Thursday, 5 June 2014

बँकांमध्ये घुसलेत दहशतवादी . . .!
- - - - - - -- - - - - - - - -- - - -- - - -- -

केंद्रीय वित्तीय गुप्तचर विभागाला (एफआययू) देशातील विविध बँकांमध्ये दहशतवाद्यांची सुमारे बारा हजार खाती असल्याचे आढळले असून देशाच्या निरनिराळ्या भागात बॉंबस्फोट घडवणा-या दहशतवाद्यांना आर्थिक रसद याच ख़ात्यांमार्फत मिळते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या दहशतवाद्यांना कोठून रसद मिळते? त्यांचे आर्थिक व्यवहार कोणत्या माध्यमातून होतात? या तपास यंत्रणांना नेहमी पडणा-या प्रश्नांचा उलगडा या ख़ात्यांमधून होऊ शकेल. कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या यासीन भटकळ या इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेच्या सूत्रधाराच्या तपासातून याबाबत काही ख़ळबळजनक खुलासा होण्याची शक्यता तपासी यंत्रणांना वाटते.
         
संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवणा-या ‘एफआययू‘ च्या या अहवालामुळे तपास यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. यासिन भटकळबरोबरच त्याच्या साथीदार दहशतवाद्यांच्या तपासातून या संदभार्तील अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना देशातील विविध क्षेत्रातून छुपी मदत मिळत असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. आता बँकिंग क्षेत्रातूनही त्यांना मदत मिळत असल्याचे लक्षात आल्याने तपास यंत्रणा चक्रावून गेल्या आहेत.
           देशात घातपाती कारवाया करणा-या दहशतवाद्यांना हवाला रॅकेटच्या माध्यमातून अर्थपुरवठा होतो, हे यापूर्वी काही घटनांवरून उघडकीस आले आहे. त्याला छेद देणारी थेट बँकांच्या माध्यमातूनच त्यांचे व्यवहार चालतात ही माहिती सुरक्षाव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण निर्माण करणारी मानली जात आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या अबू जिंदाल याने पन्नास लाख रुपये हवाला रॅकेटच्या माध्यमातून कुटुंबीयांना पाठविले होते. तथापि, त्याबाबतची माहिती आधीच मिळाल्यामुळे मनमाड येथे ही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली होती. त्यामुळे "एफआययू'च्या अहवालावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात उच्छाद मांडलेल्या दहशतवाद्यांचा आर्थिक कणा मोडला तरच त्यांच्या कारवायांवर मयार्दा येऊ शकतील. त्यासाठी तपासयंत्रणा अथक प्रयत्न करीत आहेत. विदेशातून त्यांना भारतात हवाला रॅकेटच्या माध्यमातून पैसे मिळतात. पण, या दहशतवाद्यांचे देशांतर्गत व्यवहार कोणत्या माध्यमातून चालतात?असा मोठा प्रश्न सुरक्षा यंत्रणांना पडला होता. त्याची उकल "एफआययू'च्या अधिका-यांनी अथक प्रयत्नांती केली आहे. या दहशतवाद्यांची खरी नावे निराळीच असतात. संघटनेमध्ये त्यांना वेगळे नाव दिले जाते. अनेकदा ही टोपणनावे एकापेक्षा अधिकही असतात. त्यामुळे दहशतवाद्यांच्या त्याचे ख-याा नावाबाबत आणि त्यांच्या बँकेतील नावाबाबत संभ्रम असतो. अबू जिंदाल या नावाने वावरत असलेल्या दहशतवाद्याचे ख़रे नाव जबिउद्दीन अन्सारी आहे. त्याचे बँकेत नाव आणखी भलतेच आहे. "एफआययू'ने अशा बोगस खात्यांबाबत सखोल तपास हाती घेतला आहे. त्यामध्ये देशभरातील प्रमुख बँकांच्या खात्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या बँकांमधील संशयास्पद व्यवहार असलेल्या खात्यांची माहिती मागविण्यात आली असून त्याची कसून पडताळणी केली जात आहे. अनेक खातेधारकांनी सादर केलेली कागदपत्रे बोगस असल्याचे तपासात दिसून आले. काहींचे पत्ते बनावट आहेत. काहींची छायाचित्रे, वीजबिले, शिधापत्रिका आणि तत्सम कागदपत्रांच्या छायांकित प्रती तसेच रहिवास पुराव्यादाखल सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खात्यांवरून अनेक मोठे आर्थिक व्यवहार केले गेले असल्याचेही निदर्शनास आले आहे. देशभरातील निरनिराळ्या बँकांमध्ये अशी तब्बल बारा हजार बोगस खाती असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. छोट्या खेडेगावांतील नागरी बँकांपासून महानगरांमधील बहुराष्ट्रीय बँकांमध्ये असलेली ही खाती गोठविण्यात आली आहेत. बँकांमधील सतर्क अधिका-यांमुळेच अशा खात्यांचा तपशील "एफआययू'ला मिळाला आहे. खातेदाराविषयी सर्वांगीण माहिती मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिलेल्या निदेर्शानुसार संबंधितांना विशिष्ठ प्रकारचा अर्ज(केवायसी)बँकेला भरून द्यावा लागतो. त्यातूनही पळवाट काढून खोट्या दस्ताऐवजांद्वारे दहशतवादी संघटनांशी संबंधितांनी खाती उघडली आहेत. त्यामध्ये आवश्यक तेव्हा या संघटनांतील उच्चपदस्थ अथवा आश्रयदाते रकमांचा भरणा करतात. त्या पैशाच्या सहाय्यानेच हे दहशतवादी घातपाती कृत्ये घडवून आणतात. फरारी असतानाच्या काळातही आर्थिक स्त्रोत म्हणून त्यांना या बँकांचा फायदा होतो. सर्व प्रकारच्या बँकांबरोबरच वित्तसंस्था, शेअरदलाल, संपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांच्याकडून "एफआययू'ला अन्य पाच हजार संशयास्पद खात्यांची माहिती मिळाली आहे. बनावट खात्यांची संख्या या वषीर्ही वाढण्याची भीती दहशतवाद प्रतिबंधक विभागातील अधिका-यांनी व्यक्त केली आहे. या संशयास्पद खात्यांपैकी बहुतेक खाती दहशतवाद्यांशी संबंधित आहेत. काही खात्यांचा संबंध थेट इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
दहशतवादी संघटनांनी शेअरबाजारात पैसे गुंतवले असल्याची दहा प्रकरणे यापूर्वी उघडकीस आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एस.एम.मीना यांनी यापूर्वीच दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर संसदेत माहिती देताना मीना यांनी हा उल्लेख केला होता. यास्वरुपाची 2008-2009 मध्ये पाच, तर2009-2010मध्ये चार प्रकरणे उघडकीस आली होती, असेही त्यांनी नमूद केले होते. बँकांमध्ये आढळलेल्या बनावट खात्यांपैकी किती खाती दहशतवाद्यांची हे नेमकेपणाने स्पष्ट झाले नाही. मात्र, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या म्होरक्यांची देशातील बहुतेक सर्व शहरांमधील बँकांमध्ये खाती असावीत, असा संशय दहशतवाद प्रतिबंधक विभागातील अधिका-यांनी व्यक्त केला आहे. अर्थात ही खाती काढताना त्यांना बँकांमधीलही काही कर्मचारी अथवा अधिका-यांनी सहकार्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तपासाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी कृत्यांना अप्रत्यक्षपणे मदत करणा-या बँकांमधील या अतिरेकी वृत्तीच्या मंडळींचे बुरखे लवकरच समाजापुढे उघड होतील.

No comments:

Post a Comment