Friday, 6 June 2014

..कही दूर जब दिन ढल जाएऽऽऽ
- - -- - - - - - - -- - - - - - - -- - 
1950 ते 1960 चा कालखंड भारतीय सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ मानला जातो. बिमल रॉय, सत्यजित रे, के.आसिफ, बलराज साहनी, राजकपूर, दिलीपकुमार, शैलेंद्र, महंमद रफी, लता मंगेशकर, मुकेश, अशा लखलखत्या अस्सल रत्नांनी सिनेसृष्टीचा खजिना ओसंडून वाहत होता. एकाहून एक अभिजात चित्रपटांची निर्मिती होती. कसदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोचत होत्या. ताकदीच्या दिग्दर्शनाची जादू रसिक अनुभवत होते. कर्णमधूर संगीताने नटलेल्या अर्थपूर्ण गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध होत होते. शैलेंद्र, हसरत जयपुरी, मजरूह सुल्तानपुरी, जॉं निसार अख्तर, राजा मेहंदी अली खॉं, कैफे आझमी यांच्यासारखे ताकदीचे गीतकार दृश्याचा नेमका मूड धरून अर्थपूर्ण गाणी सादर करीत होते. या गाण्यांना चांदण्याच्या संगीताने सजविण्याची जादू रोशन, सज्जाद, नौशाद, शंकर जयकिसन, एस.डी.बर्मन, अनिल विश्वास, ओ.पी.नय्यर, हेमंतकुमार, मदनमोहन हे कसलेले संगीतकार तितक्याच ताकदीने करीत होते. चाल तयार करण्याची प्रत्येकाची धाटणी निराळी होती. रचना सादर करण्याची पद्धत आगळी होती. मनासारखे गाणे होईपर्यंत ते खूप प्रयोग करीत असत. त्यामुळेच, मोजक्या वाद्यवृंदाच्या सहाय्याने काळजाला भिडणारी ही अवीट गोडीची गाणी चांदीच्या रुपयासारखी खणखणीत होती. प्रत्येक संगीतकाराचा बाज निराळा होता. त्यामुळेच, सचिनदेव बर्मनच्या लोकगीतापासून ते ओ.पी.नय्यरच्या ठेक्यापर्यंत अवीट गोडीची गाणी त्या दशकात तयार झाली. त्याच सुवर्णकाळात आणखी एक संगीतकार या सिनेसृष्टीत स्वरसाज चढवत होता. पारंपारीक संगीताचा बाजच त्याने बदलून टाकला. त्याने कधी माणसांना वाद्यासारखा आवाज काढायला लावला; तर, कधी वाद्यांचा माणसांप्रमाणे आवाज काढत सारी समिकरणेच बदलून टाकली. लोकगीत, पारंपारीक हिंदुस्थानी संगीत आणि पौर्वात्य संगीताचा पाश्चात्य सुरावटींशी मिलाफ घडवून आणत संगीताची एक सर्वांगसुंदर अनोखी शैली निर्माण केली. सलील चौधरी हे त्या संगीतातील जादुगाराचे नाव. बंगाल प्रांतातील सूर मालिकेच्या या किमयागाराचा नुकताचा स्मृतीदिन झाला.

