Sunday, 14 March 2021

पुणेकरांना वाचवा..


-------------------------
पुण्यातली आरोग्य व्यवस्था दररोज ढासळते आहे. बेड उपलब्ध न होणं किंवा ऍम्ब्युलन्स न मिळणं यात आता काही नवलाई राहिली नाही. प्रत्येकी आठशे बेड्सची क्षमता असलेल्या तीन जंबो कोविद रुग्णालयांचं गेल्या आठवड्यात लोकार्पण झालं. तरीही रुग्णांमागचं शुक्लकाष्ठ काही संपलेलं नाही.
पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चॅनेल्सवर झळकलेल्या बातम्यांचा ओघ पाहता व्यवस्था जागेवर येईल असं वाटलं होतं.
पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं आज निधन झालं. कधीकाळी पुण्याचे प्रथम नागरिक असलेले एकबोटे यांनाही वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत ही आरोग्य यंत्रणेची शोकांतिका आहे. त्यांच्यासाठी तर उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनीही लक्ष घातलं होतं. तरीही काही होऊ शकलं नाही. एवढंच नव्हे, या माजी महापौरांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करायलाही जागा मिळायला विलंब झाला. 
 
कोरोनाच्या साथीने व्यवस्था किती मोडकळीस आलीये आणि उपलब्ध व्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकणारे अधिकारी उरले नाहीत, हे यावरून पुरेसं स्पष्ट झालंय. बरं ज्यांनी जाब विचारायचा, तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा वचक पॅकेज जर्नालिझममुळे 'तृतीयस्तंभी' झालाय, हे काल पांडुरंग रायकर यांच्या प्रकरणावरून अधोरेखित झालंय. संस्थेच्या नियमांचं पालन करण्याच्या अटीमुळे पत्रकारांना लिहायला मर्यादा आल्या आहेत. पण, आता फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स अप सारखी कितीतरी माध्यमं उपलब्ध आहेत. निराळ्या नावाने तिथं लिहिता येतं. एका कोविद सेंटरचा मुद्दा काल ऐरणीवर आला. अन्य दोन सेंटरची काय परिस्थिती आहे ? याचं स्टिंग ऑपरेशन करायला हवं. आपत्तीच्या काळात पत्रकार अंकुश ठेवतात हा इतिहास आहे
पत्रकारिता केवळ चरितार्थाचं साधन नाही. समाजातल्या विपरीत घटनांवर आणि संबंधित घटकांवर अंकुश ठेवणारी ती वृत्ती अन व्यवस्था असते. अंतस्थात माजलेल्या अन दडपल्या, चिरडल्या जाणाऱ्या कल्लोळाला वाचा फोडायचं पत्रकारांचा
कर्तव्य असतं. तो वसा, ते व्रत जपायला हवं. लेखणीतली धग धगधगत ठेवायला हवी.

