Thursday, 5 June 2014

एक्झिटही "ग्रेस'फूल.....!
- - - - - - - - - - - - - - -
80- 90 च्या दशकात कॉलेज लाईफमध्ये प्रेमभंगाने होरपळून देवदास बनलेल्या प्रेमवीरांची काही ठराविक गाणी होती. त्यांच्यासाठीचे काही शेरही प्रसिद्ध होते. ते मुलांमध्ये आपोआप पसरत असत. आम्ही "एसपी'मध्ये शिकत असताना असे अनेक शेर माहित झाले होते.मुला-मुलींच्या वह्यांमध्ये ते लिहिलेले दिसायचे. "जजबात मोहब्बतमें दोनोंके पिघलते है, वो बर्फ पे चलते हैं.. हम आगमें जलते है....'' हा शेरही असाच त्यावेळी कुठेतरी वाचलेला अन् आशयामुळे लक्षात राहिलेला. त्यावेळी वाचनाची आवड होतीच. पुढे ती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली. तेव्हा एका मित्राकडून "मितवा' हा ललित लेखसंग्रह हाती पडला आणि आशयगर्भ, व अनोख्या अनवट शैलीच्या लेखांनी तो मनात कोरला गेला. त्यामध्येही नेमका हाच शेर आढळला आणि तो कायमस्वरुपी लक्षात राहीला. उर्दु शायर शाहिद मीर यांच्या या शेरने कवी ग्रेस यांची ओळख अधिक घट्ट झाली .
             ग्रेस यांची कविता असो की लेख त्यांचे जे काही साहित्य हाती मिळेल त्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या.पारंपारिकतेला छेद देत,ढोबळ-सरधोपट वाटेऐवजी अतिशय निराळ्या अंगाची, नव्या वाटेची रेषा आखणा-या ग्रेस यांचे मराठीइतकेच उर्दु आणि इंग्रजीवर तितकेच प्रभुत्व असल्याचे त्यांच्या गद्य, पद्य लिखाणावरून सहजपणे लक्षात येते. त्यांच्या कवितेतील निराळी प्रतिके, आगळ्या प्रतिमा आणि वळणदार शब्दांमुळे त्यांची कविता मनाला भिडायची. त्यांनी वापरलेल्या प्रतिकांचा, मिथकांचा बोध न होणारे अनेकजण ग्रेस यांची कविता दुर्बोध आहे, असा आक्षेप घेत असत. पुण्यातील दिवंगत सहाय्यक पोलीस आयुक्त पी .एन. इंगळे त्यांचे निकटचे स्नेही होते. इंगळेसाहेबांमुळे एक-दोनवेळा अनौपचारिक गप्पांची आमची मैफील जमली होती. त्यावेळी ग्रेस यांचे मैत्रीचेही निराळे रूप मला दिसले आणि भावलेही. मी त्यांना अनेक वाचक घेत असलेल्या आक्षेपाबाबत विचारले होते. ते म्हणाले, की कविता ही कविता असते. त्यामध्ये दुर्बोध किंवा सुबोध असा काही प्रकार नसतो. कविता कळणे किंवा न कळणे हे केवळ वाचकांच्या हाती असते. गप्पा मारताना त्यांचे मराठी व इंग्रजीसह उर्दुवरही असलेले प्रभुत्व सहजपणे जाणवले. त्यांच्या मनातील सर्व खळबळ ते कवितेतून अथवा ललित लेखांमधून व्यक्त करीत असत. चंद्रमाधवीचे प्रदेश, संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, मृगजळाचे बांधकाम, सांजभयाच्या साजणी, वा-याने हलते पान, कावळे उडाले स्वामी अशा अनेक लेखसंग्रहातील आशयघन लेखांवरून त्यांच्या ओघवत्या पण काहीशा अनोळखी शैलीची ओळख सहजपणे पटते. आवश्यक तेथे चपखलपणे वापरलेली इंग्रजी, उर्दु अथवा संस्कृत कोटेशन्स हे त्यांचे वैशिष्ठ्य होते. त्यांचे इंग्रजी व मराठी अक्षर इतके सुंदर व डौलदार होते, की तो एक लेखाचा वेगळा विषय ठरेल. मन प्रफुल्लीत असले की ते साहित्यात उतरते हे ग्रेस यांचे साधे सरळ मत होते. 


