Sunday, 12 October 2014

समांतर दुनियादारी
- - - - - - - - - - - - 
रात्रीचं जेवण उरकून किशोर गॅलरीत आला. पनामा शिलगावली. शांतपणे झुरके घेत तो खाली पाहत होता. त्याच्या रागविलास आणि शेजारच्या विश्वविलास या दोन सोसायट्यांमधल्या बेचक्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून श्रमिकांची वस्ती वसली होती. एका रात्री ट्रकमधनं माणसं आली आणि पालं बांधून राहूही लागली..सोसायटीवाल्यांनी विरोध केला..मग बिल्डरची माणसंच आली सांगत...आपलेच कामगार आहेत...शेजारची साईट होईपर्यंतच राहणार आहेत..काळजी करू नका...सुरूवातीला सगळ्यांनाच जड गेलं त्यांना स्विकारणं...पण हल्ली काहीशी सवय झाली होती.

तसा त्या लोकांचा सोसायटीवाल्यांना काही त्रास नव्हता.. तरीही अनेकांना सोसायटीला खेटून असलेली ती वस्ती खुपायची..किशोर तसा कामगारांच्याच चाळीत लहानाचा मोठा झालेला... त्यामुळं त्याला काहीशी आस्थाच होती या वस्तीवाल्यांबद्दल. तिथल्या चिमुरड्यांचं खेळणं, बागडणं मस्त वाटायचं त्याला. नळावर कडाकडा चालणा-या भांडणांची गंमत वाटायची. त्यांचे सण, उत्सव जोषात साजरे करायची त-हा आणि शोकही व्यक्त करण्याची पद्धत त्याच्या मनात ठसली होती....फ्लॅट संस्कृतीत आणि चाळीच्या जीवनातला एक मूलभूत फरक त्याच्या लक्षात आला होता...लोक जरा मध्यमवर्गाची पातळी ओलांडून उच्च मध्यमवर्गिय किंवा त्यावरच्या स्तरात सरकले ना..,जनातून अभिजनात किंवा अभिजनातून महाजनात सामील झाले ना...की बहुतांश लोक आपल्या भावना व्यक्त करायला बिचकतात..भावनांचं प्रदर्शन टाळण्याचा यत्न करतात....मग तो आनंद असो वा दु:ख़..भावनांचा असा अप्रत्यक्षपणे कोंडमारा होत असतो फ्लॅट्सच्या या सिमेंटच्या भिंतींत...कॉंक्रीटच्या या जंगलात आपलीच माणसं परकी वाटू लागतात...त्यांच्यात आणि शाळेतले सवंगडी, मित्र-मैत्रिणी, नात्यागोत्यातले लोक यांच्यात एक दरी पडू लागते...मोबाईल, वॉट्सअप् आणि फेसबुकसारख्या आभासी जगात ते अधिक रममाण होऊ लागतात.... सोशल मिडिया वाईट आहे असं आजिबात नाही.. याउलट त्याचे खूप चांगले फायदे आहेत....या माध्यमामुळं किती तरी दिवस आपण शोधात असलेले मित्र अवचित गवसतात...हरत-हेची माहिती हरघडीला मिळत राहते...चार चांगले समविचारी नवे मित्र मिळतात...निरनिराळ्या विचारांच्या मित्रांशी चांगले संवाद घडतात.. मेंदुची मशागत होत राहते...विचारांना, लिखाणाला नवे विषय सापडतात...माणूस अधिक हरहुन्नरी होऊ लागतो...एकप्रकारचा आगळा आत्मविश्वास त्याच्या चेह-यावर झळाळू लागतो....पण, कुठं थांबायचं हेच कळलं नाही, तर मात्र गडबड होते...माणूस फक्त या आणि याच सोशल मिडियावर विसंबून राहू लागला, याचं व्यसन जडलं तर मानसिक संतुलन ढळू लागतं..मनाची चिडचिड होऊ लागते...विरोधी मत ऐकण्याची, वाचण्याची सहनशक्ती राहत नाही..सोशिकपणा कमी होतो...वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासारखे प्रकार घडतात...टोकाचा दुराग्रहीपणा, हेकटपणा अंगी येतो...सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय बोलतोय, काय लिहितोय..याचंही भान हळूहळू जाऊ लागतं आणि इथल्या कथित भाटांमुळं आपल्या ते लक्षातही येत नाही....कारण या दुनियेत आपण आपल्या निंदकांना प्रवेशच देत नाही...निंदकाचे घर असावे शेजारी असं संत तुकाराम महाराज का म्हणाले असतील, हे आता अधिक ठळकपणे जाणवू लागलंय....या आभासी जगातील, आभासी व्यक्तींच्या रागलोभाचे परिणाम प्रत्यक्ष जीवनावर पडणं वाईटच की...त्याची तमा न बाळगता लोक या माध्यमांच्या व्यसनातून मुक्त काही होत नाहीत..काहींना ते हेतूत: व्हायचं नसतं....त्यामुळेच, प्रसंगी घरचेदारचे पाश सोडून कित्येकजण या माध्यमांच्या आणि त्यातून संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या नित्य संपर्कात राहतात याचंच अजब वाटतं..

राकेश सांगत होता किशोरला.... बघ ना...लिनाला म्हणजे त्याच्या बहिणीला एक मुलगा, एक मुलगी आहे...मुलगा मोठा...नववी-दहावीला असेल..फेसबुक वगैरे सगळ्यात आक्टीव्ह आहे...पण झालं काय की काहीतरी घोटाळा झाला आणि लिनाला अनेक वर्षांनी पुन्हा दिवस गेले..नवरा-बायकोच्या गप्पांमधून मोठ्याला हे समजलं....डॉक्टरांनी मूल होऊ देण्याचाच सल्ला दिला..पुन्हा मुलगा झाला...आता हे अनेकांच्या आयुष्यात घडत असतंच की....पण मोठ्याला भलताच राग आला..त्याने फेसबुकच्या वॉलवर एका बाळाचं चित्र टाकून लिहिलं....आय बिकम ब्रदर...( नॉट बाय प्लानिंग...बट बाय आक्सिडंट...)...काय बोलायचं?? लिनाला आणि तिच्या नव-याला लाज आणली पोरानं....मग बदड बदड बदडला त्याला....
किशोर म्हणाला, अरे हे काहीच नाही...आमच्या खाली एक तरूण जोडपं राहतं..रणजीत आणि अनन्या...अधूनमधून कधीतरी दिसतात...पाच-सात वर्षांची ओळख पण हाय-बाय पलिकडं त्यांच्याशी फारसं बोलणं नाही..बाकी फेसबुकवर मारे बराचवेळ चॅटींग करतो माझ्याशी. प्रत्यक्ष दिसल्यावर चेहरा मख्ख....मध्यंतरी बरेच दिवस अनन्या दिसली नाही....रणजीत दिसायचा...त्याला विचारलं ..किधर हैं बहेनजी? तर म्हणाला मेरा फेसबुक स्टेटस नही देखा क्या? म्हणालो नाही...हमें लडका हुवा हैं...चेहरा मख्खच...मग जरा तपशील विचारला..आफीसला गेल्यावर पाहिलं त्याचं स्टेटस...जन्म झाला त्याच दिवशी काही तासांनी नवजात बाळाचा फोटो आणि हॅपी बर्थ डे....? अरे बाळ झालंय ना? मुलगा-मुलगी काही असो..करा ना जल्लोष.. त्याच्या जन्माचा...घाला ना मस्त धिंगाणा..वाटा पेढे-बर्फ़ी, जिलेबी..काहीही गोडधोड वाटा...अरे आमच्या चाळीत ना बाई गर्भार राहिल्यापासूनच सा-यांचं लक्ष असायचं...तिच्या बाळंतपणात अख्खी चाळ यायची मदतीला...आणि दवाखान्यातून बाळासह आलेल्या बाळंतिणीवर चाळीतल्या बायका भाकरतुकडा ओवाळून टाकायच्या...सारी चाळकरी मंडळी बाळ-बाळंतिणीची काळजी घ्यायचे...खूप जल्लोष असायचा..चाळीला लायटींग काय..स्पीकर्स काय..काय धमाल विचारू नका...
हे झालं आनंदाचं...पण दु:खाच्या प्रसंगीही वस्त्यांमध्ये असाच खरा एकोपा... ख-या रसरशीत भावना दिसायच्या...मध्यंतरी पाडळकर मावशी गेल्या आणि कुणी काही सांगायच्या आत कॉलनीतल्या वाण्याचं दुकान बंद...गिरणी बंद झाली...व्यवहार मंदावले...कामावर गेलेले चाकरमानी पुन्हा घराकडं धावले. तरूण पोरांनी अंत्यसंस्काराची तयारी केली...मावशींच्या घरात शोकाला पारावर उरला नव्हता .. चाळीवरही शोककळा पसरली होती....कितीतरी मुलाबाळांना मावशींनी अंगाखांद्यावर खेळवलं होतं....चिऊकाऊचे घास भरवले होते....मावशींच्या मुला-मुलींनी रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं..त्यांना सावरताना शेजा-यापाजा-यांच्याही डोळ्यांतलं पाणी सरत नव्हतं...चाळीतल्या एका कुटुंबाशी मावशींच्या मुलांचं मागे कधीतरी भांडण झालं होतं...त्यांच्यात अबोला होता....पण त्या दिवशी अंत्ययात्रेत त्याच कौस्तुभने मावशींना त्यांच्या मुलाच्या बरोबरीनं खांदा दिला...त्याच कुटुंबानं भात आमटी करून मावशींच्या नातलगांना भरवली...चाळीत दुपारी कुणाच्याच घरात चूल पेटली नव्हती......महिन्याभरानंतर जमदाड्यांच्या मायाला मुलगी झाली अन त्यानंतरच मावशींच्या शोकाचं सावट सरलं....
हे एक चित्र झालं.... आणि परवाचं भलतंच... प्रीतीची आई गेल्याची पोस्ट फेसबुकावर पाहिली..खूप वाईट वाटलं..अखेर,कुणाची का असेना माऊलीच ना ती....पण लगेच दोन दिवसांत प्रीतीची...हो...प्रीतीचीच पोस्ट...आई गेल्याची वेदना व्यक्त करणारी कुठल्याशा कवितेची ओळ..? अक्षरश: किव करावीशी वाटली...अरे काय लाज, शरम आहे की नाही?? आई गेलीय ना तुझी??? काही शोक, सुतक आहे की नाही?? लगेच निघाली फेसबुकवर?? शोक व्यक्त करायला?? ही तुमची पद्धत? हे संस्कार? ही संस्कृती तुमची?? जनाची नाही तर मनाची तरी काय वाटते की नाही? अरे आपले भाऊ-बहिण आहेत...काका मामा आहेत...मित्र-मैत्रिणी आहेत...मुल बाळं आहेत...रड ना बिंधास्त कुणाच्याही खांद्यावर डोकं ठेवून....रडायची लाज वाटते की खांदा भरवशाचा वाटत नाही....ख-या जगातल्या ख-या माणसांवर विश्वासच नाही? आणि काय तर माझे फेसबुकचे फ्रेंडस अमके अन तमके..माझ्या फोटोला एवढ्या लाईक मिळाल्या अन इतक्या कमेंट मिळाल्या...करायचंय काय? तुम्ही तुमच्या वास्तव जागातून बाजूला पडत चाललाय... उपयोग काय या सा-याचा? तुमचे डोळे तेजहीन झालेत..चमक गेलीये....वय झालंय...तरी आपलं मॉडेलिंग करीत असल्यासारखे फोटो टाकता..शरम नाही वाटत?? ज्या माऊलीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं...शिक्षणासाठी खस्ता खाल्या...नोकरीसाठी वणवण केली....तिच्या जाण्याच्या भावना तुम्ही अशा प्रदर्शित करता? अहो काळजाचा तुकडा नव्हे काळीजच गेलंय तुमचं.... याची तरी जाणीव झालीय का? की पूर्ण बथ्थड झाला आहात??? कठीण आहे बुवा सगळं.....दम लागला राकेशला बोलून...डोळे तांबरले होते...त्याचा संताप स्वाभाविक होता.....

राकेशचं बोलणं ऐकून किशोर अस्वस्थ झाला....दुसरी सिगारेट शिलगावत किशोर म्हणाला, '' हे बघ काय आहे ना...हे लोक समांतर जगातच अधिक जगताहेत असं वा्टू लागलय मला...तसं तर कुठल्याही भावनेचं प्रदर्शन फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मिडियावर करणं गैर नाही....पण टायमिंग महत्वाचं...म्हणजे आनंदाचा क्षण तुम्ही पुरेपूर जगा..मनसोक्त उपभोगा...मुलं बाळं झाली...त्यांचे वाढदिवस असले किंवा काहीही आनंदाचे सण ते उत्सवासारखे साजरे करा....आणि मगच सोशल मिडियावर जा...काहीच हरकत नाही...पण, त्या लेकराचा वाढदिवस आधी चांगला साजरा करा...छान केक भरवा..आधीच फेसबुकसाठी कोणता फोटो चांगला येईल हा विचार करून मग त्यानुसार वागणं मात्र आजिबात तर्कसंगत नाही....शोकाचंही तसंच आहे....मी नाही म्हणत की कोणतंही दु:ख कायमच उराशी कवटाळून धरा...पण, दु:खाचं असं जाहीर प्रदर्शन पटतं का हो मनाला...स्मशानातल्या गव-यातली धुगधुगी अजून गेली नाही अन तुम्ही फेसबुकवर त्याचं प्रदर्शन करता? खरंच पटत नाही....या समांतर जगात महत्वाच काय आहे माहितीय?...इथं आपले मित्र आपल्याला निवडता येतात....मैत्रिणी निवडीचं स्वातंत्र्य आहे...कुणाशी बोलायचं हे ठरवता येतं...एखादा आपल्या तालावर नाचत नाही म्हटल्यावर त्याला ब्लॉक करता येतं..अनफ्रेंड करता येतं....आपले फोटोंवर पिकल्या पानांच्या वाहवा मिळवून खोटं समाधान मिळवता येतं...इकडच्या तिकडच्या कविता पेरून कौतुक मिळवता येतं...भलीभली मंडळी लोचटपणे आपल्यामागं कशी येतात याचा वृथा अभिमान मिरवता येतो....लाईक्स आणि कमेंटसच्या आकडेवारीवरून आपलं स्टेटस वाढलं असल्याची भावना मनाला खोटी उभारी देते..इथं खाष्ट पती किंवा पत्नी नसते... करडी नजर ठेवणारे सासु सासरे नसतात...टोमणे मारणा-या नणंदा नसतात...त्यांच्या रुपात भेटणा-या मित्र-मैत्रिणींना अनफ्रेंड करता येतं...इथल्या आभासी जगात भेटणारे दादा, काका, मामा, ताया आणि सर्वात महत्वाचे
' डिअर्स ' यांच्यात हरवलेले कित्येक लोक ख-याखु-या आयुष्याकडं,वास्तव जगातील ख-या नात्यांकडं पाठ फिरवतात हे कटुसत्य आहे. त्यांना पतीची, पत्नीची कुरकुर नको असते..सासु-सास-यांचे मोलाचे सल्ले नको असतात...नणंदेचे टोमणे नको असतात....काका-मामा-मावश्यांचे संबंध नको असतात....ख-या आयुष्यातील त्यांना वाटत असलेल्या कथित जाचासाठी ही मंडळी या समांतर दुनियेत इतकी टोकाची वाहवत जात असावीत...त्यांची ही समांतर दुनियादारी चिंताजनक आहे हे नक्की...

