Friday, 6 June 2014

चिऊ...माझी....
- - - - - - - - - -
काल दुपारी गंधर्वमधल्या महिला गटाच्या मेळाव्यात गेलो होतो. निरनिराळ्या पदार्थांचे मस्त स्टॉल लागलेत तिथं. पोटात कावळे ओरडत होतेच. एका स्टॉलवर चुलीवर तयार करीत असलेल्या खेकड्याचा रस्सा दिसला. मग काय थांबलोच. उन्हाचा चटका आणि खेकड्याचा झणझणीत रस्सा...मग काय विचारूच नका..डोक्यांतून घामाच्या धारा लागल्या. तितक्यात `तिचा' चिवचिवाट कानावर पडला. अडिच-तीन वर्षांची चिमुरडी आईसोबत तिथं आली होती. आईसोबत तिच्या ब-याच गप्पा चालल्या होत्या. माझं तिच्याकडं लक्ष गेलं. ती ही माझ्याकडेच टक लावून पाहत होती. नजरानजर होताच ती पटकन माझ्यासमोरच्या मोकळ्या खुर्चीवर उडी मारून बसली...मी तिच्याकडं पाहून ह्सलो...काळजीयुक्त नजरेनं ती माझ्याकडं पाहत होती...तू का ललतोस? तिचा खडा सवाल....मी लक्ष दिलं नाही...पुन्हा तिनं विचारलं...तू का ललतोस?.....एखाद्या लहान मुलाशी संवाद साधताना आपण कसं बोबडं बोलतो, तसं ती माझ्याशी बोलत होती...तिचं माझ्याकडंच लक्ष होतं..मी काय उत्तर देतोय याची ती वाट पाहत होती...मी म्हणालो....मी रडत नाहीये...जेवतोय....तुला हाऽऽ लागलं? पुन्हा तिचा सवाल..... तुला हे पाहिजे? म्हणून तिनं हातातील जेली पुढं केली....मी नकारार्थी मान हलवली......तुला पा पायजे? तिचा पुन्हा प्रश्न.....मी काही बोललो नाही...तिच्याकडं पाहून हसलो....तिला काय वाटलं काय ठावूक? फ्रॉक सावरत पटकन ती उठली....स्टॉलवरच्या प्लास्टीकच्या ग्लासमध्ये थोडं पाणी भरून तो ग्लास माझ्यासमोर ठेवला...मी संकोचलो... ती माझ्याकडेच पाहत होती... मी ग्लासातील घोटभर पाणी प्यायलो.....काय सांगू? तिच्या डोळे कमालीच्या आनंदाने लकाकले... ....प्रसन्न, तृप्त नजरेने ती जवळच असलेल्या आईला बिलगली...ती कोण होती? माझ्याविषयी एवढी आत्मियता का? की सगळ्यांशीच ती इतकं छान वागते? गतजन्मातील माझी कोण होती का ती? असे अनेक प्रश्न मला पडले .. चिऊ आईसोबत गेली. जातानाही माझ्याकडं पाहून प्रसन्न हसली....कालपासून चिऊ काही डोक्यातून जाता जात नाही. माझ्या गुरुवर्यांनी सांगितलेली एक बाब माझ्या कायम लक्षात आहे. या जन्मात ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात ना आई, बहिण, वडील,मुलगा,मुलगी, मित्र, मैत्रीण एवढंच काय आपला बॉस, कामातील सहकारी हे गतजन्मातही आपल्यासमवेत असतात...फक्त त्यांचे रोल निराळे असतात. आपल्याशी न पटणारी पत्नी कदाचित गत जन्मात आपली खुन्नस असणारा मित्र असतो किंवा आपल्याशी खूप सूर जुळणा-या व्यक्ती आई, मुलगी अशा नात्यांत असतात. हा संच दर जन्मात कायम राहतो....त्या दृष्टीनेही मी विचार करतोय...चिऊ माझी कोण होती?...कोणीतरी होती हे मात्र नक्कीच नक्की....

No comments:

Post a Comment