Monday, 25 August 2014

पवनचक्क्यांनी घडू शकते 'माळीण'
- - - - - - - - - - - -- - - - - - - - - - 
माधवराव गाडगीळ ....अवघं जीवन पर्यावरणाच्या जतनासाठी व संवर्धनासाठी अवघं आयुष्य झोकून दिलेलं एक ऋषितल्य व्यक्तिमत्व..पर्यावरणाची जपणूक हाच त्यांचा ध्यास. अफाट अभ्यास...गाढा व्यासंग....देशभर त्यांची भ्रमंती सुरूच असते....पर्यावरण चळवळीसाठी मग तो उजनीतील असो वा केरळमधील, भीमाशंकरच्या एनेरॉल असो वा गोव्यातील कॅसिनो ....ते वयाच्या 72 व्या वर्षी तितक्याच जोमाने आंदोलनात उतरतात... देशभरातील तळागाळातील माणसांशी, कार्यकर्त्यांशी दाट संपर्क. पर्यावरणविषयक कोणतीही घटना त्यांच्या नजरेतून सुटत नाही...आणि त्याची तड लावण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात..
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाच्या पश्चिम घाटाच्या सर्वंकष अभ्यासासाठी समितीचे ते अध्यक्ष होते. .. त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक अहवाल शासनाला सादर केला आणि त्यातील शिफारसी वाचूनच राजकीय नेते गडबडले...सा-यांनीच एकमताने अहवाल फेटाळला...कारण सारेच हमाम मे नंगे ना? गाडगीळ साहेबांनी त्या अहवालात सॉलीड सालटं काढलीत एकेकाची... खाणींनी कशी हानी होते...केमिकल फॅक्ट-यांनी कसा निसर्गाचा -हास होतोय..जलाशयातील...नदींतील...समुद्रातील कशी नष्ट होत चाललीय..आणि हे सारे उद्योग कुणाचे आहेत...सारा सारा तपशील त्यांनी दिलाय...त्यांच्या या सा-या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेबाबत गाडगीळ त्यांच्याशी महत्वाचं होतं.. गेले आठवडाभर त्यांना भेटण्यासाठी खटपट करीत होतो..अखेर काल संधी मिळाली.

सकाळी त्यांच्याशी फोन झाला. त्यांनी येण्याची नेमकी वेळ सांगितली..घराचा सविस्तर पत्ता दिला..यापूर्वी त्यांना कधी भेटलो नव्हतो...व्यासंगी व्यक्तींना भेटताना मला कायम धाकधूक वाटते...कारण, ही मंडळी खूप मूडी असतात...जमलं तर ठिक...नाही तर बो-याच वाजतो आपला.... दिलेल्या वेळेला मी बरोब्बर त्यांच्या सोसायटीत दाखल झालो....दाराची बेल वाजवली...तेच गच्चीवरून आले...म्हणाले इकडूनच या....मस्त उंची..शिडशिडीत पण काटक बांधा....अंगात खादीचा स्वच्छ झब्बा आणि लेंगा.....घरात गेलो...सारी खोली कुठल्याकुठल्या इंग्लीश-मराठी पुस्तकांनी...अहवालांनी...भरली होती...मधोमध असलेल्या मेजाभोवती दोन खुर्च्या होत्या...त्यावर त्यांची डायरी..सहज लक्ष गेलं..त्या पानांवर माझं नाव स्वच्छ अक्षरात लिहून ठेवलेलं...आघळपघळ गप्पांत वेळ न घालवता मी थेट मुद्यावर आलो...कारण वेळ मर्यादीत होता..त्यांनी क्षणभर रोखून पाहिलं...मोबाईल फोन स्वीच आफ केला..एक-दोन क्षण डोळे मिटले आणि सलग सुरू झाला माहितीचा धबधबा..

अतिशय बेदरकारपणे, बेजबाबदारपणे जेसीबीच्या सहाय्याने केले जात असलेले डोंगरांचे सपाटीकरण, त्याच पद्धतीने पवनचक्क्यांसाठी केले जात असलेले रस्ते आणि देशाच्या निरनिराळ्या भागात सुरू असलेले खाणींचे उत्खनन या तीन प्रमुख कारणांमुळे पर्यावरणाचा -हास होतोय. निसर्गाचे संतुलन ढासळतेय..त्यातून 'माळीण'सारख्या दुर्घटना घडतात. नाशिकपासून पुणे ते कोल्हापूरपर्यंतच्या डोंगररांगांवर पसरलेल्या पवनचक्कया प्रकल्पांच्या माध्यमातून नेमकी किती वीज निर्माण होते हा ख़रंतर संशोधनाचाच विषय आहे. हे प्रकल्प पर्यावणवरणाला हानीकारक तर आहेतच्; पण त्यामुळे दरड कोसळण्यासारख़्या दुर्घटना
नकीच घडू शकतात. ‘माळीण‘ सारख़्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे प्रकल्प हटवले गेले पाहिजेत. पवनचक्कयांचे प्रकल्प प्रामुख़्याने सत्ताधा-यांचे आहेत. वीज मंडळांशी हातमिळवणी करून त्यांचा ‘उद्योग‘ चालतो. एरवी वीजनिर्मितीनुसार पैसे अदा करणे अभिप्रेत असताना या क्षेत्रातील ‘सुझलॉन‘ला मात्र ‘इन्स्टॉल्ड कपॅसिटीवर‘वर पैसे देत झुकते माप दिले, असा आरोप गाडगीळ साहेबांनी केला.