 
पुण्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांना किमान वेळेवर योग्य उपचार मिळावेत यासाठी आता जनआंदोलन उभं रहायला हवं. गेल्या चोवीस तासात एक हजार 764 नवे रुग्ण वाढलेत. दिवसभरात 48 लोक दगावलेत या साथीत. आतापर्यंत दोन हजार 401 रुग्णांचा मृत्यू झालाय. शासकीय आकडेवारीनुसार, 885 रुग्णांची प्रकृती गंभीर आणि 530 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 15 हजारहून अधिक रुग्ण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत.
अजून किती, कशी आणि कुणाच्या भरवशावर वाट पहायची? कोरोनाचा विषाणू हटेल, न हटेल पण त्याच्या प्रतिबंधासाठी उभारल्या गेलेल्या व्यवस्थांमध्ये सुसूत्रीकरण का नसावं? सगळे अधिकारी, कर्मचारी पूर्ण शक्तीने काम करताहेत असं गृहीत धरलं तरी दरररोज नव्या त्रुटी उघड होतायेत. जागतिक आपत्तीच्या काळात आता तरी सर्वांनी झटून काम करायला हवं. केंद्र ,राज्य शासनानं अरुण भाटिया, देवव्रत मेहता, टी चंद्रशेखर, अजय मेहता अशा प्रशासनावर वचक असलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत बोलवून घ्यायला हवं. कठोर शिस्तीमुळे कुणालाही नको असलेल्या तुकाराम मुंडेंना किमान पुण्याच्या आरोग्य यंत्रणेच्या सुसूत्रीकरणाच्या शीर्षस्थानी बसवायला हवं. डॉ. रवी बापट, डॉ. रवीन थत्ते, डॉ. सुरेश शिंदे, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ.कपिल झिरपे, डॉ. प्रसाद राजहंस, डॉ. डी. बी. कदम, डॉ. अविनाश भोंडवे अशा जाणत्या डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमायला हवा. स्वाईन फ्ल्यूच्या काळात परिस्थिती हाताळलेल्या डॉक्टर्स,अधिकाऱ्यांशी मसलत करायला हवी. 2009 मध्ये पुण्यात या साथीचा उद्रेक झाला, तेव्हा महापालिका आयुक्त महेश झगडे, आरोग्य प्रमुख डॉ.एस. एस. परदेशी यांनी कशी परिस्थिती हाताळली होती, हे पहायला हवं. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा.
पुण्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. दर मिनिटाला सायरनचा वाजवत धावणाऱ्या ऍम्ब्युलन्स काळजात धडकी भरवताहेत.
दुसरीकडे बंदी असलेल्या इंदुरी फटाका सायलेन्सर बसवलेल्या बाईक्स धडाधड आवाज करत बेफिकीर घटकाचे दर्शन अधोरेखित करत आहेत. प्रश्न केवळ आवाजाचा नाही. मवाल्यांच्या बाईक्सच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात पोलिसांच्या गाडीला असलेला सायरन पिपाण्यासारखा वाटतोय. कोरोनासारख्या गंभीर आपत्तीमध्ये तरी सुष्ठ ध्वनी ठळक होण्याऐवजी कर्णकटू आवाज वाढणं हे कसलं लक्षण आहे ? हा शोर ढासळत्या व्यवस्थेचं द्योतक नाही का ? बाकी काय चाललंय हे सांगायची ही वेळ नाही.
माजी सनदी अधिकाऱ्यांबरोबरच घातक घटकांवर वचक निर्माण केलेल्या
के के कश्यप, अशोक धिवरे, टीकाराम भाल, अशोक चांदगुडे, दत्ता टेमघरे, अरुण वालतुरे अशा माजी पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा बोलावून घ्यायला हवं. राम जाधव, किशोर जाधव, सतीश गोवेकर, सुनील ताकवले अशा तडफदार विद्यमान अधिकाऱ्यांच्या नेमक्या नेमणुकीचं इंजेक्शन देणं ही पुण्याची गरज आहे.
व्यवस्था म्हणजे आपला सातबारा आहे असा भ्रम असलेल्या नाकर्त्या घटकांचा आता तरी नायनाट व्हायला पाहिजे. लष्कराला पाचारण करा, किंवा आता आमच्याच हातात सूत्रं द्या असं म्हणण्याइतका जनभावनेचा उद्रेक होण्यापेक्षा शासनानेच
व्यवस्था अधिक गतिमान, कार्यक्षम करायला अधिक कडक पावलं उचलली पाहिजेत....
हे पुणं आहे.
इथं दररोज पन्नास माणसं कोरोनामुळे मरतात हा शिक्का आतातरी पुसायला पाहिजे.
माणसं जगायला पाहिजेत.