गप्पा थांबल्या होत्या..खालून जोरजोरात हलगीचे, ढोलाचे ताशांचे आवाज येऊ लागले होते...किशोरने राकेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं...अरे, ती जमनाबाई होती ना म्हातारी.... ती निवर्तलीये... संध्याकाळपासूनच काही गडबड चालली होती तिथं... मग ढोल -ताशे कशाला?
त्यांच्यात पद्धत आहे....पार्थिव ढोल ताशे वाजवत नेतात.....
आणि गेल्या आठवड्यात सकाळ-सकाळी कसले आवाज येत होते?
अरे ती आपल्या सोसायटीत रखमा येते ना? मोलकरीण...तिच्या मुलीला बाळ झालं....हे लोक असाच एंजॉय करतात...दिवसभर राडा चालला होता...ढोल काय.. ताशे काय...गुलाल काय...स्पीकर काय..सा-या वस्तीला शिरापुरीचं जेवण काय ..फुल्ल कल्ला चालला होता....
किशोर विचार करीत पाहत बसला....वाजंत्री वाद्ये वाजवत होते...त्यामागून खांद्यावर तिरडी घेऊन माणसं चालली होती...त्यामागून जवळपास अख्खी वस्ती जमनाबाईला अखेरचा निरोप द्यायला निघाली होती. काही बाया तोंडात पदराचा बोळा कोंबून हमसाहमशी रडत होत्या...काहीजण खांद्यावरच्या टॉवेलचा शेव तोंडात कोंबून रडू दाबत होते.. एक बाई पदराने मर्तिकाला वारं घालत होती..काहीजण फुले ...काहीजण चिल्लर उधळत होते....अवचित पावसाची हलकी सर आली...काही बाया पुढे धावल्या....साड्यांचे पदर मर्तिकावर धरत त्या झपाझप पुढे चालू लागल्या....आकाशातून सरी अधिक जोमाने कोसळू लागल्या होत्या....आणि किशोरच्याही डोळ्यांतील सरी त्यात मिसळल्या....

Monday, 25 August 2014

सीबीआयची नामुष्की
- - - - - - - - - - - - - -- 
सतीश शेट्टीतळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येतील मारेकरी सापडत नाहीत, असे सांगून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी मावळ न्यायालयात क्लोजर रिपोर्टअर्थात तपास बंद करीत असल्याचा अहवाल सादर केला. सीबीआयचे अधिकारी पुण्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या निखिल राणे या तरुण बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचाही छडा लावू शकले नाही. तरीदेखील गतवर्षी पुण्यातच झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपासही नुकताच सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर सीबीआयचा आजचा हा पवित्रा अनपेक्षित, धक्कादायक आणि नामुष्कीचाच आहे असे म्हणावे लागेल. सीबीआय ही सर्वोच्च मानली जाणारी तपास यंत्रणा दिवसाढवळ्या झालेल्या हत्येसंदर्भातही शरणागती पत्करते हे चित्र अजिबात चांगले नाही. याउलट चलाख गुन्हेगारांपुढे सीबीआय सपशेल लोटांगण घालते हाच संदेश त्यांच्या आजच्या कृतीतून समाजात पसरण्याचा धोका आहे. त्यामुळेच ही यंत्रणा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तरी हत्येचा छडा लावण्यात कितपत यशस्वी होईल, ही शंका गडद झाली आहे.

सतीश शेट्टी यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक प्रकरणे उघडकीस आणली. प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार, शासकीय आदेशांचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम केल्याची प्रकरणे आणि तत्सम घोटाळे त्यांनी चव्हाट्यावर आणले होते. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील टोलनाक्यांशी संबंधित एका बड्या कंपनीचाही त्यामध्ये समावेश होता. परिणामी, शेट्टी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती, परंतु पोलिसांनी संरक्षण देण्यापूर्वीच १३ जानेवारी २0१0 ला भल्यापहाटे भररस्त्यात त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात बड्या धेंडांचे हात गुंतल्याची चर्चा पहिल्या दिवसापासून होती. बडे राजकीय नेते, उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि माफियांची अभद्र युती या हत्येमागे असल्याची चर्चा होती. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास खरोखरच निष्पक्षपातीपणे होईल का, याबाबत शंका सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. दुर्दैवाने ती खरी ठरली आहे, असेच आता म्हणावे लागेल. शेट्टी यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास प्रारंभी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केला. त्यावेळी काही स्थानिक व्यक्तींना अटक करण्यात आली होती. पण, न्यायालयात हा तपास टिकू शकला नाही. नि:पक्षपातीपणे तपास व्हावा या उद्देशाने शेट्टी कुटुंबियांच्या याचिकेनुसार हा तपास 'सीबीआय'कडे सोपविण्यात आला. 'सीबीआय' ही पूर्वीपासूनच देशातील उत्कृष्ट आणि सर्वोच्च तपास यंत्रणा मानली जाते. देशविदेशात या यंत्रणेबद्दल कमालीचा आदर आहे. कोणताही गुन्हा सीबीआयकडे तपासाला दिला की त्याची तड लागणारच, असा विश्‍वास जनसामान्यांना वाटतो. त्यामुळेच शेट्टी यांच्या हत्येचे गूढ नक्क ीच उलगडेल आणि मारेकरी गजाआड जातील, असे अनेकांना वाटत होते. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी तपासासाठी शक्य ते सर्व प्रयकेले. शेकडो सराईत गुन्हेगारांचे, संशयितांचे जबाब नोंदवले. 'आयआरबी'कंपनीतील उच्चपदस्थांच्या पॉलीग्राफ चाचणीची मागणी केली. पण हाती काही लागले नाही. मारेकर्‍यांबाबत काहीही माहिती मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी अखेर सोमवारी तपास बंद केल्याचा अहवाल मावळ न्यायालयात सादर केला. यापूर्वी फेरतपासाची याचिका सीबीआयने न्यायालयात सादर केली होती. ती मान्य केल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत, तपास न करताच हा तपास बंद करीत असल्याचा अहवाल देणे हे काहीसे संशयास्पद आहे. या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या? कोणाचा दबाव आहे किंवा कसे? पोलिसांच्या आणि सीबीआयच्या तपासामध्ये साम्य असलेल्या आणि फरक असलेल्या बाबी कोणत्या? हे सारे पारदश्रीपणे जनतेसमोर यायला हवे. अन्यथा आपल्याला कोणीच वाली नाही अशी नैराश्याची भावना माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. तसे तर अनेक प्रकरणांमध्ये सीबीआयच्या हाती धुपाटणेच लागते. या परिस्थितीत अधिक वेळ न दवडता या विभागाकडे प्रलंबित असलेल्या अन्य प्रकरणांचा तपास करावा असा संकेत आहे. त्यानुसार या अधिकार्‍यांची भूमिका उचित असेलही; पण परिवर्तनवादी संघटनांसाठी, कार्यकर्त्यांसाठी ही नक्कीच धक्कादायक घटना आहे. राजरोस झालेल्या हत्येचे आरोपी सापडत नाहीत, म्हणून सर्वोच्च तपास यंत्रणाच हात वर करीत असेल, तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? कोणत्या यंत्रणेकडून तपासाची अपेक्षा करावी? या राज्यात, या देशात आम्ही कोणाचीही हत्या घडवू शकतो या भावनेने गुन्हेगारांचे, मनोधैर्य उंचावणार आहे आणि हीच सार्‍या समाजासाठी अतिशय धोकादायक व चिंतेची बाब आहे. समाजमन चिंतीत करणारी, अस्वस्थ करणारीच ही घटना आहे. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा एखाद्या घटनेचा तपास लागत नाही म्हणून तपास बंद करण्याचा अहवाल सादर करते, हीच मुळी शरमेची बाब आहे. या घटनेचा दुसरा अर्थ म्हणजे या तपास यंत्रणांमधील अधिकार्‍यांचे प्रशिक्षण कालबाह्य ठरते आहे. तपासी अधिकार्‍यांपेक्षा गुन्हेगार अधिक चलाख झाले आहेत, हेच कटु सत्य यातून उघड झाले आहे. तपास यंत्रणांमधील अधिकार्‍यांना अधिक सखोल व कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, हेच यातून स्पष्ट झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, 'सीबीआय'या शक्तिमान संघटनेने शेट्टी यांच्या हत्येच्या तपासात हार का मानली असावी, याचीही कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. कोणत्याही गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांनी करणे आणि सीबीआयने करणे यात काही मूलभूत फरक आहेत. स्थानिक पोलिसांना संबंधित घटनेची पार्श्‍वभूमी नेमकेपणाने लक्षात येते. स्थानिक गुंड, गुन्हेगारी टोळ्यांची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असते. राजकीय पक्ष-संघटनांच्या नेत्या कार्यकर्त्यांशी संपर्क असतो. खबर्‍यांचे भक्कम जाळे असते. त्याचबरोबर अन्यत्र नेमणुकीला असलेल्या पोलीस अधिकार्‍यांशी मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्यामुळे तपासासाठी आवश्यक असणार्‍या घटकांबाबत औपचारिक व अनौपचारिक माहिती संकलीत करणे शक्य असते. तपासाची व्याप्ती मोठी असली, तरी सामुहिक प्रयत्नांनी गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तिढा सोडवता येतो. याउलट, सीबीआयकडे स्वत:चे मनुष्यबळ अल्प असते. स्थानिक पोलिसांची मदत घेऊनच त्यांना तपास करावा लागतो. बहुतांश तपास अधिकारी परप्रांतीय असतात. त्यामुळे, घटनेची सखोल माहिती करून घेण्यातच त्यांना मोठा अवधी लागतो. तपासाबाबत केवळ औपचारिक माहितीवरच त्यांना अवलंबून राहवे लागते. स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय तपासातील कोणताही टप्पा ते ओलांडू शकत नाहीत. त्यामुळे केवळ 'अधिकार' हेच त्यांचे शस्त्र ठरते व या शस्त्राचा स्थानिक तपासामध्ये फायद्याऐवजी तोटाच होण्याची अधिक शक्यता असते. मानवत हत्याकांड, जोशी-अभ्यंकर हत्याकांड, जेजुरीतील मूर्ती चोरी प्रकरण, माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची हत्या, पुण्यातील र्जमन बेकरी स्फोट यांसारख्या राज्यातील कित्येक संवेदनशील गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी सामुहिक प्रयत्नांतूनच लावला आहे. त्याच धर्तीवर, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचाही तपास लावण्यासाठी पोलिसांचे प्रयसुरू होते. वर्षभरानंतरही डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी हाती लागू शकलेले नाहीत. तरीही या प्रकरणाचा पोलिसांनी केलेला तपास राज्य पोलीस दलासाठी महत्वाचा दस्तऐवज ठरेल. अक्षरश: कोट्यवधी फोन कॅाल्सची पडताळणी, हजारो गुन्हेगारांना ताब्यात घेऊन करण्यात आलेला हा तपास अभूतपूर्वच म्हणावा लागेल. ती कल्पना असल्यामुळेच हा तपास पोलीस दलाकडून काढून घेऊन स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यास उच्चपदस्थ अधिकारी व राजकीय नेते नाखुष होते. परंतु, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमुळे गेल्या महिन्यात हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. स्थानिक पोलीस व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) छडा न लागलेल्या निखिल राणे या बांधकाम व्यावसायिक तरुणाच्या खुनाचा तपास तीन वर्षांपूर्वी सीबीआयकडे वर्गकरण्यात आला होता. हाही तपास जवळपास थांबवण्यात आला, हे येथे लक्षात घ्यायला हवे. राणे आणि शेट्टी यांच्या हत्येचे मारेकरी शोधण्यात अपयशी ठरलेली सीबीआय डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तरी छडा लावू शकेल का, याबाबत सुरुवातीपासून घेतली जाणारी शंका आजच्या घडामोडीने अधिक गडद झाली आहे, हे निश्‍चित. 

पवनचक्क्यांनी घडू शकते 'माळीण'
- - - - - - - - - - - -- - - - - - - - - - 
माधवराव गाडगीळ ....अवघं जीवन पर्यावरणाच्या जतनासाठी व संवर्धनासाठी अवघं आयुष्य झोकून दिलेलं एक ऋषितल्य व्यक्तिमत्व..पर्यावरणाची जपणूक हाच त्यांचा ध्यास. अफाट अभ्यास...गाढा व्यासंग....देशभर त्यांची भ्रमंती सुरूच असते....पर्यावरण चळवळीसाठी मग तो उजनीतील असो वा केरळमधील, भीमाशंकरच्या एनेरॉल असो वा गोव्यातील कॅसिनो ....ते वयाच्या 72 व्या वर्षी तितक्याच जोमाने आंदोलनात उतरतात... देशभरातील तळागाळातील माणसांशी, कार्यकर्त्यांशी दाट संपर्क. पर्यावरणविषयक कोणतीही घटना त्यांच्या नजरेतून सुटत नाही...आणि त्याची तड लावण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात..
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाच्या पश्चिम घाटाच्या सर्वंकष अभ्यासासाठी समितीचे ते अध्यक्ष होते. .. त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अहवाल शासनाला सादर केला आणि त्यातील शिफारसी वाचूनच राजकीय नेते गडबडले...सा-यांनीच एकमताने अहवाल फेटाळला...कारण सारेच हमाम मे नंगे ना? गाडगीळ साहेबांनी त्या अहवालात सॉलीड सालटं काढलीत एकेकाची... खाणींनी कशी हानी होते...केमिकल फॅक्ट-यांनी कसा निसर्गाचा -हास होतोय..जलाशयातील...नदींतील...समुद्रातील कशी नष्ट होत चाललीय..आणि हे सारे उद्योग कुणाचे आहेत...सारा सारा तपशील त्यांनी दिलाय...त्यांच्या या सा-या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेबाबत गाडगीळ त्यांच्याशी महत्वाचं होतं.. गेले आठवडाभर त्यांना भेटण्यासाठी खटपट करीत होतो..अखेर काल संधी मिळाली.

