Thursday, 5 June 2014

सोन्याचा माणूस
- - - - - - - - -

             पत्रकारीतेमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांशी परीचय होणं, निरनिराळ्या व्यक्तींशी ओळख होणं, त्यांच्या भेटीगाठी होणं स्वाभाविकच असतं . . .राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा पोलीस, प्रशासन अशा निरनिराळ्या क्षेत्रांतील मंडळी नेहमीच भेटतात....पण कधी कधी खूप निराळ्या क्षेत्रांत कार्यरत असणा-या, सर्व स्तरांवर खूप मान, आदर,कमवलेल्या एखाद्या व्यक्तीची अवचित भेट होते आणि पत्रकारीतेत आल्याचं समाधान मिळतं....15 जानेवारी 2001 हा माझ्यासाठी असाच संस्मरणीय दिवस ठरला....बाबा आमटे पुण्यात आलेत, असं एका सोर्सकडून समजलं....त्यांचा काही कार्यक्रम नव्हता....सार्वजनिक आणि खासगीही.... जरा खटाटोप केल्यावर नवी पेठेतील एका डॉक्टरांकडे ते काही वेळासाठी थांबल्याचं समजलं...पुण्यात थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी ते लगेच दिल्लीला जाणार होते....

            बाबांच कर्तृत्व हिमालयाएवढं... सा-या समाजाने अव्हेरलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन उभारून त्यांनी एक सामाजिक क्रांतीच केलीय .. .....कुष्ठरोग्यांसाठी या महामानवाने अवघं जीवन समर्पित केलं.... त्याआधी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला...कारावास सोसला....स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी कित्येक प्रश्नांवर आंदोलने केली...पंजाबमध्ये खलिस्तानवादी दहशतवाद शीगेला पोचला असतानाच्या काळात जीव धोक्यात घालून तेथील नागरिकांचा आत्मविश्वास देण्यासाठी त्यांनी शांतता फे-या काढल्या... राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ च्या माध्यमातून भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.. . .या हिमालयाएवढ्या उंचीच्या माणसाला भेटायचं या केवळ उत्सुकतेनं कमालीचा उत्तेजित झालो होतो.....मन अधीर झालं होतं त्यांना भेटायला...

           

नवी पेठेतील डॉक्टरांकडे जाऊन थडकलो......माझा परिचय दिला.... त्यांनी बाबांच्या खोलीकडं नेलं....तेव्हा बाबांना बहुदा कमरेचा खूप त्रास होत होता...झोपूनच असायचे ते....मी आत गेलो....एका कॉटवर बाबा पहुडले होते....मी नाव सांगून त्यांना नमस्कार केला.....थोड्या अनौपचारीक गप्पांनंतर मी मुलाखत घ्यायला सुरुवात केली....अगदी आनंदवनापासून ते भारत जोडो अभियान आणि राष्ट्रीय एकात्मतेपासून ते देशातील अस्वस्थ वातावरणाबाबत अनेक प्रश्न मनात होते.....माझ्या पहिल्याच प्रश्नाने बहुदा मला काय विचारायचंयं हे बाबांनी ताडलं असावं....त्यानंतर तब्बल एक तास सलग ते बोलत होते....आपले विचार नेमकेपणाने व्यक्त करणं म्हणजे काय? आपले विचार समोरच्याला प्रभावीपणे पटवून देणं म्हणजे काय? विचार आणि वक्तृत्वाचा सुरेल मेळ म्हणजे काय? शब्दसंपत्ती म्हणजे काय? फर्डं वक्तृत्व म्हणजे काय? जिव्हेवर सरस्वती नाचते म्हणजे काय?......या सा-यांचा अर्थ बाबांच्या त्या तासाभराच्या भेटीत समजला....एवढा मोठा माणूस ...पण माझ्यासारख्या एका साध्या पत्रकाराशी ते खूप आपुलकीने बोलत होते . . ..त्यांच्या सहजसाध्या बोलण्यानं माझ्यावर गारूड झालं होतं........कमालीच्या आस्थेने, आपुलकीने ते बोलत होते....खूप भारावून गेलो होतो .. . मुलाखत संपल्यावर त्यांनी माझी वैयक्तिक कौटुंबिक माहिती घेतली.. कामाची पद्धत जाणून घेतली....मला शुभेच्छा दिल्या.....घरच्यांना आणि मित्र परिवारालाही शुभेच्छा सांगा असं आवर्जून सांगून निरोप दिला.....येताना मोकळ्या मनाने आलेलो मी जाताना कितीतरी समृद्ध,श्रीमंत झालो होतो....बाबांसारखा सोन्याचा माणूस मला भेटला होता..... . बाबांवर आता एक मराठी चित्रपट येऊ घातलाय.......काही असो...पण मला नाही वाटत की बाबा एकाच चित्रपटात मावू शकतील.....

No comments:

Post a Comment