..आणि डॉन ढसाढसा रडला
जगभरातील प्रमुख़ देशांमध्ये त्याची अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे...आतापर्यंत तो स्वत:ला सर्वशाक्तिमान समजत होता ...जगाच्या कोणत्याही कोप-यात बसून कधीही, कोणाचीही विकेट एका इशा-यासरशी काढू शकतो याची त्याला फुशारकी वाटत होती. ..अंडरवर्ल्डचा तो डॉन समजतो...पण आईचे निधन झाल्याचे समजल्यावरही तिचे अंत्यदर्शन घेऊ न शकल्याने मनातून कोसळलेला डॉन छोटा राजन ढसाढसा रडला. अंडरवर्ल्डच्या चक्रव्यूहात अडकलेल्या डॉनची ही हतबलता होती.
आईच्या निधनाचे अपार दु:ख़ तर राजनलाच झालेच; त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आपण सर्वशक्तीमान असल्याचा त्याचा भ्रमाचा भोपळा फुटला. तीव्र इच्छा आणि सर्व व्यवस्था असूनही केवळ पोलीस अटक करतील किंवा प्रतिस्पर्धी गुंड गाठतील या भीतीने राजन भारतात परतू शकला नाही. आईच्याही अंत्यविधीला उपस्थित न राहता आल्याची ख़ंत एका मित्राकडे बोलून दाख़वताना तो अक्षरश: ढसाढसा रडला.
राजनची आई लक्ष्मीबाई यांचे नुकतेच (ता.२६) दीर्घ आजारानंतर निधन झाले. चेंबूरमधील निवासस्थानाजवळ असलेल्या ख़ासगी रुग्णालयात त्यांनी अख़ेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून अर्धांगवायूच्या विकाराने त्या अंथरूणाला खिळून होत्या. आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि उपचार सुरू असतानाच २६ मार्चला त्यांची प्राणज्योत मालवली. १९९३ पासून विदेशात असलेल्या राजनला त्याच्या निकटवर्तीयाने त्वरीत हे वृत्त कळवले. सख़्ख़ी आई काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच डॉन शोकाकूल झाला. त्याहीपेक्षा तिचे अंतीम दर्शन आपण घेऊ शकणार नाही या भावनेने त्याला अक्षरश: रडू कोसळले. राजन सध्या मलेशियात असल्याचे बोलले जाते. तेथून अथवा जगाच्या कोणत्याही कानाकोप-यातून तो सहज मुंबईत येऊ शकला असता. तितकी मजबूत त्याचे स्वतंत्र यंत्रणा तर आहेच; पण त्याहीपलीकडे त्याचे मित्रांचे व शूटर्सचे विस्तीर्ण जाळे विणलेले आहे. गुप्तचर यंत्रणांशी त्याचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. पण एवढी यंत्रणा असूनही राजन भारतात येऊ शकला नाही. आईच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू न शकलेला राजन आता आगामी काळात कधीच देशात परतणार नाही याचेच हे चिन्ह आहे, अशी माहिती उच्चपदस्थ पोलीस अधिका-यांनी दिली.
रिक्षाचालकांच्या युनियनचा लिडर असलेल्या बड्या राजनच्या टोळीतून गुन्हेगारीला सुरूवात केलेल्या राजनने १९८५नंतर अंडरवर्ल्डमध्ये नावाचा ठसा निर्माण केला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रााहिमचा उजवा हात म्हणून वावरलेल्या राजनने चेंबूर व लगतच्या परिसरात दहशत निर्माण केली. १९८८ च्या सुमारास पोलिसांच्या ससेमि-याला कंटाळून दाऊद दुबईच्या आश्रयाला गेला. त्यापाठोपाठ राजनही तेथे पोचला. दाऊदनंतर स्थान कोणाचे? यावरून छोटा शकीलशी झालेल्या वादानंतर त्या टोळीशी फारकत घेऊन राजनने स्वतंत्र टोळी कार्यान्वित केली. त्यानंतर दाऊद व राजन टोळीत उडालेला रक्तरंजीत संघर्ष सर्वज्ञात आहे.
दाऊदपासून स्वतंत्र झाल्यानंतर राजनभोवती फरीद तनाशा, संतोष शेट्टी, विकी मल्होत्रा, डी.के. राव, रोहित वर्मा आदी साथीदारांचे भरभक्कम कवच होते. तरीही, त्याला ख़रा मानसिक आधार होता तो आईचा. लक्ष्मीबाई यांना राजनने निवडलेला गुन्हेगारीचा मार्गकधीच पटला नव्हता. त्याबाबत त्याला नेहमीच ख़डसावत असत. गुन्हेगारीच्या मार्गापासून त्याला परावृत्त करण्यासाठी त्या त्याला नेहमीच ख़डे बोल सुनावत असत. २००० मध्ये छोटा शकीलच्या शूटर्सनी बँकॉकमध्ये राजनवर प्राणघातक हल्ला केला, तव्हा या माऊलीने अन्नपाणी वर्ज्य केले होते, अशी आठवण सूत्रांनी दिली. आईपासून वीस वर्षांपेक्षा अधिक काळ दूर असलेल्या राजनचे आईशी खूप माया होती. तीन भाऊ आणि दोन बहिणी तिची काळजी घेण्यासाठी समर्थ असल्या, तरी काही मित्रांना सांगून त्याने तिची जास्तीत जास्त चांगली बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तिचे अख़ेरचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. तो नेहमी तिच्याशी फोनवर बोलून ख्यालीखुशाली विचारायचा. माझी काळजी करू नको असे सांगतानाच मी नक्की तुझ्या भेटीला येईन असे आश्वासन द्यायचा. पण ती गेल्यानंतरही डॉनला हे आश्वासन पूर्ण करता आले नाही. आईच्या भेटीची आस अधुरीच राहीली.
अंडरवर्ल्डच्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व नात्यांवर पाणी सोडावे लागते हा यापूर्वी अनेकांचा अनुभव आहे. दादरचा डॉन अमर नाईक याच्या आईचे ९० च्या दशकात पुण्यात निधन झाले. पण पोलिसांच्या व प्रतिस्पर्ध्यांच्या भीतीने अमर अंत्यविधीला जाऊ शकला नव्हता. आई आणि वडिलांच्याही अंत्यसंस्कारांना दाऊद इब्राहिम उपस्थित राहू शकला नाही. तसेच काही वर्षांपूर्वी मुंबईत निधन पावलेल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांना छोटा शकील येऊ शकला नाही.गुन्हेगारी क्षेत्रातील या नियमाची जणु काही पुनरावृत्तीच राजनच्या रूपाने झाली अशी अंडरवर्ल्डमध्ये चर्चा आहे.
No comments:
Post a Comment