते....

चव्हाण, देशमुख, पवार, कदम, मोहिते, हिरे, मेघे, काळे, कोल्हे, विखे, भोसले, पाटील अशा जेमतेम 40 घराण्यांच्या हाती गेले साठ वर्षे महाराष्ट्राची सत्ता होती.....एरवी एकमेकांचे कट्टर विरोधक असणा-या या मंडळींचा निवडणुकीत एक छुपा अजेंडा असायचा...एकतर तुम्ही जिंका किंवा मी जिंकतो....पण आपल्यामध्ये तिसरा कोणी आला नाही पाहिजे.....याच राजकारणातून या घराण्यांनी कायम सत्तेचे लोणी आपल्याच घरात येईल याची काळजी घेतली...सत्तेतून पैसा आणि पैशातून संस्था आणि पुन्हा संस्थांतून सत्ता असे हे दुष्टचक्र गेले साठ वर्षे सुरू होते.......ब्रिटीश काळात देशात काही संस्थानिक होते.....ते कायम त्यांच्याच माजात असत....सर्वसामान्य जनतेपेक्षा आपण काही वेगळे आहोत हा अहंकार त्यांच्यात ठासून भरलेला असायचा...त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेला अमर्याद पैसा आणि सत्ता.....देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थाने खालसा झाली खरी, ....पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे नवे संस्थानिक तयार झाले...शिक्षण संस्था यांच्या...कारखाने यांचे...दूधसंघही यांचेच....सूतगिरण्या यांच्याच.....सारं काही यांचेच....हे गबर झाले या पैशांनी...मान मरातब, प्रतिष्ठा पैसा हे फक्त यांच्याच घरी....आपण ठरलो पोटार्थी....एखाद्या दिवशी रजा घेतानाही दहावेळा विचार करणारे....आणि यांचं काय??? अहो सगळं मस्त... यांचे मजबूत वाडे, बागायती शेती, उंच माड्या, उंची दागदागिने, उंची गाड्या आणि श्वानही उंची.... .आपण लांबून यांचं ऐश्वर्य पाहून त्यांचे गोडवे गात होतो.......आपण फक्त त्यांना मत द्यायचो....कधी यांना...कधी त्यांच्या विरोधकांना....पण आजवर आपल्यातला आम आदमी कधी सत्ताधारी बनला नाही....आपल्याला मानसिकदृष्ट्या पंगू करून टाकलं होतं या प्रस्थापितांनी....आपण दादा, बाबा, अप्पा, आबा, बापू साहेब म्हणत त्यांचेच गोडवे गायचे आणि त्यांनी नुसता पाठीवर हात ठेवला तरी हुरळून जात त्यांनाच मतदान करायचो...यापेक्षा काय केलं आपण वेगळं....ज्यांनी कुणी तसं करायचा प्रयत्न केला...तो पद्धतशीरपणे संपला....पण नाही...कालच्या निवडणुकांचा निकाल हा या प्रस्थापितांना सणसणीत चपराक देणारा ठरला.....मी मी म्हणणारे भलेभले प्रस्थापित यात चारीमुंड्या चीत झाले.....सामान्य मतदार काय करू शकतो याची ही चुणूक आहे.....केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील प्रस्थापितांना या निवडणुकीत मतदारांनी धुळ चारली आहे.....

आता नवे खासदार येतील....विधानसभेच्या निवडणुकीत नवे आमदार येतील.....देशाचा गाडा नव्याने हाकला जाईल...राज्यातही बदल होईल......नूतन आमदार, खासदार हळूहळू या सिस्टीममध्ये रूळू लागतील.....पुन्हा मंत्रालय गजबजेल....त्यात हळूच ठेकेदार, दलाल शिरतील....इतकी वर्ष दलालीची सवय लागलेल्या या दलालांच्या आता नांग्याच ठेचल्या पाहिजेत....कारण ही ठेकेदार, कंत्राटदार आणि दलाल मंडळीच आपले खरे शत्रू आहेत.....हेच लोक नव्या लोकप्रतिनिधींना बिघडवू शकतात..... पैशांचे निरनिराळे मार्ग दाखवतात....निरनिराळी आमिषे दाखवतात....पण आता आपण सावध राहीलं पाहिजे.....इतक्या भरभरून मतांनी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर आपण हक्काने अंकुशही ठेवला पाहिजे....गाडी कुठं घसरत असली, तर वेळीच ती मार्गावर आणली पाहिजे.....ताज्या दमाची नवी मंडळी चांगली आहेत....विकास कामे करण्यात त्यांना कर्तृत्व सिद्ध करून दाखवता येईल....आपण त्यांना सहकार्य करतानाच त्यांच्यावर करडी नजरही ठेवली पाहिजे....मागे 'सूत्रधार' नावाचा नाना पाटेकरचा एक सुरेख पिक्चर आला होता......सिस्टीमशी कडवा संघर्ष करून नाना विजयी होतो...अन..पुढे तो ही सूत्रधारच बनतो अशी ती कथा होती...आपण कुणाला सूत्रधार बनू द्यायचं नाही...कुणाला मनसबदार बनू द्यायचं नाही....कुणाची मक्तेदारी निर्माण होऊ द्यायची नाही....राज्याचा आणि देशाचा सातबारा जणु आपलाच आहे अशी भावना काही घराण्यांमध्ये होती.....ती काल धुळीला मिळाली.....या महाराष्ट्राचा आणि देशाचा सातबारा आमचाच आहे अशी भावना कुणा सत्ताधा-यामध्ये निर्माण होऊ द्यायची नाही याची काळजी आणि खबरदारी आपण डोळ्यांत तेल घालून घेतली पाहिजे...त्यासाठी आम जनतेनेच अंकुश हाती घ्यायला हवा....नव्या लोकप्रतिनिधींमार्फत अधिकाधिक विकासकामे मार्गी लावली पाहिजे....हे राज्य, हा देश अधिक सुंदर, स्वच्छ, सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी अधिक सुरक्षित व भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी आपलीही आहे...हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.....
अंकुश हातात ठेवा...उष:काल झाला आहे....

No comments:

Post a Comment