Tuesday, 24 June 2014

वारी आणि पुणे
- - - - - - - - - - - - 

सुंदर ते ध्यान उभे वीटेवरी, कर कटावर ठेवुनियां
तुळशीचे हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर तेंचि रूप 
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया 
गोड तुझे रूप गोड, तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ
विठुरायाची कमालीची आस, ओढ असलेले लाखोंच्या संख्येने वारकरी दोन दिवस पुण्यात येतात आणि अतिशय धावपळीचे शहर अशी ओळख असलेल्या या शहराचा चेहरामोहराच जणू बदलून जातो. एरवी कामाधंद्याच्या धबडग्यात गर्क असलेले पुणेकर ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखीसमवेत जाणा-या वारक-यांच्या स्वागतासाठी हिरीरीने पुढे येतात. वारक-यांच्या भोजनासाठी, त्यांच्या सेवेसाठी, मदतीसाठी शहराच्या चौकाचौकात मंडप उभारले जातात. एरवी कधीही समाजकार्यात अथवा अन्य सार्वजनिक सण-उत्सवात सहभागी न होणारे चेहरे वारक-यांच्या सेवेत मात्र हमखास दिसून येतात. पालखी मुक्कामाला असलेल्या दोन दिवसांत शहरातील सर्व चित्र बदललेले दिसते. एकप्रकारच्या अनिवार उत्साहाबरोबरच आध्यात्मिकतेची आणि भक्तीरसाची जोड शहरातील वातावरणामध्ये दिसून येते. जात, पात, धर्म, भाषा, प्रांत असे सर्व भेद पार करून सर्व स्तरातील, सर्व वर्गातील लोक
वारक-यांच्या सेवेसाठी तत्पर असतात. पालखी सोहळ्यामुळे पुण्याचे वातावरणच बदलून जाते.
ज्येष्ठ महिना आला की वारक-यांना वारीचे वेध लागू लागतात. पांडुरंगाच्या दर्शनाची आस त्यांना असते. त्याचवेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखीच्या दर्शनाचे आणि त्यासोबत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेचे वेध सामान्य नागरिकांना लागतात. पंढरीच्या या वारीला चारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकोबारायांच्या घरातही वारीची परंपरा होती. तुकोबांच्या मृत्युनंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा आणि नंतर नारायणबाबांनी ही प्रथा कायम ठेवली. नारायणबाबांनी तुकोबांच्या व ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका सोबत घेऊन वारी सुरू केली. "ज्ञानोबा-तुकाराम' हा पालखीतील जयघोषही त्यांनीच सुरू केला. नारायणबाबा तुकोबांच्या पादुका सप्तमीला पालखीत ठेवत आणि अष्टमीला आळंदीला जात असत. तेथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन तेथून नवमीला वारीला सुरुवात करीत असत. 1680 ते 1832 पर्यंतही प्रथा कायम राहिली. हंबीरराव प्रथम वारकरी म्हणून ओळखले जातात. तसा उल्लेख जुन्या ग्रंथांमध्ये आहे. आरफळ येथील सरदार हैबतराव पवार-आरफळकर यांनी 1832मध्ये माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. त्यांना अंकलीच्या सरदार शितोळे यांनी मदत केली. ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून पंढरपूरपर्यंत वारी करीत असत. माऊलींच्या पालखीचा थाट तेव्हापासून आजतागायत कायम आहे. हैबतबाबांनी माऊलींची पालखी स्वतंत्र केली. तसेच एक शिस्त लावून दिली. ती आजतागायत पाळली जाते. ज्ञानोबा आणि तुकारामांच्या पालख्यांची दरवर्षी पुणे-मुंबई रस्त्यावरील म्हसोबा गेटजवळ भेट होत असे. तेथे महापालिकेतर्फे व पुण्यातील विविध संस्थांतर्फे पालख्यांचे स्वागत केले जात असे. दोन वर्षांपासून पालखीचा मार्ग बदलला. संत तुकारामांची पालखी नेहमीच्या रस्त्याने पिंपरीवरून पुणे-मुंबई मार्गावरून इंजिनीयरिंग कॉलेजच्या चौकात येते. माऊलींच्या पालखीचा मार्ग बदलल्याने ही पालखी आळंदी रस्त्यावरून होळकर पुलाकडे जाण्याऐवजी सरळ संगमवाडी येथील नवीन प्रशस्त पुलावरून इंजिनीयरिंग महाविद्यालयाजवळ पोहोचते. त्या चौकात या दोन्ही पालख्यांची भेट होते. तेथे पुष्पवृष्टी करून दोन्ही पालख्यांचे पुणेकरांतर्फे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. हजारो पुणेकरांनी याचि देही याचि डोळा हा सुवर्णक्षण अनुभवतात. या आनंद सोहळ्यानंतर पालख्या मुक्कामाला भवानी पेठेत रवाना होतात. पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा, तर जवळच्याच निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असतो. या काळात पालखीसमवेत असलेले हजारो वारकरी शहरभर विखुरतात. बहुतेक दिंड्यांचे ठराविक ठिकाणी मुक्काम असतात. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा दरवर्षी कटाक्षाने पाळली जाते. वैयक्तिक वारी करणाऱ्या वारकऱ्यांचीही मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात. शहरातील अनेक मंडळांकडून वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. अगदी राजगिऱ्याच्या चिक्कीपासून ते खजूर, लाडूची पाकिटे वाटली जातात. कित्येक मंडळांतर्फे वारकऱ्यांसाठी सुग्रास भोजन दिले जाते. हे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचीही संख्या प्रतिवर्षी वाढते आहे. वारकऱ्यांच्या भोजन सेवेबरोबरच त्यांना अन्य सुविधा देण्यासही अनेक संस्था, संघटना पुढे आल्या आहेत. त्यामध्ये वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच त्यांना चष्मेवाटप, आवश्यक औषधांचे वाटप केले जाते. काही मंडळांकडून चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या पायाला आणि शरीराला मसाज करण्यापासून ते गरम पाण्याच्या स्नानापर्यंत सर्व व्यवस्था केली जाते. त्यांच्या तुटलेल्या वहाणा दुरुस्त करून देण्याची, केशकर्तनाची, पावसापासून रक्षण करण्यासाठी रेनकोटची व्यवस्था काही मंडळी करतात. काही संघटनांतर्फे साबण, टूथपेस्ट, गॉगल, कपडे, स्वेटर्स, पादत्राणे यांचे वाटप केले जाते. त्यामध्ये कोठेही दानाच्या, स्वार्थाच्या भावनेचा लवलेशही नसतो. विठूरायाच्या भेटीसाठी चाललेल्या
वारक-यांची सेवा केल्याची कृतज्ञ भावनाच या सगळ्यांच्या मनात असते.
तुकोबारायांचे श्री क्षेत्र देहू आणि ज्ञानोबांची श्री क्षेत्र आळंदी ही कधीकाळी पुण्याजवळची गावे होती. पुण्याचा आता एवढा चौफेर विस्तार झाला आहे, की ही दोन्ही गावे आता जणु पुण्याचाच भाग बनली आहेत. या दोन्ही पालख्यांचा पहिला एकत्र मुक्काम पुण्यात असणे, हे पुणेकरांना लाभलेले मोठे भाग्यच. एरवी आपल्या नोकरी-व्यवसायात बुडालेल्या पुणेकरांना या भाग्याची निश्चित जाणीव आहे. त्यामुळेच सर्व समाजातील व सर्व स्तरातील लोक मोठ्या उत्साहाने पालख्यांचे स्वागत करतात. त्यासोबत असलेल्या वारक-यांची सेवा करताना ही मंडळी कसलीही कसर राहू देत नाहीत. पालखीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून शहरात वारकऱ्यांची वर्दळ सुरू होते. प्रत्यक्ष पालखीच्या दिवशी शहरभर, जेथे पहावे तेथे वारक-यांचे जथे दृष्टीस पडतात. पालख्यांच्या मुक्कामाच्या रात्री चौकाचौकांत जेवणावळी सुरू असतात. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तने चालू असतात. वारक-यांच्या संगतीने पुणेकर मंडळीही भजन-कीर्तनात तल्लीन होतात. संपूर्ण शहरभर भक्तिपूर्ण वातावरण असते. एरवी क्षुल्लक गोष्टींवरून शासन, प्रशासन अथवा कोणाच्याही अकलेची मिमांसा करणारे पुणेकर एकाच दिवसांत हजारो वारकरी शहरात आल्यामुळे अथवा पालखीमुळे वाहतुकीची कोंडी झाल्याची तक्रार करीत नाहीत. या उलट विठोबा माऊलीसाठी या बाबी गोड मानून पुणेकर विनातक्रार आपले नित्य व्यवहार जारी ठेवतात. कोठेही, कसलेही वादविवाद होत नाहीत. वारक-यांच्या भक्तीरसात चिंब झालेले पुणेकरही या दिवसांत माऊलीमय होऊन जातात. वारीच्या महात्म्याचे, तिच्या थोर परंपरेचे, त्यातील अध्यात्मिकतेचे आणि भक्तीरसाचेच ते प्रतिक असते.

No comments:

Post a Comment