सकाळी त्यांच्याशी फोन झाला. त्यांनी येण्याची नेमकी वेळ सांगितली..घराचा सविस्तर पत्ता दिला..यापूर्वी त्यांना कधी भेटलो नव्हतो...व्यासंगी व्यक्तींना भेटताना मला कायम धाकधूक वाटते...कारण, ही मंडळी खूप मूडी असतात...जमलं तर ठिक...नाही तर बो-याच वाजतो आपला.... दिलेल्या वेळेला मी बरोब्बर त्यांच्या सोसायटीत दाखल झालो....दाराची बेल वाजवली...तेच गच्चीवरून आले...म्हणाले इकडूनच या....मस्त उंची..शिडशिडीत पण काटक बांधा....अंगात खादीचा स्वच्छ झब्बा आणि लेंगा.....घरात गेलो...सारी खोली कुठल्याकुठल्या इंग्लीश-मराठी पुस्तकांनी...अहवालांनी...भरली होती...मधोमध असलेल्या मेजाभोवती दोन खुर्च्या होत्या...त्यावर त्यांची डायरी..सहज लक्ष गेलं..त्या पानांवर माझं नाव स्वच्छ अक्षरात लिहून ठेवलेलं...आघळपघळ गप्पांत वेळ न घालवता मी थेट मुद्यावर आलो...कारण वेळ मर्यादीत होता..त्यांनी क्षणभर रोखून पाहिलं...मोबाईल फोन स्वीच आफ केला..एक-दोन क्षण डोळे मिटले आणि सलग सुरू झाला माहितीचा धबधबा..

अतिशय बेदरकारपणे, बेजबाबदारपणे जेसीबीच्या सहाय्याने केले जात असलेले डोंगरांचे सपाटीकरण, त्याच पद्धतीने पवनचक्क्यांसाठी केले जात असलेले रस्ते आणि देशाच्या निरनिराळ्या भागात सुरू असलेले खाणींचे उत्खनन या तीन प्रमुख कारणांमुळे पर्यावरणाचा -हास होतोय. निसर्गाचे संतुलन ढासळतेय..त्यातून 'माळीण'सारख्या दुर्घटना घडतात. नाशिकपासून पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या डोंगररांगांवर पसरलेल्या पवनचक्कया प्रकल्पांच्या माध्यमातून नेमकी किती वीज निर्माण होते हा ख़रंतर संशोधनाचाच विषय आहे. हे प्रकल्प पर्यावणवरणाला हानीकारक तर आहेतच्; पण त्यामुळे दरड कोसळण्यासारख़्या दुर्घटना
नकीच घडू शकतात. ‘माळीण‘ सारख़्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे प्रकल्प हटवले गेले पाहिजेत. पवनचक्कयांचे प्रकल्प प्रामुख़्याने सत्ताधा-यांचे आहेत. वीज मंडळांशी हातमिळवणी करून त्यांचा ‘उद्योग‘ चालतो. एरवी वीजनिर्मितीनुसार पैसे अदा करणे अभिप्रेत असताना या क्षेत्रातील ‘सुझलॉन‘ला मात्र ‘इन्स्टॉल्ड कपॅसिटीवर‘वर पैसे देत झुकते माप दिले, असा आरोप गाडगीळ साहेबांनी केला.

हे जसे नैसर्गिक संकट आहे,ना .. तशीच ती मानवनिर्मित आपत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ‘माळीण‘ साऱख़्या दुर्घटना राज्यात अनेक ठिकाणी घडू शकतात. धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये डोंगरमाथ्यांवर अनेक पवनचक्कया प्रकल्प आहेत. पवनचक्कयांची जड पाती व अनुषंगिक साधने वर वाहून नेण्यासाठी रस्ते तयार केले जातात. हे रस्तेही अतिशय बेदरकारपणे व निष्काळजीपणाने तयार करण्यात आलेत. त्यामुळं पर्यावरण धोक्यात आलंय... काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर येथील ‘इनरकॉन ‘ या पवनउर्जा प्रकल्पाची आम्ही पाहणी केली. तेथील परीस्थिती अतिशय चिंताजनक आहे. स्थानिक नागरिकांचे हक्क डावलत केला जाणारा हा विकास नेमका कुणाच्या हिताचा आहे? निसर्गाचा संहार करून केल्या जाणा-या कामांना काय विकास म्हणतात का? मी राज्याच्या, देशाच्या निरनिराळया भागात फिरत असतो. तेथील जनतेशी बोलत असतो. लोकांना सर्व काही समजत असतं..ते भाबडे नाहीत पण; त्यांना पर्यायही सापडत नाही.....गाडगीळ तळमळीने बोलत होते

गोव्यात कॅसिनोमुळे कॅसिनोमुळे कमालीचे सागरी प्रदुषण होतेय...समुद्रातील मासे नष्ट होऊ लागलेत.. मच्छिमारांपुढे करायचे काय? हा प्रश्न आ वासून उभा आहे. तेथे नव्याने सत्तेवर आल्यावर भाजपा सरकारने कोणतेही आश्वासन पाळले नाही. कॅसिनोंवर बंदी आणणे दूरच; आणख़ी कॅसिनोंना परवानगी देऊन त्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली. त्यामुळे प्रदुषण आणख़ी वाढलंय. आपल्याकडंही उजनीच्या जलाशयातील मासेमारीही प्रदुषणामुळे धोक्यात आलीय. कोकणात रासायनिक प्रकल्पामध्ये ११ हजारजणांना रोजगार मिळाला. पण, त्या प्रकल्पामुळे वशिष्ठी नदीत झालेल्या प्रदुषणामुळे मासेमारी संपुष्टात येऊन २० हजार मच्छिमार बेरोजगार झाले.याला विकास म्हणायचा का? आम्ही त्याविरोधात निदर्शने केली.पण, सरकारने ती दडपली. प्रदुषण करणा-यांना मोकळं रान आणि निदर्शकांना अटक हा कोणता न्याय झाला? . केरळमध्ये दगडख़ाणचालकांविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यावर ख़ाण माफीयांनी हल्ला केला. त्यामध्ये अनुपकुमार या तरुणाला प्राण गमवावे लागले. केरळ सरकारने चौकशी केली असता तेथील एक हजार ६५० ख़ाणींपैकी तब्बल दिड हजार ख़ाणी बेकायदा असल्याचं दिसून आलं. स्थानिक मंडळींना सगळं काही कळत असतं...ते निवडणुकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, सरकार बदलून पाहतात. .पण राजकीय नेते आणि सरकारी बाबू ही योजना अक्षरश: लादतात अशी परीस्थिती आहे. सारे सत्ताधारी सारख़ेच. सगळेच या व्यापात गुंतले आहेत..... अर्थात असं असली तरी माझा लोकशाहीवर विश्वास आहे...माध्यमे, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती होत जाईल..कधी ना कधी परीस्थिती बदलेल हे नक्की....गाडगीळ साहेबांच्या बोलण्यात ओतप्रोत आत्मविश्वास होता..
गाडगीळ साहेबांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास प्रत्येक शब्दांतून जाणवत होता....पर्यावरणाविषयी असलेली तळमळ दिसून येत होती...निसर्गाच्या -हासामुळे होत असलेली मनाची तगमग जाणवत होती....खरंच गाडगीळ साहेबांसारखी व्यक्तिमत्व फारच विरळी.

Tuesday, 24 June 2014

76 टक्के मार्क्स.....
-- - -- -- -- -- -- -- --
दहावीचा निकाल म्हटलं की पूर्वी फार धूम असायची....आम्ही शाळेत होतो तेव्हा पेपरवाल्यांकडं एक दिवस आधी निकाल यायचा....केसरी, तरूणभारत, संध्या, राष्ट्रतेज असे पेपर एक रुपया घेऊन निकाल सांगायचे...त्यासाठी लांबचलांब रांगा लागलेल्या असायच्या.....मी कॉलेजला असतानाच 90 च्या उत्तरार्धात लोकसत्तामध्ये रुजू झालो...तोवर आदल्या दिवशी निकाल सांगायची पद्धत रूढच होती....बोर्डामध्ये निकाल जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स असायची...तिथं निकालाचं सगळं पुस्तक मिळायचं....मग ओळखीपाळखीतल्या मुलांचे निकाल आम्ही आधीच पाहून ठेवायचो...आफीसला येईपर्यंत मुलांची, पालकांची बरीच मोठी लाईन लागलेली असायची. लोकसत्ता किंवा सकाळमध्ये निकाल सांगायला पैसे घेत नसत...पण, त्या दिवशी अनेकांचे फोन असायचे...निकाल विचारायला...आफीसची गर्दी वेगळीच...मग आम्ही खास एक माणूसच अपॉईंट करायचो पुस्तकातून निकाल शोधून सांगायला....पण अनेकदा त्याच्या नजरचुकीने अनेक घोटाळे होत...नापास विद्यार्थी पास, पास विद्यार्थी नापास....असं काहीही...आणि त्यातून अनेक बरेवाईट प्रसंग घडायचे...त्यातला साधारणत: 1998-99च्या सुमारास घडलेला एक प्रसंग कायमचा चटका लावून गेला...

दै. सकाळपासून मेहुणपुरा हाकेच्या अंतरावर...मेहुणपुरा म्हणजे अधिकांश पुणेरी ब्राम्हणांचे वास्तव्य असलेला अस्सल पुणेरी भाग...छान जुने वाडे...पुणेरी संस्कृती कधीकाळी इथे पुरेपूर नांदत होती...कालानुरूप इथेही आता वाडे पडून बिल्डींग उभ्या राहील्यात....इथे एका वाड्यात करंदीकरांचं कुटुंब रहायचं....छान.सुखवस्तू परिवार...यांचा कोणाला त्रास नाही...कुणाला यांचा त्रास नाही....करंदीकर मूळचे कोकणातले...तिथं काही नातलग होते त्यांचे...त्यामुळे उन्हाळ्यात त्यांच्या घरात आंब्याची आढी लागलेली असायची...उन्हाळ्यात अनेक नातलग भेटीला येत असत...त्या वर्षी त्यांचा नातू म्हणजे मुलीचा मुलगा रोहन सुटीसाठी मुंबईहून आला होता.....दहावीची परीक्षा दिलेला रोहन मस्त चुणचुणीत मुलगा होता.....लाघवी स्वभावाने आणि चुणचुणित वागण्याने दोन-चार दिवसांतच तो वाड्यात सर्वांच्या परिचयाचा झाला...गोरापान, काहीसा ठेंगणा पण तरतरीत रोहन दिवसभर वाड्यात हुंदडत असायचा...कधी क्रिकेट खेळ...कशी शनिवारवाड्यातच खेळायला जा...कुठे वाड्यातल्या पोरांबरोबर पोहायलाच जा...असा दिवसभर त्याचा कार्यक्रम चालायचा....वाड्यातल्या मुलांमधलाच तो होऊन गेला होता...करंदीकर अप्पाही त्याचे खूप लाड करायचे....

एके दिवशी रोहन काहीसा अस्वस्थ असल्याचं काही मुलांना जाणवलं....काही किरकोळ बाब असेल या समजुतीने त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही...पण, त्या दिवशी संध्याकाळपासून रोहन गायब झाला....सगळ्यांनी शोधलं त्याला.....वाडा सोडला, तर बाहेर त्याचे फारसे मित्र नव्हतेच...तरीही आजुबाजूच्या परिसरात त्याची शोधाशोध केली...पण रोहनचा ठावठिकाणा लागला नाही...करंदीकर आजोबांच्या काळजाचा ठोकाच चुकला...वाड्यातले सगळे रहिवासी, मुले एकत्र जमली... सर्वांनी पुन्हा एकदा सगळीकडे शोधाशोध सुरू केली...पण रोहन सापडला नाही....मग मात्र सारेच घाबरले....अवखळ रोहन मुद्दाम कुणाच्या घरात लपून बसलाय का हे ही सा-यांनी पाहिलं.....पण छे....त्याचा पत्ताच लागेना....वाड्यातल्या सा-या चालू-बंद खोल्या शोधून झाल्या...मग एकाच्या लक्षात आलं की अप्पांची एक खोली बंद आहे...ती नेहमीच्या वापरातली खोली नव्हती.....तिथं अप्पांनी आंब्याची आढी लावली होती....एकाने त्या खोलीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला...दार आतून बंद होतं....मग दोघातिघांनी ताकद लावून दरवाजा उघडला....बघतात तो काय!...... दहा बाय दहाच्या त्या खोलीत ट्यूब लाईटचा लख्ख् उजेड पसरला होता....आढी लावलेल्या अस्सल कोकणी आंब्यांचा घमघमाट सुटला होता....अन......खोलीच्या एका कोप-यात आढ्याला गळफास घेतलेला रोहनचा निष्प्राण देह लटकत होता.....

घडल्या प्रकाराने करंदीकर कुटुंबियांच्या शोकाला पारावार उरला नाही....वाड्यात शोककळा पसरली....पोलीस आले...रोहनचा देह तातडीने ससून रुग्णालयात हलवला....पण काहीच उपयोग नव्हता...त्याच्या कुडीतून प्राण केव्हाच निघून गेले होते.....वाड्यात राहूल तळेकर हा माझा शाळकरी मित्र रहायचा....त्याने फोन केला....'सकाळ'मधून मी लगेच तिथं गेलो...ती खोली पाहिली....रोहनचा फोटो पाहिला...काळजात चर्र् झालं....पण, त्यानं असं का केलं?? हा प्रश्न छळत होता सर्वांनाच.....मग हळूच एका मुलाने सांगितलं...दुपारी रोहन दहावीचा निकाल बघायला एका वर्तमानपत्राच्या आफीसमध्ये गेला होता...एक रुपया देऊन त्याने रिझल्ट पाहिला....परीक्षेत तो नापास झाला होता...आता आई-बाबांना, मित्रांना, वाड्यातल्या रहिवाशांना कसं तोंड दाखवायचं? या भावनेनं तो निराश झाला.... त्याला स्वत:ची कमालीची लाज वाटली असावी.....म्हणूनच इवल्याश्या वयात त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला असावा.........मी रोहनचा परीक्षा क्रमांकही टिपून घेतला....आफीसला गेलो.. रोहनच्या आत्महत्येची बातमी देऊन अस्वस्थ मनानं घरी निघालो....त्यावेळी रोहनचा नंबर माझ्याकडं असल्याचं लक्षात आलं....पुन्हा वर आफीसला गेलो....दिवसभर सर्वांनाच 'वॉन्टेड' असलेलं दहावीच्या निकालाचं पुस्तक आता एका कोप-यात एकाकी पडलं होतं....मी रोहनचा क्रमांक त्यात तपासून पाहिला...पुन:पुन्हा पाहिला....डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता....मग एकदोघांना तो नंबर देऊन त्यांना तपासून पहायला सांगितलं...मी बरोबर होतो.....रोहनला चक्क 76 टक्के मार्क्स पडले होते.....ते तर त्याला दुस-या दिवशी शाळेतही समजले असते...पण वर्तमानपत्राच्या आफीसमधून आगावू रिझल्ट पाहताना तेथील कर्मचा-याची काही गफलत झाली अन कोवळ्या रोहनचा हकनाक जीव गेला....पायाखालची जमीनच सरकल्याचा भास झाला...बुलेटला किक मारण्याचंही त्राण उरलं नव्हतं.....तितक्यात मोबाईल वाजला....राहूलचाच फोन होता...रोहनला 76 टक्के मार्क्स पडल्याचं त्याला सांगितलं...बातमी पुन्हा मागवून घेतली....'अनुत्तिर्ण विद्यार्थ्याची आत्महत्या' हा बातमीचा मथळा बदलला.....तपशील बदलला...' निकाल सांगण्याच्या गफलतीतून विद्यार्थ्याचा हकनाक बळी' असा मथळा देऊन मी बातमी बदलली.....इतक्या वर्षांनंतर आताही कुणाला 76 टक्के मार्क्स पडल्याचं समजलं की रोहनचा चेहरा डोळ्यासमोर येतो....
 —
वारी आणि पुणे
- - - - - - - - - - - - 