बंगालच्या 24 परगण्यातील चहाच्या मळ्यात बालपण गेलेल्या सलीलादांना सूरांची जात्याच आवड. त्यांचे वडिल डॉक्टर, पण संगीताचे चाहते. त्यांच्यामुळेच मोझार्ट, बीथोव्हेन, तायकोव्हस्की, चॉपिन अशा गाजलेल्या विदेशी संगीतकारांच्या सुरावटी ऐकतच सलीलदा मोठे झाले. पारंपारिक हिंदुस्थानी संगीतातील रागदारी,लोकसंगीतही त्यांच्या कानावर पडत होते. साहजिकच पुढे त्यांच्या संगीतावर त्याचा प्रभाव पडला. सलीलदांच्या संगीतामध्ये पारंपारिक धून पाश्चात्य वाद्यांच्या माध्यमातून पुढे येत आगळाच परिमाण साधत असे. त्यांच्या संगीताचे हे वैशिष्ठ्य त्यांच्या कितीतरी गीतांमधून दिसून येते. मग ते 1953 च्या त्यांच्या पहिल्याच "दो बिघा जमीन' मधील" आ जारी आ तू निंद' ही लताच्या मधाळ आवाजातील लोरी असो अथवा "धरती कहे पुकार के' हे मन्ना डे चे गाणे. पहिल्याच चित्रपटापासून सलीलदांच्या अनोख्या संगीताची छाप पडली. रसिकांच्या मनावर या संगीताने मोहिनी केली. ती अखेरपर्यंत कायम राहीली. त्यांच्या संगीतामध्ये एकसुरीपणा कधी आला नाही. प्रत्येक चित्रपटाचे संगीत आगळ्या धाटणीचे असे. रसिकांना अपेक्षित वाटत असलेल्या चालीत ते धक्कातंत्राने आकस्मिक सुखद बदल करीत असत. त्यामुळेच त्यांच्या संगीताची गोडी अखेरपर्यंत कायम राहिली. सलीलदांचे नाव उच्चारताच लगेच डोळ्यासमोर येते ते "ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन, तुझ पे दिल कुर्बान...' हे अफलातून गीत. बिमल रॉय यांच्या "काबुलीवाला' या अप्रतिम चित्रपटातील या अविस्मरणीय गाण्याने इतिहास घडवला. रविंद्रनाथ टागोरांची ही जबरदस्त कथा बलराज साहनी आणि उषा किरण यांनी कसदार अभिनयाने अक्षरश: जिवंत केली होती. त्यातील मन्ना डे यांनी गायलेले "ए मेरे प्यारे वतन.. तुझपे दिल कुर्बान' हे गाणे ऑलटाईम फेव्हरीट ठरले. या गीताने या चित्रपटातील कळसाध्याय गाठला गेला. 1961पासून या गीताला पन्नास वर्षे उलटली तरी आजही ते गीत तितकेच टवटवीत राहीले आहे. सलीलदांच्या संगीताची ती किमया आहे. सलीलदांनी संगीतबद्ध केलेले कोणतेही गाणे आठवून पाहिले, तरी आजच्या या आधुनिक दुनियेतही ते तितकेच ताजेतवाने वाटते. त्याच्या चाली आजच्या काळालाही तितक्याच सुसंगत आणि समर्पक वाटतात. 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी', 'दिल तडप तडप के कह रहा है आभी जा', 'घडी घडी मोरा दिल धडके' 'छाया' मधील' इतना ना मुझसे तू प्यार बढा', 'आँखो मे मस्ती शराब की',
'आँसू समझके क्यों मुझे आँख से तूने गिरा दिया', 'चॉंद और सूरज' मधील 'बाग में कली खिली, बगियॉं महकी, 'छोटी सी बात' मधील 'जानेमन, जानेमन तेरे दो नयन', 'आनंद'मधील ' जिंदगी कैसी हैं पहेली हाय', ' कही दूर जब दिन ढल जाए', 'रजनीगंधा' मधील 'कई बार यूं ही देखा है',
'मेरे अपने' मधील 'कोई होता जिसको अपना, हम अपना कहलेते यारों', 'माया'मधील 'कोई सोने के दिलवाला, कोई चांदी के दिलवाला' ही सलीलदांच्या संगीत खजिन्यातील काही रत्ने. 1949 मध्ये बंगाली 'परिबोर्तन' द्वारे चित्रपटसृष्टीत पाय ठेवलेल्या सलीलदांनी तब्बल चार दशके आपल्या सुरावटींनी रसिकांना चिंब करून टाकले. 1953च्या 'दो बिघा जमीन'द्वारा हिंदी चित्रपटात पदार्पण केलेल्या सलीलदांनी 80हिंदी, 37बंगाली, 27मल्याळी, पाच तमिळ, चार कन्नड आणि दोन आसामी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय मराठी, गुजराती, तेलुगू, आणि उडीया भाषेतील चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या संगीताची जादू दाखवून दिली. बंगाली संगीताचा त्यांच्यावर प्रभाव असला, तरी त्यात ते गुंतून राहीले नाहीत. बंगालीबरोबरच हिंदुस्थानी लोकसंगीत आणि पाश्चात्य सुरावटींचा सहजसुंदर मिलाफ घालून संगीतबद्ध केलेल्या गीतांनी रसिक कायमच न्हाऊन निघतील. सिनेसृष्टीत दिग्गज संगीतकारांसमोर आगळ्यावेगळ्या प्रयोगशील संगीताने त्यांनी स्वत:चा आगळा ठसा निर्माण केला. सलिलदांबद्दल रसिकांच्या मनात नेहमीच अतिव आदराचे, स्नेहाचे स्थान आहे. रसिकांचा हा लाडका संगीतकार वयाच्या 73व्या वर्षी पाचसप्टेंबर 1995ला अनंतात विलीन झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी सिनेसृष्टीतील सर्व दिग्गज उपस्थित होते. संध्याकाळच्या कातरवेळी शोकाकूल वातावरणात सलीलदांना अग्नी दिला गेला, तेव्हा पार्श्वभूमीला त्यांच्याच 'कही दूर जब दिन ढल जाएऽऽऽऽ...'च्या ओळी आसमंत चिरत आल्या आणि उपस्थितांनी पापण्यांत गोठविलेल्या अश्रुंना मार्ग करून दिला....

No comments:

Post a Comment