Friday, 6 June 2014

मिसिंग . . .
- - - - - - - -
वडगाव निंबाळकर हे बारामतीजवळील छोटेसे खेडेगाव. छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्यांचा हिरवागार परिसर. गावाच्या पारावर सकाळ संध्याकाळ वयस्कर ग्रामस्थांची गप्पांची मस्त मैफल जमायची. गडी माणसे शेतात काम करायची. चूल आणि मूल सांभाळत घरातील स्त्रिया त्यांना मदत करीत असत. गावात फारसे तंटे नव्हते. किरकोळ भांडणं चावडीवरच्या बैठकीत मिटून जायची. गाव खाऊन पिऊन सुखी होता. नोव्हेंबर महिन्यात खळ्यातील कामांची धांदल उडाली होती. त्याच दिवसांत राजू मुजुमले हा तरणाताठा गडी एकाएकी बेपत्ता झाला. गावात कर्णोपकर्णी ही बातमी पसरली. सगळ्यांनी गाव धुंडाळला. आजुबाजूच्या वस्त्या शोधल्या. नातलग, मित्रांकडे चौकशी केली. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. चार नोव्हेंबर 2003 ची ही घटना. गावकरी नवल करू लागले. काळजी करू लागले. एक तरणा गडी बेपत्ता होतो आणि त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नाही हे विस्मयजनक होते. नाही म्हणायला राजूची जीप गावाबाहेर एका टेकडीच्या चढणीवर सापडली. त्याच्या घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठले.इन्स्पेक्टर किशोर जाधव (मोबाईलक्र.9923493050)यांना त्यांनी राजू बेपत्ता झाल्याचे सांगितले. रीतसर फिर्याद नोंदवली. राजू हरवल्याची "मिसिंग' अखेर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

स्थानिक पोलिसांनी राजूचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्याची माहिती काढायची शिकस्त केली. दिवसेंदिवस या प्रकरणाचे गूढ वाढू लागले. एक दिवस इन्स्पेक्टर जाधव साध्या वेषात गावातून फेरफटका मारत होते. एका पानपट्टीजवळ ग्रामस्थांशी गप्पा मारत ते थांबले होते. त्यावेळी राजूचे गावातील एका मुलीशी नाजूक संबंध असल्याचे त्यांना समजले. राजूचा प्रवासी जीपचा व्यवसाय होता. त्याच्या जीपमधून नेहमी ये-जाकरणा-या गीताशी (नावबदललेआहे)त्याचे सूत जुळले होते. इन्स्पेक्टर जाधवांना ही माहिती पुरेशी होती. त्यांनी त्या दृष्टीने तपासाला प्रारंभ केला. गीताला चौकशीसाठी बोलवले. तिने सर्व प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तिच्या आई-वडिलांची, चुलत्याची चौकशी केली. पण त्यांच्याकडून काही ठोस माहिती मिळाली नाही. पण, त्या कुटुंबियांच्या एकंदर देहबोलीवरून आणि चेह-यांवरून त्यांना याबाबत नक्की माहिती असणार याची पक्की खात्री इन्स्पेक्टर जाधव यांची झाली. त्यांनी त्या सर्वांची निरनिराळ्या पद्धतीने चौकशी केली. ही मंडळी काहीतरी लपवत आहेत, हे ही त्यांच्या ध्यानात आले. मग त्यांनी गीताच्या आई, वडिलांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. गीतालाही स्वतंत्र खोलीत बसवून प्रश्नांची फैर झाडली. "तुझ्या आई-बाबांनी गुन्हा कबूल केलाय. मग तू का हे लपवलेस?'' अशी गुगली त्यांनी टाकली आणि गीताचे उसने अवसान ढासळले. तिचा बांध कोसळला आणि ढसाढसा रडत तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. राजूचे गीताच्या कुटुंबियांशी सलोख्याचे संबंध होते. गीता नेहमी त्याच्याच जीपमधून प्रवास करायची. त्यामुळे गीताशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. विशेष म्हणजे गीताच्या आईशीही त्याचे असेच संबंध होते. राजू गीताला भेटायला दररोज रात्री तिच्या वस्तीवरील घरी जायचा. घरातील मंडळी झोपी गेली की गीता राजूला भेटायला बाहेर पडायची. राजू गावातून जीपने तिच्या वस्तीजवळ यायचा आणि पुढे शेतातून चालत तिच्या घरी जायचा. घराशेजारी राहणा-या तिच्या चुलत्याला ही गोष्ट समजली. त्याने तिच्या वडिलांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी पाळत ठेवून या प्रकाराची खातरजमा केली.त्यानंतर दोघा भावांनी राजूचा काटा काढायचे ठरवले. एके दिवशी राजू येताच अंधारात दबा धरून बसलेल्या गीताच्या वडिलांनी व चुलत्यांनी कु-हाडीचे घाव डोक्यात घालून त्याचा निर्घृण खून केला. त्याचा मृतदेह घरालगतच्या शेतात पुरला होता. राजूच्या चाहुलीने जाग्या झालेल्या गीताने सारा प्रकार पाहिला. पण, आपले बिंग फुटेल या भीतीने ती चूप राहीली होती. तिच्या जबाबानंतर पोलिसांनी राजूचे खुनी गजाआड केले.
या घटनेनंतर अवघ्या दिड महिन्यांतच 28डिसेंबरला गीताच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांची चाहूल लागताच तिच्या कुटुंबियांनी आतून दार घट्ट लावून घेतले. त्या गडबडीत घराबाहेर झोपलेल्या गीताच्या आजोबांना घरात बोलवायचे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे घात झाला. दरोडेखोरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून त्यांचा खून केला. दरोड्याची माहिती समजल्यावर तत्कालीन पोलीस अधिक्षक माधवराव सानप यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वस्तीवर दाखल झाले. इन्स्पेक्टर किशोर जाधव यांनी ठसेतज्ज्ञांना व श्वानपथकालाही पाचारण केले होते. मुख्य रस्त्यापर्यंत माग काढून श्वान घुटमळत राहीला. दरोडेखोर एखाद्या वाहनाने तेथून पसार झाले असावे असा पोलिसांचा अंदाज होता. त्या भागात असलेल्या वस्त्यांवर पोलिसांनी शोधमोहिम राबवली. पण, दरोडेखोरांचा ठावठिकाणा काही लागेना. इन्स्पेक्टर जाधव यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास केला. खब-यांना कामी लावले आणि त्यांचा कयास खरा ठरला. नीराजवळील मुडाळे गावातील सहाजणांना पोलिसांनी गजाआड केले. दरोड्याचा आभास करून गीताच्या आजोबांचा खून करण्यात आला होता. राजूच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी त्याच्या काही नातलगांनीच हे षडयंत्र रचले होते. पोलिसांच्या अचूक तपासामुळे 'मिसिंग' आणि दरोडा हे दोन्ही गुन्हे उघडकीस आले.. 

No comments:

Post a Comment