               
नागपूरमधील महाविद्यालयात इंग्रजी आणि सौंदर्यशास्त्र हे विषय ते शिकवणारे मणिक गोडघाटे अर्थात ग्रेस भल्यापहाटे चार वाजता स्नानासाठी थंड पाण्याच्या तलावात तासभर पोहोत असत. वर्षातील कोणताही ऋतू, दिवस त्यासाठी आडकाठी ठरला नाही. त्यामुळे तनामनाने कायम प्रसन्न असणा-या ग्रेस यांचे साहित्यही कायम ग्रेसफूल राहीले. व्यक्तिमत्व नितळ, पारदर्शी राहीले. त्यांना ना कोणत्या पदाची अपेक्षा होती, ना कोणत्या सन्मानाची. त्यामुळे साहित्य संमेलने आणि त्याच्या अध्यक्षपदासाठी चालणारे लॉबिंग त्यांना कधी रुचले नाही. त्यामुळे ते कधी त्या निवडणुकीच्या भानगडीत पडले नाहीत. एवढेच नव्हे, हा आत्ममग्न साहित्यिक कोणत्याही संमेलनाची पायरीही कधी चढला नाही. 1974 ला "चर्चबेल' या ललित संग्रहाला वाचकांनी डोक्यावर घेतले. ग्रेस यांची ती साहित्यक्षेत्रातील एन्ट्री ग्रेसफूल ठरली. दरम्यानच्या काळात त्यांचे कितीतरी काव्यसंग्रह आणि ललित लेखसंग्रह प्रसिद्ध झाले. लिखाणाच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे ग्रेस यांच्याबद्दल वाचकांच्या मनात आगळे स्थान निर्माण झाले. ज्येष्ठ साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्याप्रमाणेच ग्रेसही प्रसिद्धीपराड.मुख होते. ग्रेस यांच्या कवितेवर जसा दुर्बोधतेचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला; तसेच तो जी. एं. च्याही लेखनावर झाला होता. आगळा योगायोग म्हणजे धारवाडहून शक्यतो कधी बाहेर न पडलेल्या जी.एं .ची आणि ग्रेस यांचा घट्ट दोस्ताना होता. ग्रेस यांच्याबद्दल ही निरनिराळ्या वदंता पसरल्या होत्या. बहुधा त्या हेतूत: पसरवल्या गेल्या असाव्यात. त्याकडे ना कधी ग्रेस यांनी लक्ष दिले ना कधी त्यांच्या चाहत्यांनी. "मी महाकवी दु:खाचा, प्राचीन नदीपरि खोल, दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फूल' ही त्यांची स्वत:ची ओळख होती. ग्रेस यांच्या नसनसांत शीगोशीग साहित्य भरले होते. कविता ही माझ्या आत्म्याची प्रतिष्ठा आहे, असे ते नेहमी म्हणत. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या कलासक्त लेखणीचा प्रत्यय रुग्णालयातही आला. नादमयता, गेयता, आणि भावना व्याकुळता या त्यांच्या लेखणीच्या वैशिष्ठ्यांनीयुक्त "ओल्यावेळूचीबासरी' हा ललित लेखसंग्रह त्यांनी रुग्णालयातच प्रकाशित केला. मंगेशकर कुटुंबियांशी ग्रेस यांचे अतिशय स्नेहपूर्ण संबंध होते. ह्रदयनाथ मंगेशकर यांनी 'दुर्बोध' म्हणून हेटाळल्या गेलेल्या ग्रेस यांच्या कवितांना सुरेल चाली बांधून रसिकांसमोर पेश केल्या. "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता...' यांसारख्या ग्रेस यांच्या गीतांना रसिकांनी डोक्यावर घेतले. रुग्णालयात असतानाच ग्रेस यांना साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. तो त्यांनी त्यांच्या सहज विनम्रवृत्तीने स्विकारला. राधेच्या वीराणी, आईची आठवण, सख्याची प्रतिक्षा, सजणीचा साज असे नानाविध विषय अतिशय निराळ्या आयामाने हाताळणा-या ग्रेस यांनी मृत्यूशीही ग्रेसफूल झुंज दिली. वर्षाचे 365 दिवस पहाटे तासभर पोहून निरामय जीवन जगणा-या या आत्ममग्न कवीला कधी कर्करोग ग्रासेल अशी यत्किंचीतही कल्पना कोणीच केली नसावी. ग्रेस यांनी मात्र या आजाराचेही त्यांच्या वृत्तीनुसार स्वागतच केले. त्याच्याशी जिगरीने लढतही दिली. कर्करोगासारखी असाध्य व्याधी असूनही ते कधी मनाने खचले नाही. आपल्या अदबशीर, हिंदी लहेजाच्या ओघवत्या भाषेत संवाद साधत त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरसह सर्व कर्मचा-यांना आपलेसे केले होते. या विकाराच्या उपचारांसाठी त्यांच्यावर केमोथेरपी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या डोईवरील दाट केशसंभार गळून गेला. पण, ग्रेस डगमगले नाहीत. "फसल कटनेसे वो जादा उगके आती है' असा विनोद ते करीत. या काळात ते स्टाईलीश हॅट वापरू लागले होते. मृत्यू समिप आल्याची जाणीव त्यांना झाली होती. त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते ती व्यक्तही करीत असत. अर्थात,त्याबद्दल त्यांच्या मनात आजिबात खेदाची, दु:खाची अथवा निराशेची भावना नव्हती. अखेरपर्यंत ते सर्वांशी नेहमीप्रमाणेच बोलत होते. इतरांच्या प्रतिक्रियांना आपल्या धाटणीने प्रतिसाद देत होते. भूतकाळाशी वर्तमानाची नाळ जोडत भविष्याचा वेध घेणा-या या कवीने दोन वर्षांपूर्वी 26 मार्चला चाहत्यांना कायमचे अलविदा केले... ते ही ग्रेसफूली "ए खुदा रेत के सेहरे को समंदर कर दे, या छलकती हुई आँखो को पत्थर बना दे; और कुछ भी नही है दरकार तुझसे, बस्स.. मेरी चादर मेरे पैरोंके बराबर कर दे...' असे गुणगुणणा-या ग्रेसफूल व्यक्तिमत्वाची बहुदा परमेश्वरालाच ओढ लागली होती..

No comments:

Post a Comment