हे जसे नैसर्गिक संकट आहे,ना .. तशीच ती मानवनिर्मित आपत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ‘माळीण‘ साऱख़्या दुर्घटना राज्यात अनेक ठिकाणी घडू शकतात. धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये डोंगरमाथ्यांवर अनेक पवनचक्कया प्रकल्प आहेत. पवनचक्कयांची जड पाती व अनुषंगिक साधने वर वाहून नेण्यासाठी रस्ते तयार केले जातात. हे रस्तेही अतिशय बेदरकारपणे व निष्काळजीपणाने तयार करण्यात आलेत. त्यामुळं पर्यावरण धोक्यात आलंय... काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. भीमाशंकर येथील ‘इनरकॉन ‘ या पवनउर्जा प्रकल्पाची आम्ही पाहणी केली. तेथील परीस्थिती अतिशय चिंताजनक आहे. स्थानिक नागरिकांचे हक्क डावलत केला जाणारा हा विकास नेमका कुणाच्या हिताचा आहे? निसर्गाचा संहार करून केल्या जाणा-या कामांना काय विकास म्हणतात का? मी राज्याच्या, देशाच्या निरनिराळया भागात फिरत असतो. तेथील जनतेशी बोलत असतो. लोकांना सर्व काही समजत असतं..ते भाबडे नाहीत पण; त्यांना पर्यायही सापडत नाही.....गाडगीळ तळमळीने बोलत होते

गोव्यात कॅसिनोमुळे कॅसिनोमुळे कमालीचे सागरी प्रदुषण होतेय...समुद्रातील मासे नष्ट होऊ लागलेत.. मच्छिमारांपुढे करायचे काय? हा प्रश्न आ वासून उभा आहे. तेथे नव्याने सत्तेवर आल्यावर भाजपा सरकारने कोणतेही आश्वासन पाळले नाही. कॅसिनोंवर बंदी आणणे दूरच; आणख़ी कॅसिनोंना परवानगी देऊन त्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली. त्यामुळे प्रदुषण आणख़ी वाढलंय. आपल्याकडंही उजनीच्या जलाशयातील मासेमारीही प्रदुषणामुळे धोक्यात आलीय. कोकणात रासायनिक प्रकल्पामध्ये ११ हजारजणांना रोजगार मिळाला. पण, त्या प्रकल्पामुळे वशिष्ठी नदीत झालेल्या प्रदुषणामुळे मासेमारी संपुष्टात येऊन २० हजार मच्छिमार बेरोजगार झाले.याला विकास म्हणायचा का? आम्ही त्याविरोधात निदर्शने केली.पण, सरकारने ती दडपली. प्रदुषण करणा-यांना मोकळं रान आणि निदर्शकांना अटक हा कोणता न्याय झाला? . केरळमध्ये दगडख़ाणचालकांविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यावर ख़ाण माफीयांनी हल्ला केला. त्यामध्ये अनुपकुमार या तरुणाला प्राण गमवावे लागले. केरळ सरकारने चौकशी केली असता तेथील एक हजार ६५० ख़ाणींपैकी तब्बल दिड हजार ख़ाणी बेकायदा असल्याचं दिसून आलं. स्थानिक मंडळींना सगळं काही कळत असतं...ते निवडणुकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, सरकार बदलून पाहतात. .पण राजकीय नेते आणि सरकारी बाबू ही योजना अक्षरश: लादतात अशी परीस्थिती आहे. सारे सत्ताधारी सारख़ेच. सगळेच या व्यापात गुंतले आहेत..... अर्थात असं असली तरी माझा लोकशाहीवर विश्वास आहे...माध्यमे, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनजागृती होत जाईल..कधी ना कधी परीस्थिती बदलेल हे नक्की....गाडगीळ साहेबांच्या बोलण्यात ओतप्रोत आत्मविश्वास होता..
गाडगीळ साहेबांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास प्रत्येक शब्दांतून जाणवत होता....पर्यावरणाविषयी असलेली तळमळ दिसून येत होती...निसर्गाच्या -हासामुळे होत असलेली मनाची तगमग जाणवत होती....खरंच गाडगीळ साहेबांसारखी व्यक्तिमत्व फारच विरळी.

No comments:

Post a Comment