सुंदर ते ध्यान उभे वीटेवरी, कर कटावर ठेवुनियां
तुळशीचे हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर तेंचि रूप 
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया 
गोड तुझे रूप गोड, तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ
विठुरायाची कमालीची आस, ओढ असलेले लाखोंच्या संख्येने वारकरी दोन दिवस पुण्यात येतात आणि अतिशय धावपळीचे शहर अशी ओळख असलेल्या या शहराचा चेहरामोहराच जणू बदलून जातो. एरवी कामाधंद्याच्या धबडग्यात गर्क असलेले पुणेकर ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखीसमवेत जाणा-या वारक-यांच्या स्वागतासाठी हिरीरीने पुढे येतात. वारक-यांच्या भोजनासाठी, त्यांच्या सेवेसाठी, मदतीसाठी शहराच्या चौकाचौकात मंडप उभारले जातात. एरवी कधीही समाजकार्यात अथवा अन्य सार्वजनिक सण-उत्सवात सहभागी न होणारे चेहरे वारक-यांच्या सेवेत मात्र हमखास दिसून येतात. पालखी मुक्कामाला असलेल्या दोन दिवसांत शहरातील सर्व चित्र बदललेले दिसते. एकप्रकारच्या अनिवार उत्साहाबरोबरच आध्यात्मिकतेची आणि भक्तीरसाची जोड शहरातील वातावरणामध्ये दिसून येते. जात, पात, धर्म, भाषा, प्रांत असे सर्व भेद पार करून सर्व स्तरातील, सर्व वर्गातील लोक
वारक-यांच्या सेवेसाठी तत्पर असतात. पालखी सोहळ्यामुळे पुण्याचे वातावरणच बदलून जाते.
ज्येष्ठ महिना आला की वारक-यांना वारीचे वेध लागू लागतात. पांडुरंगाच्या दर्शनाची आस त्यांना असते. त्याचवेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखीच्या दर्शनाचे आणि त्यासोबत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेचे वेध सामान्य नागरिकांना लागतात. पंढरीच्या या वारीला चारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकोबारायांच्या घरातही वारीची परंपरा होती. तुकोबांच्या मृत्युनंतर त्यांचे धाकटे बंधू कान्होबा आणि नंतर नारायणबाबांनी ही प्रथा कायम ठेवली. नारायणबाबांनी तुकोबांच्या व ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका सोबत घेऊन वारी सुरू केली. "ज्ञानोबा-तुकाराम' हा पालखीतील जयघोषही त्यांनीच सुरू केला. नारायणबाबा तुकोबांच्या पादुका सप्तमीला पालखीत ठेवत आणि अष्टमीला आळंदीला जात असत. तेथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन तेथून नवमीला वारीला सुरुवात करीत असत. 1680 ते 1832 पर्यंतही प्रथा कायम राहिली. हंबीरराव प्रथम वारकरी म्हणून ओळखले जातात. तसा उल्लेख जुन्या ग्रंथांमध्ये आहे. आरफळ येथील सरदार हैबतराव पवार-आरफळकर यांनी 1832मध्ये माऊलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. त्यांना अंकलीच्या सरदार शितोळे यांनी मदत केली. ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून पंढरपूरपर्यंत वारी करीत असत. माऊलींच्या पालखीचा थाट तेव्हापासून आजतागायत कायम आहे. हैबतबाबांनी माऊलींची पालखी स्वतंत्र केली. तसेच एक शिस्त लावून दिली. ती आजतागायत पाळली जाते. ज्ञानोबा आणि तुकारामांच्या पालख्यांची दरवर्षी पुणे-मुंबई रस्त्यावरील म्हसोबा गेटजवळ भेट होत असे. तेथे महापालिकेतर्फे व पुण्यातील विविध संस्थांतर्फे पालख्यांचे स्वागत केले जात असे. दोन वर्षांपासून पालखीचा मार्ग बदलला. संत तुकारामांची पालखी नेहमीच्या रस्त्याने पिंपरीवरून पुणे-मुंबई मार्गावरून इंजिनीयरिंग कॉलेजच्या चौकात येते. माऊलींच्या पालखीचा मार्ग बदलल्याने ही पालखी आळंदी रस्त्यावरून होळकर पुलाकडे जाण्याऐवजी सरळ संगमवाडी येथील नवीन प्रशस्त पुलावरून इंजिनीयरिंग महाविद्यालयाजवळ पोहोचते. त्या चौकात या दोन्ही पालख्यांची भेट होते. तेथे पुष्पवृष्टी करून दोन्ही पालख्यांचे पुणेकरांतर्फे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. हजारो पुणेकरांनी याचि देही याचि डोळा हा सुवर्णक्षण अनुभवतात. या आनंद सोहळ्यानंतर पालख्या मुक्कामाला भवानी पेठेत रवाना होतात. पालखी विठोबा मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा, तर जवळच्याच निवडुंग्या विठोबा मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असतो. या काळात पालखीसमवेत असलेले हजारो वारकरी शहरभर विखुरतात. बहुतेक दिंड्यांचे ठराविक ठिकाणी मुक्काम असतात. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा दरवर्षी कटाक्षाने पाळली जाते. वैयक्तिक वारी करणाऱ्या वारकऱ्यांचीही मुक्कामाची ठिकाणे ठरलेली असतात. शहरातील अनेक मंडळांकडून वारकऱ्यांना अन्नदान केले जाते. अगदी राजगिऱ्याच्या चिक्कीपासून ते खजूर, लाडूची पाकिटे वाटली जातात. कित्येक मंडळांतर्फे वारकऱ्यांसाठी सुग्रास भोजन दिले जाते. हे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचीही संख्या प्रतिवर्षी वाढते आहे. वारकऱ्यांच्या भोजन सेवेबरोबरच त्यांना अन्य सुविधा देण्यासही अनेक संस्था, संघटना पुढे आल्या आहेत. त्यामध्ये वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच त्यांना चष्मेवाटप, आवश्यक औषधांचे वाटप केले जाते. काही मंडळांकडून चालून दमलेल्या वारकऱ्यांच्या पायाला आणि शरीराला मसाज करण्यापासून ते गरम पाण्याच्या स्नानापर्यंत सर्व व्यवस्था केली जाते. त्यांच्या तुटलेल्या वहाणा दुरुस्त करून देण्याची, केशकर्तनाची, पावसापासून रक्षण करण्यासाठी रेनकोटची व्यवस्था काही मंडळी करतात. काही संघटनांतर्फे साबण, टूथपेस्ट, गॉगल, कपडे, स्वेटर्स, पादत्राणे यांचे वाटप केले जाते. त्यामध्ये कोठेही दानाच्या, स्वार्थाच्या भावनेचा लवलेशही नसतो. विठूरायाच्या भेटीसाठी चाललेल्या
वारक-यांची सेवा केल्याची कृतज्ञ भावनाच या सगळ्यांच्या मनात असते.
तुकोबारायांचे श्री क्षेत्र देहू आणि ज्ञानोबांची श्री क्षेत्र आळंदी ही कधीकाळी पुण्याजवळची गावे होती. पुण्याचा आता एवढा चौफेर विस्तार झाला आहे, की ही दोन्ही गावे आता जणु पुण्याचाच भाग बनली आहेत. या दोन्ही पालख्यांचा पहिला एकत्र मुक्काम पुण्यात असणे, हे पुणेकरांना लाभलेले मोठे भाग्यच. एरवी आपल्या नोकरी-व्यवसायात बुडालेल्या पुणेकरांना या भाग्याची निश्चित जाणीव आहे. त्यामुळेच सर्व समाजातील व सर्व स्तरातील लोक मोठ्या उत्साहाने पालख्यांचे स्वागत करतात. त्यासोबत असलेल्या वारक-यांची सेवा करताना ही मंडळी कसलीही कसर राहू देत नाहीत. पालखीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून शहरात वारकऱ्यांची वर्दळ सुरू होते. प्रत्यक्ष पालखीच्या दिवशी शहरभर, जेथे पहावे तेथे वारक-यांचे जथे दृष्टीस पडतात. पालख्यांच्या मुक्कामाच्या रात्री चौकाचौकांत जेवणावळी सुरू असतात. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तने चालू असतात. वारक-यांच्या संगतीने पुणेकर मंडळीही भजन-कीर्तनात तल्लीन होतात. संपूर्ण शहरभर भक्तिपूर्ण वातावरण असते. एरवी क्षुल्लक गोष्टींवरून शासन, प्रशासन अथवा कोणाच्याही अकलेची मिमांसा करणारे पुणेकर एकाच दिवसांत हजारो वारकरी शहरात आल्यामुळे अथवा पालखीमुळे वाहतुकीची कोंडी झाल्याची तक्रार करीत नाहीत. या उलट विठोबा माऊलीसाठी या बाबी गोड मानून पुणेकर विनातक्रार आपले नित्य व्यवहार जारी ठेवतात. कोठेही, कसलेही वादविवाद होत नाहीत. वारक-यांच्या भक्तीरसात चिंब झालेले पुणेकरही या दिवसांत माऊलीमय होऊन जातात. वारीच्या महात्म्याचे, तिच्या थोर परंपरेचे, त्यातील अध्यात्मिकतेचे आणि भक्तीरसाचेच ते प्रतिक असते.

Monday, 9 June 2014

पुण्यातील गोपीनाथराव . . . 

७० च्या दशकात देशभर लोकनायक जयप्रकाश नारायण अर्थात जेपींची यांची लाट होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाविरोधात आणि कॉंग्रेस शासनाच्या धोरणांविरोधात जेपींनी रणशिंग फुंकले होते. युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले होते. त्यामुळे देशभरात ठिकठिकाणी त्यांची भाषणे आयोजित केली जात होती. इंदिराविरोधात देश एकवटत होता. त्या काळात म्हणजे साधारणत: १९७४ मध्ये पुण्यातील गोख़ले हॉलमध्ये सर्वपक्षिय युवकांच्यावतिने जेपींचा ख़ास मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अंधेरे मे एक प्रकाश...जयप्रकाश जयप्रकाश या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. कॉंग्रेस विचारधारा प्रभावी असलेल्या पुण्यामध्ये हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला आणि या समारंभाचे नेटके संयोजन करणारा विशीतला तरूण पुढे राज्याचा उपमुख़्यमंत्री झाला. केंद्रीय मंत्री झाला. हा तरूण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून गोपीनाथ मुंडे होते.
पुणे शहराशी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे संबंध खूप जुने व जिव्हाळयाचे होते. त्यांचे अनेक मित्र व सहकारी या शहरात आहेत.महाविद्यालयीन काळापासून मुंडेंचा पुण्याशी संबंध. डेक्कन जिमख़ान्यावर त्यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाची शाख़ा चालत असे. समर्थ शाख़ा हे या शाख़ेचे नाव. या शाख़ेचे मुंडे कार्यवाह होते.
तेथे त्यांचे अनिल शिरोळे यांच्याशी सूर जुळले. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांची ही मैत्री बहरली. या काळात  मुंडेंचा पुण्यातील मैत्र वाढलं. १९७२ ते १९७५ या काळात ते आयएलएस विधी महाविद्यालयात शिकत होते. विलासराव देशमुख़ त्यांचे सहाध्यायी. दोघांचा पुण्यात निरनिराळा पण मोठा मित्र परिवार. त्या काळात भीमराव बडदे, जनाभाऊ पेडणेकर, तात्या बापट यांनी  पतित पावन संघटनेची स्थापना केली. त्या संघटनेच्या माध्यमातून मुंडे समाजकारणात दाख़ल झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही त्या काळात महाविद्यालयीन चळवळींमध्ये सक्र ीय होती. मुंडे या संघटनेच्या माध्यमातूनही निरनिराळया संघटनांशी जोडले गेले. त्यातूनच १९७४ ला पुण्यात झालेल्या जेपींच्या सत्काराच्या संयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. या कार्यक्रमात जेपींनी संयोजनाची प्रशंसा करतानाच मुंडे समाजकारणात चांगले चमकतील असे भाष्य केले होते. त्यांचे हे भाष्य पुढे ख़रे ठरले. बाहेरगावाहून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम मुंडे यांनी या काळात केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते. येथील निरनिराळया महाविद्यालयांमधील निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका निभावतानाच त्यांची राजकारणाशी नाळ जुळली. ते परत बीडला गेले. पण पुण्यातील मित्रांशी त्यांचे संबंध केवळ कायमच राहीले नाही,  तर ते अधिक वृद्धींगत झाले. पुण्यातील मित्रपरिवार अधिक विस्तृत झाला.
राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सक्रीय होताना मुंडे यांना हे जुने संबंध कामी आले. जुन्या मित्रांची मैत्री ते विसरले नाहीत आणि मित्रही त्यांना विसरले नाहीत. परस्परांच्या मदतीने हे मित्र राजकारणात पुढे सरकत राहीले. भारतीय जनता पक्षाला राज्यातील बहुजन समाजापर्यंत, तळागाळापर्यंत नेण्यात मुंडे यांचा महत्वाचा वाटा आहे. मुंडे यांचा राजकारणातील उदय आणि राज्यातील भाजपाचा उदय एकाचवेळी झाला असे मानले तर वावगे ठरणार नाही. महाविद्यालयीन काळापासून पुण्याशी असलेले संबंध मुंडे यांनी कायम ठेवले. बीडख़ालोख़ाल पुण्यातील पक्ष संघटनेकडे त्यांचे काटेकोर लक्ष होते. अनिल शिरोळे, प्रदीप रावत, योगेश गोगावले, विजय काळे, सतीश मिसाळ, श्याम सातपुते, दिलीप कांबळे, रमेश काळे, हेमंत रासने, सुनील कांबळे, श्रीनाथ भिमाले, श्याम देशपांडे, उज्वल केसकर, मुरलीधर मोहोळ, जगन्नाथ कुलकर्णी अशी शेकडो कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यांना सर्वार्थाने बळ दिले. त्यांच्या उन्नतीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहीले. त्यांच्या वैयक्तिक सुख़दु:ख़ात सहभागी झाले. त्यामुळेच पुण्यातील त्यांच्या अनुयायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. पुण्यातील पक्ष संघटनेवर नेहमीच मुंडे यांचा प्रभाव राहीला. दिलीप कांबळे यांच्यासारख़्या सामान्य कार्यकर्त्याला थेट राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांनी दिली. शिरोळेंना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी त्यांनी राजकीत ताकद पणाला लावली. तत्पूर्वी शहराध्यक्षपदी शिरोळे यांची वर्णी लावण्यासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले होते. दिवंगत  सतीश मिसाळ यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीची जाणीव ठेवून त्यांच्या पत्नी माधुरी मिसाळ यांना पर्वती मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट देण्यासाठीही मुंडे यांनीच शब्द टाकला. महापालिकेच्या निवडणुकीमध्येही आपल्या अधिकाधिक कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहीले.
१९९९ च्या सुमारास केंद्रात युतीचे सरकार असतानाची गोष्ट. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एका समारंभासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी येणार होते. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने कडक पोलीस बंदोबस्त होता. जंगली महाराज रस्त्याने अडवाणींची मोटार आली आणि कॉंग्रेसचे तत्कालीन नगरसेवक नितीन जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अचानक रस्त्यावर येऊन कार रोखली. एकच गोंधळ उडाला. माागच्या गाडीत राज्याचे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे होते. ते पटकन ख़ाली उतरले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व अडवाणींना पोलीस संरक्षणात बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नेले..मुंडेंनाही त्यांनी विनंती केली. पण, रागाने लालबुंद झालेले मुंडे पायी चालत बालगंधर्वमध्ये गेले. त्यांनी तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रकाश केदारींना बोलावून घेतले. ते येईपर्यंत रागारागाने ते तेथेच येरझारे घालत राहीले. काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना समजवून व्यासपीठावर न्यायचा प्रयत्न केला.पण, संतापलेले मुंडे कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. केदारी आले आणि मुंडेच्या संयमाचा कडेलोट झाला. लालबुंद झालेल्या मुंडेंनी केदारींची केलेली तीव्र शब्दांत केलेली कानउघाडणी पाहून अनेक पोलीस अधिकारी टरकले. एरवी हास्यविनोदार रमणा-या मिष्कील स्वभावाच्या मुंडेंचा हा रूद्रावतार कार्यकर्त्यांनाही नवीनच होता. आपण राज्याचे गृहमंत्री असूनही आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला, केंद्रीय मंत्र्याला आपण सुरक्षितपणे नेऊ शकत नाही ही सल त्यांना लागली होती. त्याच रात्री एका कार्यकर्त्याच्या घरी छोटयाशा घरगुती समारंभाला उपस्थित राहीलेले मुंडे मात्र नेहमीच्या मूडमध्ये होते. घडलेला प्रसंग विसरून जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे त्यांचे हे कसब वादातीत होते. अगदी कार्यकर्त्यांच्या कामाच्या अहवाल प्रकाशनापासून ते त्यांच्या लग्न समारंभ, वाढदिवस अशा सर्व कार्यक्रमांमध्ये उशीरा का होईना पण हमख़ास उपस्थिती लावणारे मुंडे दु:ख़ाच्या प्रसंगांमध्येही कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना धीर देत असत. मुंडे हे कार्यकर्त्यांना पक्षाच्या राज्य नेतृत्वाशी आणि अलिकडच्या काळात केंद्रीय नेतृत्वाशी जोडणारा पूल बनले होते. हा पूलच आकस्मिक कोसळल्याने पुण्यातील भाजपाचे नेते व कार्यकर्ते सुन्न झाले आहेत.

