Thursday, 5 June 2014


कोलकत्याचा फोन . . . 
- - - - - - - - - - - - - - - 
रविवार असल्यानं जरा रिलॅक्स होतो....सहकारीही निवांत होते.... तसंही रविवारी का कोण जाणे कामाला मूडच लागत नाही.....काही सटरफटर कामं करत बसलो होतं....फेसबुकला पोस्ट लिहून झाली....' चौफेर' चं काम मार्गी लावलं....मित्रांशी फोनाफोनी सुरू होती....हल्ली काम करता करता फोन उरकण्यासाठी किंवा फोन करता करता काम करता यावं यासाठी अधूनमधून मी कानाला ब्लू टूथ वापरतो...असा ब्लू टूथ लावून काम करत असताना मोबाईलची रिंग वाजली.... नंबर अनोळखी होता...कॉल घ्यावा? की नाही?...असा विचार करत करत...फोन घेतला.....बहुदा सिग्नल्स चांगले नव्हते....आवाज काय नीट येत नव्हता...खरखर कानावर पडत होती.....कोणी स्त्री बोलत होती...आवाज जरा ओळखीचा असावा असा वाटला...
''आबिद है क्या!.....''
''कोण बोलतंय?'' माझा जरा रागीट सूर....
''क्या ये आबिद सेखजी का नंबर है? ...''
एकदम कुणी जी वगैरे लावून असं बोललं की आपोआप नरमतो आपण....समोरची स्त्री मराठी भाषिक नाही...हे एकंदर शब्दफेकीवरून, शब्दांच्या हेलांवरून समजत होतं....मला वाटलं होतं 'त्या' व्यक्तीचाही तो आवाज नव्हता....मग जरा सावरून बसलो...मी नाव विचारलं.पहिलं नाव समजलं नाही...मुखर्जी एवढंच कानावर पडलं...आमची एक लिपी मुखर्जी होती... खास मैत्रीण....क्राईम रिपोर्टर....आता कॅनडाला जाऊन तिला कित्येक वर्षं झालीत आणि काही कारणांमुळं ती कुणाच्याही संपर्कातही नाही.....इकडे आल्यावर अनेकदा ती कोलकत्यात असते.....तिचा फोन असावा का? असंही वाटून गेलं...पण लिपीचा आवाज कसा जरा बालिश...तिचं आबिद उच्चारायची स्टाईलही निराळीच....मग हे कोण?? .
''आपने कार्ड दिया था...उस वक्त बहोत लोग थे...कुछ ज्यादा बोल नही पाये थे हम.....'' बाई पुढे बोलू लागल्या....त्यांनी एका महोत्सवाचा उल्लेख केला अन मग एकाक्षणी अचानक फोन कुणाचा हे मला क्लिक झालं...आणि कानाचा ब्लू टूथ आणि फोन एकाचवेळी गळून पडले.....दोन मिनिटं स्वस्थ बसलो....फोनचं ब्लू टूथ कनेक्शन काढून टाकलं.....अंग जरा घामटल्यासारखं झालं....अहो होणारच्‌ ना राऽऽऽऽव....एरवी कुठल्या बॅंकॉक-थायलंड किंवा तत्सम कुठल्याही देशातून राजन, गुरू साटम, अश्विनचे फोन यायचे पूर्वी...पहिल्या पहिल्यांदा अस्वस्थ व्हायचो...आता कुणाचंच काही वाटत नाही.....पण, जागतिक दर्जाच्या एखाद्या अभिनेत्याने, कलाकाराने, रंगकर्मीने थेट फोन केला तर मात्र त्यांच्यापोटी आदरानं जरूर होतं असं.....हा विचार करीत असतानाच पुन्हा फोनची रींग वाजली....फोन अटेंड केला आणि कमालीच्या विनम्रतेने, मृदू आवाजात मला बोलताना पाहून माझे सहकारी चाट पडले......
पेशाने पत्रकार असलो अन्‌ आवड क्राईम रिपोर्टींगची असली, तरी सांस्कृतिक सभा-संमेलनांमध्येही रमतो मी....कवी संमेलनांमध्ये, गझल मैफीलींमध्ये रंगतो....गेल्या दोन-तीन वर्षांपासून तर चक्क सवाई गंधर्व महोत्सव अटेंड करायला लागलोय आणि कव्हरही करतोय.....तिथंच गेल्या डिसेंबरमध्ये बाईंची भेट झाली होती.....काळा सावळा वर्ण, टिपिकल बंगाली सौंदर्य....कपाळावर लाल भडक कुंकवाचा मोठा टिळा लक्ष वेधून घेत होता.......खूप व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून अनेक वर्षांनी त्या पुण्यात आल्या होत्या....घाई गडबड असली, तरी रसिकांना त्यांनी आजिबात नाराज केलं नाही....बहारदार गायकीने त्यांनी मैफल जिंकली...श्रोते मंत्रमुग्ध झाले....मैफल संपताच त्या तातडीने निघाल्या होत्या....मागच्या बाजूला भेटलो त्यांना....बाहेर त्यांच्या चाहत्यांनी भेटायला बरीच गर्दी केलेली... माझ्याबाजूला एक-दोघे वयस्कर गृहस्थ होते....कुठून घुसले होते देवजाणे....पण ते पिच्छाच सोडेनात....सगळ्या फोटोंत इथून तिथून डोकवत होते.....मग मी बाजूला झालो...त्यांचे स्वतंत्र फोटो काढायला लावले...बाई मिश्कीलपणे हसल्या....जरा बोललो त्यांच्याशी...त्या गडबडीतही त्यांनी त्यांचं कार्ड दिलं ...आणि माझंही घेतलं......
माझ्या व्हिजिटींग कार्डवरील नंबरवर आज तब्बल पाच महिन्यांनी बाईंनी संपर्क साधला होता.... कोलकत्याहून त्या बोलत होत्या....कैसे हो आप?...सब ठीक हैं ना? आप ने उस दिन क्या कव्हर किया? मैं तुरंत कोलकता चली आयी...दुसरे दिन के अखबार ना देख पायी....आप भेज सकोगे क्या?.....सात्विक आवाजात शांतपणे त्या बोलत होत्या....मी त्यांना बातम्या व फोटो मेल करण्याचं आश्वासन दिलं....पूना में कब आओगे? मी विचारलं....अभी तो कुछ प्रोग्राम है नही...लेकीन इस सालमें आना है.....आप को जरूर बताऊंगी....फोन कट झाला....आणि लगेच एक मेसेज आला
My Mail Id is indrani254****.....तो इंद्राणी मुखर्जींचा मेसेज होता....हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये अमीट मोहोर उमटवलेल्या इंद्राणी मुखर्जी.....तो फोनही इंद्राणी मुखर्जींचाच होता....धन्य धन्य झालो.....त्यांच्या फोनने आळसवलेला रविवार एका अविस्मरणीय दिवसात बदलून गेला. . . . .

No comments:

Post a Comment