Friday, 6 June 2014

उपेक्षित इंदिराला आपण मदत करूया . . ..
- - -- - - - - - -- -- - - - - - - - - - - -- - - - - -
पुण्याच्या इंदिरा गायकवाडनं पॅरालिम्पिक खेळांमध्ये अनेक पदकांवर आपलं नाव कोरलं. त्यासाठी महाराष्ट्र सरकारानं तिला शिवछत्रपती पुरस्कारानंही गौरवलं आहे. पण त्याच इंदिराला आज दोन वेळच्या अन्नासाठी झगडावं लागतं आहे. गेली वीस वर्ष तर इंदिराला नोकरीच्या शोधात वणवण भटकते. पण मायबाप सरकारला तिची दखल घ्यायला फुरसत नाही आहे.
खरंतर इंदिराची कहाणी कोणालाही अभिमान वाटावा अशीच आहे. अवघी अकरा महिन्यांची असताना पोलिओमुळे इंदिराला आपले पाय गमवावे लागले. पण तरीही तिनं कधीच जिद्द सोडली नाही. अपंगांसाठीच्या वसतीगृहात गेल्यावर इंदिराची पॅरालिम्पिक खेळांशी ओळख झाली आणि तिचं आयुष्य बदलून गेलं.
अपंगांच्या ऑलिम्पिकमध्ये म्हणजेच पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये इंदिरा गायकडनं भारताला खोऱ्यानं पदकांची कमाई करून दिली. पण गेली 20 वर्ष इंदिराला नोकरीच्या शोधासाठी वणवण भटकावं लागतं आहे. अजूनही इंदिराला नोकरी न मिळाल्यानं तिच्या कुटूंबावर हालाखीची परिस्थिती ओढवली आहे.
पॅरालिम्पिक खेळांमधल्या कामगिरीसाठी इंदिराला महाराष्ट्र सरकारनं 1993-94मध्ये शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. त्यानंतर वीस वर्ष उलटली तरी इंदिराची परवड संपलेली नाही. अपंगांसाठीच्या राखीव कोट्यातून एखादी नोकरी आणि डोक्यावर छप्पर मिळावं अशा तिच्या अगदी साध्या अपेक्षा आहेत. त्यासाठी इंदिरानं राजकारण्यांचे उंबरठे झिजवलेही... पण तिच्या पदरी आजवर निराशाच आली आहे.. पुण्याच्या गणेश पेठ परिसरातलं इंदिराचं छोटंसं घर आहे. आठ बाय दहाच्या लहानश्य़ा खोलीतच इंदिरा आपल्या आईसोबत राहत आहे. घरात केवळ दोघीच जणी... आईनं वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. तर आपलं आयुष्य खेळाला वाहून घेणाऱ्या इंदिराला अजूनही पोटापाण्याचा प्रश्न भेडसावतो. आपल्या मुलीनं देशासाठी वाहून घेतलं, पण सरकारनं तिची जी उपेक्षा केली आहे ते पाहून सोनुबाई गायकवाड यांच्या डोळे अनेकदा पाणावतात. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतं. पण ज्या खेळाडुंनी देशाला क्रि़डाक्षेत्रात सन्मान मिळवून दिला आहे त्यांच्यावर अशी दयनिय स्थिती ओढवावी, ही शरमेचीच बाब म्हणावी लागेल... पॅरालिम्पिक खेळांमध्ये देशाचं नाव उज्वल करणाऱ्या इंदिरा गायकवाड यांच्यासारख्या खेळाडूंची उपेक्षा थांबली नाही तर उज्वल क्रिडा भविष्याची स्वप्नं निरर्थकच ठरतील...(आपण पुढं आलं पाहिजे इंदिराच्या मदतीसाठी....तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9921092564) 

No comments:

Post a Comment