Friday, 6 June 2014

. . . .अन्‌ डोकेदुखी थांबली . . .???
- -- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
सकाळी उठलो .. . काहीतरी अनइझी वाटत होतं....मगं लक्षात आलं की डोकं कमालीचं ठणकतंय. . .जरावेळ पडून राह्यलो...डोकेदुखी आणखी वाढली . .. सरळ उठलो...पटकन आन्हिकं उरकून चहा घेतला. ...एक गोळी घेतली .. .पण डोकेदुखी थांबायची काही चिन्हे दिसेनात. . . जरा पेपर वाचत बसलो...पण टीव्हीचा आवाजही सहन होईनासा झाला. . .डोकं दुखण्यापेक्षा ते का दुखतंय हे न समजल्याने आणखी त्रास व्हायला लागला....तसंही काही कारण नव्हतंच. . रात्री लवकर झोपलो होतो. . झोपही भरपूर झाली होती...आता वर गोळीही घेऊन झाली. .बहुदा काल भीमथडी यात्रेत फिरल्यामुळे दुखत असावं असं वाटलं .. पण यात्रेतही उन लागलं नव्हतं . . .यंदा मंडप छानपैकी आच्छादीत केलाय .. .ही यात्रा म्हणजे जणुकाही आमच्या गावची किंवा घरचीच यात्रा असावी असा एकंदर आमच्याकडे सूर असतो . .उद्‌‌घाटन काल सकाळी झालं...नीलम म्हणाली, चला बाबा जाऊन येऊ दुपारी....ती घरून आक्टीव्हावर स्वार होऊन आलीही . .मी आफीसमधून तिकडं...बरीच भटकंती केली...थोडीफार खरेदी....नंदीबैलवाला...कुंभार...वगैरे मंडळी आता जवळपास ओळखीची झालीयेत....एवढंच नव्हे, तर नंदीही ओळखतो मला बहुतेक...कारण मी जवळ गेलो की गडी लाडात येतो...माझ्या खांद्याला डोकं घासतो...(बहुदा त्याला माहिती झालं असावं मी ही '' वृषभ'' आहे  )...हा नंदीही जरा मजेशीरच आहे...जबरदस्त धूड...प्रचंड आकाराची शिंग. . .काळेभोर डोळे...मस्त देखणा आहे अगदी....काल मी आणि नीलमने फोटो काढले त्याच्यासोबत...त्याचवेळी एक मध्यमवयीन स्त्री त्यांच्या बहुदा सासूसोबत तेथून चालली होती....आमचं फोटोसेशन पाहून तिने तिच्या फोनमधून फोटो काढून देण्याची विनंती केली नीलमला...बाई जरा घाबरूनच होत्या...अंतर राखून उभ्या राहील्या...त्यातही सासू नंदीच्या बाजूला आणि ही इकडे असे उभे राहीले . ..मला कुठून अवदसा आठवली कोण जाणे! आणि मी त्यांना म्हणालो ''जरा जवळ (नंदीबैलाच्या) उभ्या रहा...काही करत नाही तो...त्या जरा सरकल्या....नीलम फोटो काढत असतानाच नंदीच्या मनात काय आले कुणास ठावूक? त्याने सहजपणे मुंडी उजव्या बाजूला झुकवली.....त्याची शिंग टणकन बाईंच्या डोक्याला लागली आणि त्या केवढ्याने तरी ओरडल्या .. नंदी आपला मख्ख...माझाच चेहरा पाहण्यासारखा झालेला....नीलूने तरीही काढला फोटो....तर मला वाटतंय की भीमथडी यात्राच बाधली असावी. . .त्यातच नेहमीच्या ड्रेस कोडला म्हणजे जीन्स आणि नेव्ही ब्ल्यू रंगाच्या शर्टला फाटा देऊन मी चक्क काल जीन्सवर लाईट यलो रंगाचा शर्ट घातला होता....त्यामुळे जरा लूक बरा वाटत होता..
. . . .तर आफीसला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा गोळीसह डुलकी घेऊनही डोकेदुखी काही थांबली नव्हती...निघताना नीलूने जरा तिच्या नेहमीच्या स्टाईलने भुवया दाबून डोकेदुखी थांबवण्याचा प्रयत्न केला....तितक्यात तिच्या आईने एन्ट्री घेतली ती हातात मीठ घेऊनच... नीलमचा भुवया दाबण्याचा प्रयोग सुरू असतानाच तिच्या आईने काहीतरी पुटपुटत माझ्यावरून मीठ उतरवून टाकले. . .तुझं काहीतरीच असतं...ही नीलमची प्रतिक्रिया....त्याकडे दुर्लक्ष करून ती आत निघूनही गेली....आमच्याकडे नजर काढण्याचा हा एक प्रकार अलिकडे रूढ होतोय....लहानपणी आईने कधी नजर काढल्याचं स्मरत नाही......आणि एकंदरच घरातल्या पुरोगामी वातावरणामुळं आमच्याकडे तशी पद्धतच नाही..कसलाही धार्मिक कार्यक्रम, उपक्रम, गंडे-दोरे, बुवा-बाबा अशा कसल्याही पद्धतींना आमच्या घरात थारा नाही. . .पुढे मी बराच बदललो हा भाग निराळा...पण नजर काढण्याने काही फरक पडतो का? हा प्रश्न मला नेहमीच भेडसावतो...लग्न होईपर्यंत अशा कोणत्या प्रसंगाला मी सामोरा गेलो नव्हतो...(अपवाद कॉलेजमधला...माझी एक सखी डोळ्यातलं काजळ बोटावर घेऊन मला तीट लावायची...खूप उबदार आठवण आहे ही. . .असो)...लग्नानंतर मात्र कधी डोकं दुखतंय असं म्हटलं आणि बायको ठिकाण्यावर असेल, तर लगेच मीठ उतरवून टाकायचा कार्यक्रम हटकून असतोच...आणि डोकं थांबतं हा माझा अनुभव आहे....माझ्या मुलीची नजर तिने कधी काढलीय हे मला आठवत नाही...पण मी जरा वेगळं ड्रेसिंग केलं आणि काही डोकेदुखी उद्‌‌भवली की मीठाचा उतारा ठरलेला असतो....मला तर वाटतंय स्वयंपाकापेक्षा नजर काढायलाच आमच्याकडे मीठाचा जास्त वापर होत असावा  ....आमच्या टबमधील पाणी समुद्राच्या पाण्यासारखं खारट का असतं याचा उलगडा मला हे मीठ त्या पाण्यात टाकलेलं असतं हे कळाल्यावर उमगलं....श्रद्धा-अंधश्रद्धा यांतील सीमारेषा धूसर असते...मी सश्रद्ध आहे पण अंधश्रद्ध नाही. . . तरीही अनेकांच्या लेखी नजर काढणे ही अंधश्रद्धाच आहे...असेलही...मला वाटतंय पूर्वीच्या काळी देवदेवता वर किंवा शाप देत असत...आणि ते खरेही होत असत.. म्हणजेच ते प्रचंड इच्छाशक्तीने एखाद्याबाबत चांगली किंवा वाईट गोष्ट चिंतत असावेत आणि त्यामुळेच ती प्रत्यक्षात येत असावी...तसाच काहीसा नजर काढण्याचा प्रकार असावा....तर, घरून मी आफीसला आलो...सकाळची प्रचंड डोकेदुखी आता पूर्ण थांबलीये....(एवढी पोस्ट लिहिलिये यावरून तुमच्या हे लक्षात आले असेलच  ) असर दवाचा झाला की दुवाचा म्हणजेच नजर काढण्याचा....?? याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही...डोकेदुखी थांबलीये हेच माझ्यसाठी महत्वाचं . . . .


अध्यात्मिक गुरू 'एम' यांची पदयात्रा

देशात सामाजिक विषमता नष्ट करून धार्मिक सलोख्याची भावना जागविण्यासाठी केरळमधील अध्यात्मिक गुरू श्री. एम हे कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान पदयात्रा काढणार असून, देशातील तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्याचा ते प्रयत्न  करणार आहेत.

अध्यात्म क्षेत्रात ' श्री. एम' या नावाने परीचित असलेले मुमताज अली मूळचे केरळचे. महाअवतारबाबा आणि श्री महेश्‍वरनाथ यांचा अनुग्रह प्राप्त झालेल्या श्री. एम यांनी हिमालयात अनेक वर्षे साधना केली. त्यानंतर बंगलुरू जवळील मदनापल्ली येथे त्यांनी आश्रमाची व सत्संग फाउंडेशन व मानव एकता मिशनची स्थापना केली. त्याच माध्यमातून त्यांनी देशभर भ्रमंती करून नागरिकांना भेडसावणार्‍या तसेच देशापुढील प्रमु.ख समस्यांचा उहापोह करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. एम गेले दोन दिवस शहरात वास्तव्याला होते. त्यांच्या सत्संगाचा तसेच उपनिषदांवरील व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 'दै. पुण्यनगरीशी' संवाद साधताना श्री. एम यांनी या पदयात्रेची माहिती दिली.

ते म्हणाले, की आत्मसाक्षात्कार, शांततापूर्ण वातावरण, जातीय व धार्मिक सलोखा आणि बालकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही कन्याकुमारी काश्मीरपर्यंत पदयात्रा काढणार आहोत. थोर राष्ट्रपुरुष असलेले अध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून १२ जानेवारी २0१५ला कन्याकुमारी येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेदरम्यान सर्व जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांशी आम्ही संवाद साधणार आहोत. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यातून मार्गकाढण्याचा प्रय▪करणार आहोत. देशातील सर्व राज्यांतून आमची यात्रा जाईल. या स्वरुपाची आखणी करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये कोणाही राजकीय व्यक्तीचा समावेश नाही. देशाच्या नवनिर्माणाच्या भावनेने सर्मपित असलेले सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीच फक्त या यात्रेत असतील.

हिंदू धर्मातील उपनिषदांचे महत्त्व अमूल्य आहे. अलिकडच्या काळात त्यांचे अवमूल्यन होत असल्याची टीका केली जात आहे. पण, वस्तुस्थिती निराळी आहे. उपनिषदांचे स्थान व दर्जा अमूल्य आहे. पण, ते समजावून सांगणार्‍यांचा दर्जा हलका झाला आहे. त्यामुळे या उपनिषदांमधील अर्क काहीसा कमी होऊ लागला आहे. त्यांचा परिणाम धूसर होऊ लागला आहे. मूळ उपनिषदे संस्कृत भाषेत आहेत. अलिकडच्या काळात या भाषेचे अभ्यासकही कमी होऊ लागले आहेत. साहजिकच वेद व उपनिषदांचे अभ्यासक कमी होऊ लागले आहेत. मधल्या कालखंडामध्ये संस्कृत ही भाषा काहींनी आपली मिरासदारी मानली. त्यामुळे त्यांनी अन्य समाजांना या मोलाच्या ठेव्यापासून दूर ठेवले. कोणतीही विद्या, भाषा, योग अभ्यासण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. नव्या पिढीची ही मेहनत करण्याची तयारी नाही. त्यामुळे महान संस्कृतीची ओळ.ख करून घेणारी आणि ती समजावून सांगणारी मंड़ळी काळाच्या ओघात कमी झाली आहे, असे श्री. एम यांनी सांगितले.

देशात धार्मिक सलोखा अबाधित राहणे सर्वांच्याच हिताचे असून त्यासाठी आम्ही आमच्या संस्थांमार्फत विशेष प्रय▪करीत आहोत. आमच्या देशभरातील पदयात्रेचाही हाच उद्देश आहे असे सांगून ते म्हणाले, की धर्म हे राजकारण्यांचे शस्त्र व साधन बनले आहे. त्यामुळे जातीजातींमध्ये तेढ निर्माण केली जाते. धर्माला साधन बनवून सत्ता साध्य करण्याचा राजकारण्यांचा कुटील हेतू आहे.

सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वच धर्मांमध्ये जीवन सुंदर होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ते समाजापुढे ठसवून सांगण्यासाठी धर्माचा गाढा अभ्यास असणार्‍यांनी तसेच अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांनी समाजाचे नेतृत्व करायला पुढे येण्याची हिच वेळ आहे. या सागररुपी भावतालामध्ये पाण्याचा एक थेंब बनून मी
 काम  सुरू केले आहे. त्यामध्ये या क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
     
किणींचा मेंदू ..ते सनमचे हृदय . .
-  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -

कोणत्याही संशयास्पद मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदनात समजले नाही तर व्हिसेरा राखून ठेवला जातो. न्याय वैद्यक प्रयोगशाळेत हा व्हिसेरा बारकाईने तपासला जातो. व्हिसेरामध्ये पोटातील अन्नघटकांचे नमुने, शरीराच्या विविध अवयवांचे काही भाग असतात. त्यामध्ये हृदयाचा, किडनीचा, गुप्तांगाचेही काही अंश असतात. त्यांच्या विश्लेषणातून संबंधीत व्यक्तीच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकते.?

वडगाव शेरी परिसरात वर्षभरापूर्वी झालेल्या सनम हसन या युवतीच्या मृत्युचे गूढ अधिक गडद होत चालले असून व्हिसेरामध्ये तिच्याऐवजी एका पुरुषाचे हृदय आढळल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. शवविच्छेदनातील या गडबडीमुळे ९0 च्या दशकात राज्यात खळबळ उडवून दिलेल्या किणी प्रकरणाच्या स्मृतींना उजाळा मिळाला. मुंबईकर रमेश किणी यांचा शहरात गूढ मृत्यू झाला. त्या प्रकरणाने एका बड्या राजकीय नेत्याची झोप उडवली होती. किणी यांच्या शवविच्छेदनानंतर त्यांचा मेंदू बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सनम हसनच्या प्रकरणामुळे वीस वर्षांपूर्वीच्या किणी प्रकरणाच्या स्मृती ताज्या झाल्या.

सनम हसन ही युवती मूळची मुंबईची. येथील खासगी महाविद्यालयामध्ये ती फॅशन डिझायनींगच्या द्वितीय वर्षाच्या वर्गात शिकत होती. गेल्या वर्षी तीन अॉक्टोबरला वाढदिवसानिमित्त तिच्या मित्रांनी वडगाव शेरीमधील एका फ्लॅटमध्ये मध्यरात्री पार्टीचे आयोजन केले होते. तेथेच तिचा गूढरीत्या मृत्यू झाला. त्याबाबत सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक तपास करीत असून त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. सनमचा म्हणून राखून ठेवलेल्या व्हिसेरामध्ये हृदयाचा असलेला भाग तिचा नसून प्रौढ पुरुषाचा असल्याचे मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे मत आहे. त्या व्हिसेर्‍यामध्ये असलेले योनीस्त्रावाचे नमुनेही अन्य स्त्रीचे असल्याचे मत या प्रयोगशाळेने नोंदवले आहे. या स्त्रावातील डीएनए सनमच्या माता-पित्यांशी मिळत नसल्याचाही निष्कर्ष नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कबरीतून सनमचा मृतदेह काढून तपास करण्याशिवाय पोलिसांना गत्यंतर उरलेले नाही.

ससून रुग्णालयात शवविच्छेदन करताना सनमच्या व्हिसेराची अदलाबदल झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. या रुग्णालयातील यास्वरुपाच्या किणी प्रकरणामुळे १९९६ साली शिवसेना-भाजपा युती शासन डळमळू लागले होते. मुंबईच्या माटुंगा भागात राहणार्‍या रमेश किणींची राहती इमारत पुनर्विकसनासाठीचे प्रयत्न सुरू होते. त्यास किणी यांनी कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय लक्ष्मीकांत शाह, सुमन शाह, आशुतोष राणे हे पुनर्विकसनाचे काम करीत होते. ही मंडळी आपल्याला धमक्या देत असल्याची फिर्याद किणी यांनी नोंदवली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले. शहरातील अलका चित्रपटगृहात २३ जुलै १९९६ ला किणी मृतावस्थेत आढळले. विषारी द्रव प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. शवविच्छेदनानंतर त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. हा तपास 'सीआयडी' कडे गेल्यावर पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी, किणी यांच्या शरीरात मेंदू नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने धावपळ करून 'हरवलेला' किणींचा मेंदू 'सापडल्याचे' सांगितले. प्रत्यक्षात तो मेंदुही भलत्याच व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले.

किणी यांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला हे अखेरपर्यंत स्पष्ट झाले नाही. राज ठाकरे यांनीच किणी यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप किणी यांच्या पत्नी शीला यांनी करून वादळ उठवून दिले होते. अंडरवर्ल्ड डॉन अमर नाईक याचाही या प्रकरणात हात असल्याचे बोलले जात होते. पण, पुढे या प्रकरणावर पडदा पडला.

रमेश किणी काय किंवा सनम हसन काय यांच्या मृत्युचे रहस्य कायम राहण्यामागे सरकारी रुग्णालयांतील शवागार आणि शवविच्छेदन कक्षातील भोंगळ कारभारच कारणीभूत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ससून रुग्णालयामधील शवविच्छेदनानंतर मृतदेह आणि राखून ठेवलेला व्हिसेरा पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. पोलीस हा व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत दाखल करतात. मध्यंतरीच्या काळात ससूनच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात आलेल्या व्हिसेरांचे प्रकरण गाजले होते. शवविच्छेदन विभागातील कामकाजातील भोंगळपणा ९0च्या दशकामध्ये रमेश किणी यांच्या मृत्युमुळे उघड झाला होता. त्यावेळी काही कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. पण, आजही तेथील कामकाज समाधानकारक नसल्याचेच चित्र सनम हसनच्या व्हिसेर्‍यावरून स्पष्ट झाले आहे. अन्यथा सतरा वर्षीय सनमच्या व्हिसेर्‍यामध्ये हृदयरोगाने जर्जर झालेल्या पन्नास वर्षीय पुरुषाचे हृदय आणि प्रौढ महिलेचा योनीस्त्राव कसा? हा प्रश्न आहे.
जव्हारची डाक्टरबाई :-
- - - - - - - - - - - - -

जव्हारमधील डाकटरबाई . . .
- - - - - - - - - - - - - - - - - - -
     पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर ही शहरे अलिकडच्या काळात महानगरे बनली. विकासाची गंगोत्री बहुदा या शहरांपुरतीच मर्यादीत राहीली. जव्हार-मोखाडा या भागात तर विकास अद्याप कित्येक कोस दूर आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि गुजरातच्या बेचक्यात हा आदिवासीबहुल जव्हार तालुका आहे. उन्हाळ्यात कमालीचे उन, पावसाळ्यात धो धो पावसाच्या संततधारा आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी असे या इथले हवामान. या तिन्ही ऋतूंपासून बचाव करण्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद येथील आदिवासींमध्ये आजिबात नाही. पुण्यामुंबईचे कित्येक भाग, काही मॉल अगदी परदेशांची आठवण करू देण्याइतके चकचकीत आणि पॉश आहेत. बिचा-या आदिवासांची घरे मात्र आजही शेणामातीचीच आहेत. भाताची, नागलीची शेती हा त्यांचा उपजिवीकेचा मुख्य व्यवसाय. कमालीचे दारीद्र्याने आणि अंधश्रद्धांनी हा समाज पिचून गेलाय. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आताशा त्यांच्यापर्यंत पोचू लागल्यात. काही स्वयंसेवी संस्था, संघटना तेथे कार्यरत आहेत. पण, शहरातील माणूस अद्याप तेथे पोचत नाही. आपले बांधव म्हणून या भूमीपुत्रांची गळाभेट घेत नाही. त्यामुळे ही मंडळी अद्यापही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. शहरातली ही माणसं आपल्याला स्विकारतील की नाही याची त्यांना भीती वाटते ...निसर्गाच्या नवनवीन रुपाशी जुळलेले त्यांचे सण असतात आणि ते त्याचा मनमुराद आनंद लुटतात. त्यांचे देवही अनोखे...आणि त्यांची भक्तीही आगळी...आजही संध्याकाळी सहानंतर जव्हारमधून यायला आणि जायला दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळेच या दुर्गम भागातील विकासाला खीळ बसली आहे. शिक्षणासाठी शाळा अलिकडच्या काळात उघडल्या गेल्यात. जव्हारला नगरपालिकाही आहे पण बजेट सगळे घाट्यात...आता मार्चनंतर तेथे कडाक्याचा उन्हाळा असेल आणि पिण्याच्या पाण्याची ओरड....अक्षरश: गाळातील गढूळ पाणी हे लोक वापरतात. साप, विंचूसारखे प्राण्यांची येथे कायमच भीती असते. गर्द जंगलामध्ये बहुतेक सर्व श्वापदे आहेत. वैद्यकीय सुविधांची मारामार आहे आणि त्यासाठी लागणारा पैसाही येथील माणसांकडे नसतो....मग या भागात जाऊन दवाखाना थाटण्याचा आतबट्ट्याचा व्यवसाय करणार कोण??? कोणीच नाही...जव्हार-मोखाडा आण् विक्रमगड या तीन तालुक्यांमध्ये मिळून एकच सरकारी डॉक्टर आहे. डॉ. भरतकुमार महाले...याच आदिवासी भागात लहानाचे मोठे झालेल्या डॉ. महाले अत्यंत सेवाभावी, त्यागी वृत्तीने हे काम करतात. त्यात त्यांना मोलाची साथ आहे ती त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. अनिता यांची...
              डॉ. अनिता यांच्याशी काल गप्पा मारताना इतके दिवस उत्सुकता असलेल्या आदिवासी भागाचे चित्र लख्खपणे डोळ्यांसमोर उभे राहीले. त्यांनी त्या भागात स्वत:चे रुग्णालय था्टले आहे. तसे पाहिले तर कोणत्याही शहरात, महानगरात रुग्णालय थाटून अभिजन,महाजनांसाठी सेवा केली असती, तर त्यांना बक्कळ माया कमवता आली असती... पण, नाही....मुळातच सेवाभावी वृत्तीच्या अनिता यांनी या आदिवासी भागात काम करण्याचा ठाम निर्णय घेतला आणि गेल्या सहा- सात वर्षांपासून त्या तेथे कार्यरत आहेत. केवळ रुग्णांसाठी डॉक्टर म्हणूनच नव्हे, तर त्यांच्या एकूणच जीवनमान उंचावण्याच्या प्रत्येक कामाशी त्यांची नाळ जुळली आहे. आदिवासींची खडतर जीवनपद्धती, परंपरांशी एकरूप होऊन त्या तेथे काम करतात. वैद्यकीय पेशाविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यांना वेळोवेळी आवश्यक त्या लसी देण्याचे काम करतात. गरोदर महिला, प्रसुती झालेल्या महिलांची जीवापाड काळजी घेतात आणि नवजात शिशूलाही ममतेने आवश्यक ती औषधे, लसी देतात...औषधे-इंजेक्शने घ्यायला कुचराई करणा-या तेथील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगतात. त्यांच्यासाठी केसांना लावायची तेले,कंगवे, फण्या देतात. टापटीप राहण्यासाठी जनजागृती करतात. उपक्रम राबवतात.दुर्गम भागातील पाड्यांवर राहणा-या आदिवासी बांधवांना कधी कुणाकडून सायकली घेऊन देतात, कधी शाळकरी मुलांना शालेय साहित्य देतात....चित्रकार, कलाकारांना उत्तेजन देतात...त्यांच्या कलांना वाव मिळवून देण्यासाठी, व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न करतात. आदिवासी समाजात राहून तेथील चालीरीती त्यांनी उत्तम अवगत केल्या आहेत. तेथील आदिवासींची बोलीभाषा त्यांना समजते व बोलताही येते. जंगलात एखादा प्राणी जखमी अवस्थेत आढळला, तर त्याच्यावरही उपचार करून ते त्याची शुशृषा करतात. या भागातील रानभाज्यांची चव त्यांना खूप आवडतात. त्या आदिवासी जीवनाशी त्या समरस झाल्यात. एकरूप झाल्यात. अर्थात, हे सगळं बोलायला सोप्प आहे ....पण महानगरांमधील सुखासीन आयुष्याकडे पाठ फिरवून थेट जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम आदिवासी भागात जाऊन काम करायचे, तेथेच रहायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही....पण अनिताने हे करून दाखवलंय . . .
          अनिता काल भेटली...गोरी...नाजूक चणीची, बोलक्या डोळ्यांची...निगर्वी आणि निर्मळ मनाची...रात्री उशीरापर्यंत आम्ही खूप गप्पा मारल्या...त्यात तिच्या आदिवासी भागातील कामाचा पट उलगडला...पण आपण फार काही वेगळं करतोय असा अभिनिवेश तिच्या बोलण्यात आजिबात नाही....हे तर आपलं कामच आहे..आपलं कर्तव्यच आहे ही तिची भावना ...समाजाप्रती उत्तरदायित्वाची तिची वृत्ती खूप आश्वासक आहे...आदिवासी सर्वचदृष्ट्‌य़ा मागास असले, तरी मूळ प्रवाहात येण्यासाठीची त्यांची प्रक्रीया सुरू झालेली आहे. त्यांची उगवती पिढी या प्रवाहात सामील होण्यास उत्सुक आणि प्रयत्नशील आहे..त्यामुळे आगामी काळात हे परीवर्तन नक्कीच होईल यात शंकाच नाही...असं सांगताना डॉ. अनिता यांचे डोळे लकाकले...जुनी हिंदी गाणी तिला आवडतात....अध्यात्मामध्ये रस आहे...कितीतरी विषयांवर आम्ही गप्पा मारल्या....तरीही अजूनही खूप काही राह्यलयं असं वाटतं... Hatts Of You Anita . ..

