Sunday, 14 March 2021

पुणेकरांना वाचवा..


-------------------------
पुण्यातली आरोग्य व्यवस्था दररोज ढासळते आहे. बेड उपलब्ध न होणं किंवा ऍम्ब्युलन्स न मिळणं यात आता काही नवलाई राहिली नाही. प्रत्येकी आठशे बेड्सची क्षमता असलेल्या तीन जंबो कोविद रुग्णालयांचं गेल्या आठवड्यात लोकार्पण झालं. तरीही रुग्णांमागचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चॅनेल्सवर झळकलेल्या बातम्यांचा ओघ पाहता व्यवस्था जागेवर येईल असं वाटलं होतं.
पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं आज निधन झालं. कधीकाळी पुण्याचे प्रथम नागरिक असलेले एकबोटे यांनाही वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत ही आरोग्य यंत्रणेची शोकांतिका आहे. त्यांच्यासाठी तर उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनीही लक्ष घातलं होतं. तरीही काही होऊ शकलं नाही. एवढंच नव्हे, या माजी महापौरांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करायलाही जागा मिळायला विलंब झाला. 
 
कोरोनाच्या साथीने व्यवस्था किती मोडकळीस आलीये आणि उपलब्ध व्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकणारे अधिकारी उरले नाहीत, हे यावरून पुरेसं स्पष्ट झालंय. बरं ज्यांनी जाब विचारायचा, तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा वचक पॅकेज जर्नालिझममुळे 'तृतीयस्तंभी' झालाय, हे काल पांडुरंग रायकर यांच्या प्रकरणावरून अधोरेखित झालंय. संस्थेच्या नियमांचं पालन करण्याच्या अटीमुळे पत्रकारांना लिहायला मर्यादा आल्या आहेत. पण, आता फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स अप सारखी कितीतरी माध्यमं उपलब्ध आहेत. निराळ्या नावाने तिथं लिहिता येतं. एका कोविद सेंटरचा मुद्दा काल ऐरणीवर आला. अन्य दोन सेंटरची काय परिस्थिती आहे ? याचं स्टिंग ऑपरेशन करायला हवं. आपत्तीच्या काळात पत्रकार अंकुश ठेवतात हा इतिहास आहे
पत्रकारिता केवळ चरितार्थाचं साधन नाही. समाजातल्या विपरीत घटनांवर आणि संबंधित घटकांवर अंकुश ठेवणारी ती वृत्ती अन व्यवस्था असते. अंतस्थात माजलेल्या अन दडपल्या, चिरडल्या जाणाऱ्या कल्लोळाला वाचा फोडायचं पत्रकारांचा
कर्तव्य असतं. तो वसा, ते व्रत जपायला हवं. लेखणीतली धग धगधगत ठेवायला हवी.

 
पुण्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांना किमान वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी आता जनआंदोलन उभं रहायला हवं. गेल्या चोवीस तासात एक हजार 764 नवे रुग्ण वाढलेत. दिवसभरात 48 लोक दगावलेत या साथीत. आतापर्यंत दोन हजार 401 रुग्णांचा मृत्यू झालाय. शासकीय आकडेवारीनुसार, 885 रुग्णांची प्रकृती गंभीर आणि 530 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 15 हजारहून अधिक रुग्ण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत.
अजून किती, कशी आणि कुणाच्या भरवशावर वाट पहायची? कोरोनाचा विषाणू हटेल, न हटेल पण त्याच्या प्रतिबंधासाठी उभारल्या गेलेल्या व्यवस्थांमध्ये सुसूत्रीकरण का नसावं? सगळे अधिकारी, कर्मचारी पूर्ण शक्तीने काम करताहेत असं गृहीत धरलं तरी दरररोज नव्या त्रुटी उघड होतायेत. जागतिक आपत्तीच्या काळात आता तरी सर्वांनी झटून काम करायला हवं. केंद्र ,राज्य शासनानं अरुण भाटिया, देवव्रत मेहता, टी चंद्रशेखर, अजय मेहता अशा प्रशासनावर वचक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत बोलवून घ्यायला हवं. कठोर शिस्तीमुळे कुणालाही नको असलेल्या तुकाराम मुंडेंना किमान पुण्याच्या आरोग्य यंत्रणेच्या सुसूत्रीकरणाच्या शीर्षस्थानी बसवायला हवं. डॉ. रवी बापट, डॉ. रवीन थत्ते, डॉ. सुरेश शिंदे, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ.कपिल झिरपे, डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. डी. बी. कदम, डॉ. अविनाश भोंडवे अशा जाणत्या डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमायला हवा. स्वाईन फ्ल्यूच्या काळात परिस्थिती हाताळलेल्या डॉक्टर्स,अधिकाऱ्यांशी मसलत करायला हवी. 2009 मध्ये पुण्यात या साथीचा उद्रेक झाला, तेव्हा महापालिका आयुक्त महेश झगडे, आरोग्य प्रमुख डॉ.एस. एस. परदेशी यांनी कशी परिस्थिती हाताळली होती, हे पहायला हवं. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा.
पुण्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. दर मिनिटाला सायरनचा वाजवत धावणाऱ्या ऍम्ब्युलन्स काळजात धडकी भरवताहेत.
दुसरीकडे बंदी असलेल्या इंदुरी फटाका सायलेन्सर बसवलेल्या बाईक्स धडाधड आवाज करत बेफिकीर घटकाचे दर्शन अधोरेखित करत आहेत. प्रश्न केवळ आवाजाचा नाही. मवाल्यांच्या बाईक्सच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात पोलिसांच्या गाडीला असलेला सायरन पिपाण्यासारखा वाटतोय. कोरोनासारख्या गंभीर आपत्तीमध्ये तरी सुष्ठ ध्वनी ठळक होण्याऐवजी कर्णकटू आवाज वाढणं हे कसलं लक्षण आहे ? हा शोर ढासळत्या व्यवस्थेचं द्योतक नाही का ? बाकी काय चाललंय हे सांगायची ही वेळ नाही.
माजी सनदी अधिकाऱ्यांबरोबरच घातक घटकांवर वचक निर्माण केलेल्या
के के कश्यप, अशोक धिवरे, टीकाराम भाल, अशोक चांदगुडे, दत्ता टेमघरे, अरुण वालतुरे अशा माजी पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा बोलावून घ्यायला हवं. राम जाधव, किशोर जाधव, सतीश गोवेकर, सुनील ताकवले अशा तडफदार विद्यमान अधिकाऱ्यांच्या नेमक्या नेमणुकीचं इंजेक्शन देणं ही पुण्याची गरज आहे.
व्यवस्था म्हणजे आपला सातबारा आहे असा भ्रम असलेल्या नाकर्त्या घटकांचा आता तरी नायनाट व्हायला पाहिजे. लष्कराला पाचारण करा, किंवा आता आमच्याच हातात सूत्रं द्या असं म्हणण्याइतका जनभावनेचा उद्रेक होण्यापेक्षा शासनानेच
व्यवस्था अधिक गतिमान, कार्यक्षम करायला अधिक कडक पावलं उचलली पाहिजेत....
हे पुणं आहे.
इथं दररोज पन्नास माणसं कोरोनामुळे मरतात हा शिक्का आतातरी पुसायला पाहिजे.
माणसं जगायला पाहिजेत.

No comments:

Post a Comment