(फेसबुकच्या मार्कबाबा . .. . तुझ्यामुळे माझ्या मित्रांच्या खजिन्यात डॉ. अनिता यांच्यासारख्या काही अमूल्य रत्नांची भर पडली...अनिता,.... सकाळी थोडक्यात चुकामूक झाल्याची चुटपूट नक्कीच आहे....पण हरकत नाही....आपल्या अत्तराच्या भेटीतील सुगंधी क्षण मनाच्या कुपीत कायम राहतील..भेटू लवकरच


..आणि डॉन ढसाढसा  रडला

जगभरातील प्रमुख़ देशांमध्ये त्याची अब्जावधी रुपयांची संपत्ती आहे...आतापर्यंत तो स्वत:ला सर्वशाक्तिमान समजत होता ...जगाच्या कोणत्याही कोप-यात बसून कधीही, कोणाचीही विकेट एका  इशा-यासरशी काढू शकतो याची त्याला फुशारकी वाटत होती. ..अंडरवर्ल्डचा तो डॉन समजतो...पण आईचे निधन झाल्याचे समजल्यावरही तिचे अंत्यदर्शन घेऊ न शकल्याने मनातून कोसळलेला डॉन छोटा राजन ढसाढसा रडला. अंडरवर्ल्डच्या चक्रव्यूहात अडकलेल्या डॉनची ही हतबलता होती.
आईच्या निधनाचे अपार दु:ख़ तर राजनलाच झालेच; त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आपण सर्वशक्तीमान असल्याचा त्याचा  भ्रमाचा भोपळा फुटला.  तीव्र इच्छा आणि सर्व व्यवस्था असूनही केवळ पोलीस अटक करतील किंवा प्रतिस्पर्धी गुंड गाठतील या भीतीने राजन भारतात परतू शकला नाही. आईच्याही अंत्यविधीला उपस्थित न राहता आल्याची ख़ंत एका मित्राकडे बोलून दाख़वताना तो अक्षरश: ढसाढसा रडला.
राजनची आई लक्ष्मीबाई यांचे नुकतेच (ता.२६) दीर्घ आजारानंतर निधन झाले. चेंबूरमधील निवासस्थानाजवळ असलेल्या ख़ासगी रुग्णालयात त्यांनी अख़ेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून अर्धांगवायूच्या विकाराने त्या अंथरूणाला खिळून होत्या. आठवड्यापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि उपचार सुरू असतानाच २६ मार्चला त्यांची प्राणज्योत मालवली. १९९३ पासून विदेशात असलेल्या राजनला त्याच्या निकटवर्तीयाने त्वरीत हे वृत्त कळवले. सख़्ख़ी आई काळाच्या पडद्याआड गेल्याचे समजताच डॉन शोकाकूल झाला. त्याहीपेक्षा तिचे अंतीम दर्शन आपण घेऊ शकणार नाही या भावनेने त्याला अक्षरश: रडू कोसळले. राजन सध्या मलेशियात असल्याचे बोलले जाते. तेथून अथवा जगाच्या कोणत्याही कानाकोप-यातून तो सहज मुंबईत येऊ शकला असता. तितकी मजबूत त्याचे स्वतंत्र यंत्रणा तर आहेच; पण त्याहीपलीकडे त्याचे मित्रांचे व शूटर्सचे विस्तीर्ण जाळे विणलेले आहे. गुप्तचर यंत्रणांशी त्याचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. पण एवढी यंत्रणा असूनही राजन भारतात येऊ शकला नाही. आईच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू न शकलेला राजन आता आगामी काळात कधीच देशात परतणार नाही याचेच हे चिन्ह आहे, अशी माहिती उच्चपदस्थ पोलीस अधिका-यांनी दिली.
रिक्षाचालकांच्या युनियनचा लिडर असलेल्या बड्या राजनच्या टोळीतून गुन्हेगारीला सुरूवात केलेल्या  राजनने १९८५नंतर अंडरवर्ल्डमध्ये नावाचा ठसा निर्माण केला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रााहिमचा उजवा हात म्हणून वावरलेल्या राजनने चेंबूर व लगतच्या परिसरात दहशत निर्माण केली. १९८८ च्या सुमारास पोलिसांच्या ससेमि-याला कंटाळून दाऊद दुबईच्या आश्रयाला गेला. त्यापाठोपाठ राजनही तेथे पोचला. दाऊदनंतर स्थान कोणाचे? यावरून छोटा शकीलशी झालेल्या वादानंतर त्या टोळीशी फारकत घेऊन राजनने स्वतंत्र टोळी कार्यान्वित केली. त्यानंतर दाऊद व राजन टोळीत उडालेला रक्तरंजीत संघर्ष सर्वज्ञात आहे.
दाऊदपासून स्वतंत्र झाल्यानंतर राजनभोवती फरीद तनाशा, संतोष शेट्टी, विकी मल्होत्रा, डी.के. राव, रोहित वर्मा आदी साथीदारांचे भरभक्कम कवच होते. तरीही, त्याला ख़रा मानसिक आधार होता तो आईचा. लक्ष्मीबाई यांना राजनने निवडलेला गुन्हेगारीचा मार्गकधीच पटला नव्हता. त्याबाबत त्याला नेहमीच ख़डसावत असत. गुन्हेगारीच्या मार्गापासून त्याला परावृत्त करण्यासाठी त्या त्याला नेहमीच ख़डे बोल सुनावत असत. २००० मध्ये छोटा शकीलच्या शूटर्सनी बँकॉकमध्ये राजनवर प्राणघातक हल्ला केला, तव्हा या माऊलीने अन्नपाणी वर्ज्य केले होते, अशी आठवण सूत्रांनी दिली. आईपासून वीस वर्षांपेक्षा अधिक काळ दूर असलेल्या राजनचे आईशी  खूप माया होती. तीन भाऊ आणि दोन बहिणी तिची काळजी घेण्यासाठी समर्थ असल्या, तरी काही मित्रांना सांगून त्याने तिची जास्तीत जास्त चांगली बडदास्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. तिचे अख़ेरचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. तो नेहमी तिच्याशी फोनवर बोलून ख्यालीखुशाली विचारायचा. माझी काळजी करू नको असे सांगतानाच मी नक्की तुझ्या भेटीला येईन असे आश्वासन द्यायचा. पण ती गेल्यानंतरही डॉनला हे आश्वासन पूर्ण करता आले नाही. आईच्या भेटीची आस अधुरीच राहीली.
अंडरवर्ल्डच्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व नात्यांवर पाणी सोडावे लागते हा यापूर्वी अनेकांचा अनुभव आहे. दादरचा डॉन अमर नाईक याच्या आईचे ९० च्या दशकात पुण्यात निधन झाले. पण पोलिसांच्या व प्रतिस्पर्ध्यांच्या भीतीने अमर अंत्यविधीला जाऊ शकला नव्हता. आई आणि वडिलांच्याही अंत्यसंस्कारांना दाऊद इब्राहिम उपस्थित राहू शकला नाही. तसेच काही वर्षांपूर्वी मुंबईत निधन पावलेल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांना छोटा शकील येऊ शकला नाही.गुन्हेगारी क्षेत्रातील या नियमाची जणु काही पुनरावृत्तीच राजनच्या रूपाने झाली अशी अंडरवर्ल्डमध्ये चर्चा आहे.

प्रभू...
- - - -

''साहेब, मी प्रभू''
''हां ...बोला''
''एक प्रकरण आहे''
''कसलं''?
''एक खून झालाय. त्याची माहिती द्यायचीय''
''कुणाचा खून?''
''माझाच खून झालाय . . ''
हे ऐकून मी खूर्चीतून पडायचाच बाकी होतो. क्राईम रिपोर्टींगच्या गेल्या बावीस वर्षांमध्ये अनेक प्रकरणे जवळून पाहिली. काही उकरून काढली. खूप निराळ्या माणसांनी महत्वाच्या ख़बरा दिल्या. पण स्वत:चाच खून झालाय हे सांगत आलेला प्रभू पहिलाच ठरला. माझ्या चर्येवरील अस्वस्थता पाहत
प्रभू शांतपणे शेजारी बसला होता.
मी पुन्हा विचारलं ''कुणाचा खून?''
''अहो माझाच्‌..पण गेल्या जन्मात झालायं. मी तपास लावलाय बराच. निम्मी केस उलगडलीय. उरलेली सोडवायला मदत करा प्लीझ...''
प्रभूचे बोलणे, देहबोली, यातून नेमकं रसायन काय आहे,हे लक्षात आलं होतंच. तरीही उत्सुकता होतीच. सक्रीय पत्रकार आणि त्यातही क्राईम रिपोर्टर असला की माणसं अभ्यासायची सवय जडते अनेकदा. मग पहिल्या मिनिटात समोरच्या माणसाचा अंदाज येतो.(अर्थात जवळच्या कित्येक माणसांच्या त-हेवाईकपणाचा मात्र अद्याप अर्थ् लागलेला नाही. असो.) प्रभूची मानसिक स्थिती विमनस्क असणार हे त्याच्या भिरभिरत्या नजरेवरूनच लक्षात आले होते. पण माझा पुनर्जन्म झालाय या त्याच्या वाक्यामुळे एकंदर प्रकरणाबाबत मला उत्सुकता निर्माण झाली होती. मी जरा तपशील जाणून घ्यायचा प्रयत्न् केला. हा प्रभू मूळचा भंडारा जिल्ह्यातला रहिवासी. एका व्यक्तीचा चारजण खून करतात असे दृश्य त्याला डोळ्यासमोर दिसायचे. ही व्यक्ती म्हणजे गतजन्मातील तोच आहे असे त्याला वाटते. खून झालेले गाव समजायचे. काही व्यक्ती दिसायच्या. त्यामुळे किशोरावस्थेपासूनच ते गाव आणि त्या व्यक्तींच्या शोधार्थ् बाहेर तो बाहेर पडला. पुण्याजवळच्या मोशीत हा प्रकार घडला असल्याचा त्यांचा दावा आहे.
पंधरा-वीस मिनिटे संवाद झाल्यावर प्रभू फारच असंबद्ध् बोलायला लागला. 25 वर्षे तो मेंटल हॉस्पिटलमध्ये दाख़ल होता, हे त्याने जाताना सांगितले आणि प्रभूचे प्रकरण मी मनातून कायमचे पुसून टाकले. पण, सर माझा मर्डर झालाय...हे त्याचे वाक्य आठवले की आजही प्रभूची ती अजिजीने बोलणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते.. . 
दुनियादारी.....
-  -  -  -  -  -  -
. . .
अखेर धाडस करून काल दुनियादारी पाहिला. धाडस करून म्हणायचे कारण म्हणजे दुनियादारीची पारायणे करणा-या पिढीचा मी एक सदस्य आहे. पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये शिकत असतानाच सुहास शिरवळकरांची अर्थातच सुशिंची          '' दुनियादारी'' कादंबरी हाती पडली आणि पुढे जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या कादंबरीतील अनेक पात्रे आम्ही पाहिलीत, प्रसंग अनुभवलेत. अद्यापही एखाद्या शिरीनची, डीएसपीची, अशक्याची भेट होत असते. या कादंबरीतील उत्कटता, भावनिक प्रसंग ख़ास करून श्रेयस-शिरीनचा धुक्यातील भेटीचा तरल प्रसंग, साईनाथच्या संघर्षाचा थरार, कॉलेजमध्ये वट असलेला पण प्रेयसीचे लग्न झाल्याने कोलमडून गेलेला डीएसपी, श्रेयसच्या आईच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेला श्रेयस आणि चटका लावणारा त्यांचा मृत्यू हे आणि कित्येक प्रसंग कायमचे मनावर कोरले गेलेत. ही सशक्त कलाकृती चित्रपटाच्या माध्यमात बसू शकणार नाही हे मत काल चित्रपट पाहिल्यावर अधोरेखित झालं. केवळ एक चित्रपट म्हणून '' दुनियादारी'' बरा आहे. पण मूळ कादंबरीच्या तुलनेत चित्रपट जमलाच नाही. कोणतीही कलाकृती मग ती चित्रपट, नाटक, कथा,कादंबरी काहीही असो हे ज्या त्या फॉर्ममध्येच फिट्ट बसतात. त्याला फारच कमी अपवाद आहेत.('' गॉडफादर'' हा सणसणीत अपवाद आहे हे मान्यच्‌) शोले,शराबी,आराधना, दीवार अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांवर कादंब-या काय कपाळ लिहिणार?? वपुंच्या '' पार्टनर'' वर नाटकही आलं आणि मध्यंतरी चित्रपटही..पण, मूळ कादंबरीची सर दोन्हींना आली का??? '' दुनियादारी '' हे सप्तरंगीच नव्हे तर या दुनियेतील तमाम रंगांनी सजलेलं बहारदार इंद्रधनुष्य आहे.चित्रपट कादंबरीशी सुसंगत बनला नाही ही त्या दिग्दर्शकाची आजिबात चूक नाही. केवळ एका चित्रपटात बसणारी ही कादंबरीच नाही. तिच्यातील निरनिराळे रंग चिमटीत पकडणे सहजसाध्य बाब नाही. त्यामुळे ती कादंबरीच्याच रसरशीत रुपात राहीली असती, तर ते अधिक उचित झाले असते. त्यातच दिग्दर्शकाने त्यात केलेले कित्येक बदलही आक्षेपार्ह वाटले. उदा. कादंबरीतील रांगडा व्हिलन साईनाथ हा चित्रपटात चक्क तृतीयपंथी का दाखवला? हेच समजत नाही. एसके चा मृत्यू चटका लावणारा वाटत नाही. कादंबरीतील शिरीन उच्चवर्गिय पण शालीन आहे. चित्रपटातील शिरीन नव्या पिढीच्या भाषेत ''आंटी'' वाटते.कादंबरीतील शिरीन व श्रेयस ही दोन्ही मुख्य पात्रेच चित्रपटात फसली व कलाकारांचीही निवड चुकली हेच या चित्रपटाचे मोठे अपयश असावे. नाही म्हणायला अंकुश चौधरीचा डीएसपी भाव खाऊन जातो. ('' दुनियादारी'' या कादंबरीपोटी असलेल्या अतिव प्रेमाने माझे हे वैयक्तिक मत मांडले आहे. सुशींची '' मधुचंद्र'' कादंबरी यश चोप्रांच्या हाती पडली असती तर एक नितांत सुंदर चित्रपट हिंदी चित्रसृष्टीत जमा झाला असता.)
पोलीस दलातील ‘‘ विश्वास ‘‘
=   =  =   =   =   =   =  =  =

जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहायचंय...!
ज्या शत्रुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवायचयं..!
कोणालाही सहन होत नाही असं दु:ख मला सहन करायचयं...!
ज्या ठिकाणी धाडसी माणूस जाण्यास साहस करत नाही
त्या ठिकाणी मला जाऊन धावायचयं...!
ज्या वेळी माझे बाहू थकलेत
पाय थकलेत, हात थकलेत,
शरीर थकलय, त्या वेळेस मला,
समोर ‘ एव्हरेस्ट ‘ दिसतोय
त्या वेळी मला माझे
एक एक पाऊल त्या ‘ एव्हरेस्ट ‘ च्या दिशेने टाकायचंय...!
तो ‘ स्टार ‘ मला गाठायचायं
मला सत्यासाठी झगडायचंय
त्यासाठी संर्घष करायचाय..
कोणताही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही
थांबा घ्यायचा नाही...!
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण ‘ स्वर्गीय ‘
असलं पाहिजे...!
राज्याच्या पोलीस ख़ात्यातील धडाकेबाज व्यक्तिमत्व म्हणून ओळख़ल्या जाणाºया विश्वास नांगरे पाटील यांचे हे विचार आहेत. ‘आयपीएस‘च्या परीक्षेंतर्गत ‘‘ तुम इस दुनियामे क्यों आये हो?‘‘असा प्रश्न मुलाख़तकर्त्याने विचारला आणि त्याला पाटील यांनी या कवितेच्या माध्यमातून उत्तर दिले. मुलाख़तकाराने मन:पूर्वक दाद दिली नसती तरच नवल. या कवितेचा मोठा प्रभाव नांगरे पाटील यांच्यावर आहे हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते. कामातून अधोरेखित होेते. मुंबईवरील हल्ल्याप्रसंगी केवळ एक पिस्तुल घेऊन नांगरे-पाटील दहशतवाद्यांशी दोन हात करायला निधड्या छातीने ताज ह्ॉटेलमध्ये घुसले होते. त्यांच्या या कामगिरीची दख़ल घेऊन त्यांना राष्टÑपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात शेकडो पोलीस अधिकारी आहेत. त्यामध्ये मराठी टक्का तुलनेत कमी असला, तरी मराठी अधिकारी चमकदार कामगिरी करताना दिसतात. त्यामध्येच नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. ग्रामीण-नागरी सर्व ठिकाणी काम करताना नांगरे-पाटील यांनी धडाकेबाज कामगिरी करून अमीट ठसा उमटवला. सध्या मुंबईत अतिरीक्त पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले नांगरे-पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील कोकरूड गावचे. मुंबईवर  पाच वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रसंगी निधड्या छातीने ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेल्या नांगरे पाटील यांची पोलीस दलातील  कारकिर्दशैक्षणिक कारकिर्दीप्रमाणेच झळाळती ठरली. मुंबईवरील हल्ल्यात सर्वात प्रथम पोचून दहशतवाद्यांचा ख़ात्मा होईपर्यंतच्या अ़ख़ेरच्या क्षणापर्यंत ते लढत होते. सीसी टीव्ही कॅमेºयाच्यामाध्यमातून नियंत्रण कक्षाला दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याची माहिती वरिष्ठांना देत होते. पोलीस व कमां़डोंना त्यांची मदत मोलाची ठरली.
नांगरे-पाटील यांनी पुणे, नगर, ठाणे येथेही कामाची अमीट मोहोर उमटवली.  पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी  सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून शेकडो तरुण-तरुणींना अटक केली होती. त्यांच्या या कामगिरीची देशपातळीवर चर्चा झाली. नगरमधील अवैध धंद्यांना त्यांनी आळा घातला. सगळे बार,पान टपºया रात्री नऊलाच बंद करून कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती निर्माण केली. महिलांना सुरक्षिततेची हमी दिली. साध्या वेषात जाऊन अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करण्याच्या त्यांच्या धडाकेबाज पद्धतीमुळे आणि राजकीय दबाव झुगारण्याच्या वृत्तीमुळे ते तरुणाईच्या गळयातील ताईत बनले. मुंबईत कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ त्यांनी हस्तगत केले. राज्यभरातील कित्येक विद्यार्थी त्यांचे व्याख़्यान ऐकायला उत्सुक असतात. नगर, पुणे,आणि ठाणे येथेही चमकदार कामगिरी करीत त्यांनी त्यांच्यावर असलेल्या कवितेचा प्रभाव दाख़वून दिला आहे. 
बा दाऊदा... म्या पामराला क्षमा कर...
=========================
अरे उगाच तुला समजत होतो की तू खूप मोठा डॉन आहे. देश-विदेशात तुझे भलेमोठे साम्राज्य आहे. बॉलीवूडपासून क्रिकेटपर्यंत आणि शेअर बाजारापासून अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत '' तू कहे तो हां , तू कहे तो ना.'' घडते असा उगाचच गैरसमज झाला होता. मुंबापुरीतील रस्त्यांवर तर तू रक्ताचे सडे सांडलेस आणि परदेशांमध्येही एका फोनवर तू गेमा वाजवतोस हा उगाच आमचा भाबडा समज. मागे तर काय म्हणे तू बॉंबस्फोट घडवलेस. भल्याभल्यांच्या विकेटी काढल्या. मध्यंतरी चक्क नोटाही छापायला लागला होता म्हणे तू..असंही ऐकलयं की आलम दुनियेतील सगळ्या प्रमुख़ देशांमध्ये तुझी अब्जावधी रुपयांची मालमत्ता आहे.साले, हे मिडीयावाले काहीही लिहितात बुवा. तुझ्याबाबतचं वाचून-ऐकून मला तर वाटायचं तुझ्याकडे देशविदेशातील शेकडो शूटर्सची फळी असेल. निरनिराळ्या देशांतील चित्र्-विचित्र दिसणा-या माफीयांशी तुझी सलगी असेल..काय काय समज झाले होते देवजाणे...बर झालं एकता ताई भेटली. ती म्हणाली थांब आता पिक्चरच काढते त्याच्यावर, म्हणजे पब्लिकला समजेल कसला टुकार भाई आहे तो. आणि खरचं पठ्ठीनं काढला की पिच्चर. ''Once Upon A(y) Time..Dobaraa''.खरंच सांगतो भाई, ताईंचा फोटो लाव आता घरात. पब्लिकला पिच्चर बघून समजलं की आपण समजतो तसा तू काही डेंजर भाई नाही आणि कसले आलेत घंट्‌य़ाचे शूटर्स. एक ढेरपोटा म्हातारा आणि दोन गल्लीतले मवाली एवढीच तुझी आर्मी? खरंच लाज वाटली बघून.आन्‌ म्हणं तू डॉन. अरे आमच्या गल्लीतल्या भाईच्या आजुबाजूला तरी किमान पाच-पन्नास पोरं असतात. तू कसला आलाय डॉन! स्वत:च मारामारी करणारा? आरं आमच्या तुक्यादादानं नुस्ता हात जरी वर केला तरी एकजण मोबाईल घेऊन, दुसरा गाडी सुरू करून, तिसरा घोडा घेऊन सज्ज थांबतात. पोरांना पाठवून आख्ख्या पुण्यातल्या कुणालाही कसंही उचलून आनत्यात. आन तू तर काय बाबा भर रस्त्यावर स्वत: ढिश्यांव ढिश्यांव काय करतो! या बिल्डींगवरून त्या बिल्डींगवर उड्या काय मारतो. अरूण गवळी, अमर नाईक, छोटा राजन अशा एकाहून एक खत्री लोकांशी तुझी खुन्नस होती असं ऐकलं, वाचलं होतं. पन एकता ताईंनं एकाच पिच्चरमध्ये तसं कायचं नसल्याच दाखावलं. काय तर तुझी आन तुझ्याच एका दोस्ताची हानामारी. आणि कारन काय तर दोघांची छावी एकच. बाकी ना तू कधी कुनाच्या थोतरीत लावली ना कुनी तुझ्या. ना तू कधी कुठले काळे धंदे केले ना तुझ्या दोस्तांनी. गॅंग म्हणताच येत नाय ना..चौघांची कुठं गॅंग असती का? अन काय भाय, छावी बी शोधून शोधली? लाज वाटली तिला बघून..काय त्यो अक्षयकुमार. असल थोर नट. पन जरा बच्चनचा ''अग्निपथ'', अजयचा ''कंपनी'', विनोद खन्नाचा ''दयावान'' नायतर गेलाबाजार रणदिप हुडाचा ''डी'' जरा नजरेखालनं घातला आसता तर बिघाडलं आसतं का? दरखेपेला उगा उसन्या आवाजानं बोलायचंऽऽऽअशी बोलबच्चन करून आन मिशा चिकटवून काय कुनी डॉन होतं काय राव? त्यापेक्षा गनपत पाटलांन झ्याक काम केलं आसतं की..काय झालं. . थेटरात काय चाललंय तेचं कळंना झालं होतं बाबा..पन असू दे. . असू दे. . .तुजी इमेज आमच्या नजरेतनं सुदारली हे काय कमी का काय देवा? आन हा..डोळ्याला लय त्रास होतो म्हणून तू रात्रीबी काळा गॉगॉगक घालतो हे बी समाजलं पिच्चरमुळं. तर जरा कालजी घे डोळ्याची. ( ता.क. : - इमेज बिल्डींगसाठी तुमीच ताईंना पिच्चरची सुपारी दिल्ती अशी चर्चा हाय..ताईनं काम चोख् केलंय..पन तुमची ती इमेज पायला थांबतय कोन थेटर्रात? आवो पयल्या पंध-या मिनिटातच पब्लिक भायेर..डोकं शिनवायला ''दुनियादारीत''..टिक टिक वाजते डोक्यात.....)
चोर मद्या . . .
========
पत्रकारीतेमधील गेल्या 23 वर्षांत खूप निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तिंशी परिचय झाला. विशेषत: क्राईम व पोलिटीकल रिपोर्टींग करताना निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तिंना जवळून पाहता आले. निरखता आले. अभ्यासता आले. त्यापैकी काही कायमचे मित्र बनले . शरद पवारांपासून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यापर्यंत, अण्णा हजारे, बाबा आढाव यांच्यापासून ते अनिल अवचट,कुमार सप्तर्षींपर्यंत कितीतरीजणांच्या मुलाखती घ्यायची संधी मिळाली. सामान्यांना, व पोलिसांनाही सहजपणे गाठता येत नाहीत अशा अंडर्वर्ल्डमधील कितीतरी हस्ती निकटच्या परिचयाच्या झाल्या. त्या सर्वांत हा चोर मद्या हे अफलातून व्यक्तिमत्व. मधुकर मनोहर प्रभाकर या त्याच्या पूर्ण नावापासूनच याचे वेगळेपण जाणवते. महाराष्ट्रातील बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद आणि फोटो आहे. सर्वप्रकारे लिलया चो-या करण्यात हा पटाईत. पण कधीही प्रत्यक्ष चोरी करताना पकडला गेला नाही. गेल्या 20 वर्षांत त्याच्याविरुद्ध एकही केस ''नोंदली' गेली नाही. (याचा अर्थ असा नाही की तो सक्रीय नाही.) पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, बडोदा येथील अनेक धनदांडग्यांना त्याने 'हाथ की सफाई' दाखवली आहे. एवढेच नव्हे, तर हिंदी अभिनेत्री नर्गिस हिच्या घरातून त्याने हि-याची अंगठी पळवली होती. ती घ्यायला सुनील दत्त याच्या पुण्यातील घरी आला होता. पण चोरलेली वस्तू मी कधी परत करत नाही पण माझ्या घरातील कोणतीही वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता असे त्याने सांगितले होते अशी वदंता आहे. पुण्यात त्याची चार मजली भव्य इमारत, दुमजली हॉटेल आणि कोरेगाव पार्कसारख्या पॉश एरियात बंगला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व केसेसमधून तो निर्दोष सुटला. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले पाच किलो सोने त्याला परत द्यायचा आदेश न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिला. एक दिवंगत गृहराज्यमंत्री मद्याचे सख्खे मावसबंधू आहेत. चोर मद्या या नावाने परीचित असलेला मद्या दहा वर्षांपूर्वी फक्त 54 मतांनी माजी महापौरांविरोधात महापालिकेची निवडणूक हरला. अनेक पोलीस मद्यामुळे गबर झालेत. कित्येकदा त्यांना हफ्ते देण्यासाठीच त्याचा चो-या कराव्या लागतात हे दुर्दैव. त्याचे घर, मुख्य दरवाजा, त्याला आतून असलेल्या 13 निरनिराळ्या प्रकारच्या कड्या हे सारे काही अतर्क्य आहे. मी 20 वर्षांपासून त्याल चांगला ओळखतो. तो काल शिवाजीनगर एरियात असल्याचे समजल्यावर त्याला आफीसला बोलवून घेतले. तुम्हालाही चोरमद्या पहायला मिळावा या उद्देशाने एक फोटोही क्लिक केला
च्यायला...कधी काय होईल...कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल....कधी कोण कोणत्या रुपात भेटेल काही सांगता येत नाही,,, मगाचाच एक प्रसंग... मनात घर करून बसला..ताजला प्रेस कॉन्फरन्सला गेलो होतो. तिथं बरेच जुने मित्र भेटले. नेहमीप्रमाचे पीसी संपल्यावर चहा प्यायला बाहेर टपरीवर आलो.गप्पा टप्पा सुरू झाल्या. एक-दोन कॉलेजचे मित्रही भेटले तिथं...गप्पांना रंग चढला ..अन तितक्यात ''तो'' तिथं आला. त्याला कुठंतरी पाह्यल्यासारखं जाणवलं .पण काही केल्या लक्षातच येईना..मग त्याच्या खादीच्या शर्टवरून तर्क बांधला. एक-दोघांना विचारलं.. हा राकेशच आहे का? म्हणून..त्यांनीही अंदाजाने हो म्हणून सांगितलं..एकाने पूर्ण खात्री दिली...मग जाताना त्याचंच लक्ष गेलं आणि पूर्वीच्याच आपलेपणानं तो जवळ आला. ख्याली-कुशल विचारलं..गप्पा टप्पा चालल्या असल्या तरी तो नजर चुकवतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि ते साहजिकच होतं. कारण पाच वर्षांपूर्वी पूर्ण सावळ्या रंगाचा असलेला राकेश आता कोडाने पूर्ण पांढरा झाला होता...धक्काच बसला त्याला तसे पाहून..नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी त्याच्या गालावरची त्वचा थोडी भुरकट झाली असल्याचं आठवलं. पण, पाच वर्षांत एवढा बदल?? वैद्यक क्षेत्र एवढं प्रगत झालयं तरी कोडासारख्या त्वचारोगाला काही औषध अजून कसं सापडलं नाही? मग कॅन्सरसारख्या दुर्धर विकारावर कधी औषध सापडणार? कोड झालेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास हरवतो. त्यांच्यासाठी काही सपोर्ट ग्रुप समाजात सुरू झाले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मंडळींच्या पुढच्या पिढीची स्थिती अडचणीची होते. हा वांशिक विकार आहे या समजुतीने त्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचे प्रॉब्लेम होतात. अलिकडच्या काळात आपल्याकडे सर्वच बाबतीत सतर्कता निर्माण झाल्याचे चित्र आहे. या मुलांच्या विवाहासाठी निरनिराळ्या संस्थांनी, समाजघटकांनी पुढं आलं पाहिजे. राकेशने काही खंत व्याक्त केली नव्हती..पण त्याचचीनजर बरंच काही बोलून गेली....
तब्बल 23 वर्षांनी भेट :-
- - - - - - - - - -- - - 
नागेश दिघे...माझा एसपी कॉलेजचा मित्र...तो नेमका कोणत्या वर्गात होता हे माहिती नाही..म्हणजे मलाच माझा नेमका वर्ग माहित नाही हे अधिक खरं..आम्ही कट्ट्यावर नेहमीच बरोबर असायचो..कोथरूडला राहणा--या नागेशने काही वैयक्तिक कारणांमुळे पुणं सोडलं...आमच्या संपर्काच्या कक्षेतूनही तो बाहेर गेला. तो जेजुरीला स्थायिक झाल्याचं मध्यंतरी समजलं..अखेर गेल्या आठवड्यात त्याला जेजुरीत गाठलं. तब्बल 23 वर्षांनी भेटलो आम्ही..मधल्या काळात ब-याच निरनिराळ्या घडामोडी आमच्या दोघांच्याही आयुष्यात घडल्यात. त्यातल्या चांगल्या बाबींची देवाणघेवाण करून आणि यापुढे कायम संपर्कात राहण्याचं वचन घेऊन मी नागेशचा अर्थात जेजुरीकरांच्या दिघेसरांचा निरोप घेतला . . .. .