 ब्लॅक मॅजिक

------------------
मध्यंतरी येरवड्यातल्या डेक्कन कॉलेज चौकात सिग्नलजवळच्या झाडाला एक कावळा लटकलेला दिसला. तो जिवंत नाही,हे सहजपणे कळत होतं. दोऱ्याला अडकला होता, पण तरीही जरा निराळं भासलं. सिग्नल पडल्यामुळे लगेच पुढं जावं लागलं. येताना पुन्हा तिथं थांबलो. नीट निरखून बघितलं. कावळा मांज्यात,दोऱ्यात पाय अडकून लटकला नव्हता. जाणूनबुजून कुणीतरी तो लटकवला होता. साधारणतः दोऱ्यात पाय अडकून किंवा गळ्याला फास बसला की पक्षी अडकतात. पण, या कावळ्याच्या मानेच्या समोरून दोरा आरपार होता आणि घराला किंवा गाडीला काळी बाहुली अडकवावी तसं त्याला लटकवलं होतं. या मुक्या पक्ष्याचा जीव कुणी आणि का घेतला असावा याचा उलगडा काही झाला नाही. कुणीतरी विकृत माणसानं तो उद्योग केला असणार हे निश्चित.
दररोज जाताना सिग्नलजवळ तो गळफास लावलेला कावळा दिसायचा. आपण धड त्याला तिथून काढूही शकत नाही, आणि काही करूही शकत नाही, या जाणिवेनं मन अस्वस्थ व्हायचं. त्या संदर्भात अनेकांकडं चौकशी केली. सिग्नलवरच्या भिक्षेकऱ्यांशी, तिथं नेहमी फिरणाऱ्या तृतीयपंथीयांशी बोललो. सगळ्यांनी सगळं पाहिलं होतं. पण कुणीच काही सांगत नव्हतं. कुणीतरी गंदा इलम किंवा नापाक इल्लम म्हणजे ब्लॅक मॅजिक करण्यासाठी त्या मुक्या पक्ष्याचा जीव घेतला असेल असं एकदोनजण म्हणाले. मंगळावर स्वारी करायच्या प्रगत युगात अजूनही एक वर्ग अजून ब्लॅक मॅजिक, जादूटोणा असल्या भंपक कल्पनांमध्ये अडकून पडलाय हे मन विषण्ण करणारं आहे.
एक काळ ज्योतिष, भविष्य,तंत्र-मंत्र आणि तसल्या गोष्टींचं मला अपार कुतुहुल होतं. ज्योतिष क्षेत्राबद्दल बोलायचं झालं, तर दर पाच -सात वर्षांनी त्यातले ट्रेंड्स बदलत राहतात. पूर्वी फक्त पंचांग मांडून कुंडली बघायला महत्व होतं. मग हस्तसामुद्रिकाची लाट आली. पाठोपाठ अंकशास्त्र, फेस रीडर, वाचासिद्धी, कर्णपिशाच्च विद्यावाले, नाडी ज्योतिषवाले येत जात राहिले. मग मध्येच कधीतरी रमल विद्या, फेंग शुई, वास्तुशास्त्र असली फॅड आली आणि गेली. रुद्राक्षं, रत्नं, दर्ग्याचे ताईत, गंडे, उदी, पिरॅमिड, निरनिराळी यंत्रं अशा लाटा येतात आणि जातात. त्यातून तो व्यवसाय करणारे पैसे कमवतात अन् सामान्य माणसं मूर्ख बनत राहतात. यापलीकडं काही नसतं. गेल्या काही वर्षांत निरनिराळ्या भागातल्या भटकंतीमध्ये या क्षेत्रातली बरीच माणसं भेटत गेली. काही वर्षांपूर्वी लोहगाव विमानतळावर चंद्रास्वामींनाही भेटता आलं.जुने मित्र इन्स्पेक्टर विश्वासराव चौगुले तेव्हा तिथं ड्युटीवर होते. विशेष म्हणजे उशीर झालेल्या चंद्रास्वामीसाठी विमान ताटकळत ठेवण्यात आलं होतं. ही असली माणसं आणि त्यांचे अतर्क्य उद्योग पाहिल्यावर काही वेळा काही काळापुरतं मन संभ्रमित झालंही. पण हे सगळं झूट आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही.
अर्थात प्रत्येकाच्या श्रद्धा, विश्वास,भावना निरनिराळे. पण, हे नक्की की हे असले जादूटोण्याचे उद्योग सर्व स्तरात, सर्व भागात चालतात. करणारे सर्वजातीय आहेत अन फसणारेही सर्वधर्मीय आहेत. अगदी आदिवासी पाड्यांपासून, ग्रामीण,निमशहरी,शहरी सर्व भागात, झोपडपट्टयांपासून ते उंच हवेल्यांपर्यंत ब्लॅक मॅजिकचं खूळ पूर्वीपासून टिकून आहे. कुठल्यातरी भारलेल्या वस्तूमुळे आपलं बरं होऊ शकतं किंवा इतरांचं वाईट घडू शकतं यावर विश्वास ठेवणारे अनेक आहेत. त्याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा झडतात. पण, एसटी,लोकलमध्ये बंगाली बाबांच्या वशीकरण, करणीच्या जाहिराती बंद होत नाहीत. त्यांच्याकडची भक्तांची रीघही काय कमी होत नाही.
पुण्यात मागे एकदा निवडणुकीच्या आदल्या दिवशी एका उमेदवाराला एका मंत्रिकानं चार दिशांना चार गाढवं कापून टाकायचा अघोरी सल्ला दिला होता. त्याची खातरजमा केल्यावर 'सकाळ' मध्ये ती बातमी दिली होती. त्यावर मोठी चर्चाही झाली होती. त्याच वर्षी पुण्यातच् एका उमेदवारानं मंत्रिकाच्या सांगण्यावरून मतदान केंद्रांजवळच्या झाडांवर खिळे आणि बिब्बे ठोकले होते. त्याचे फोटोही आले होते पेपरमध्ये. हडपसर भागात मागे मोठ्या संख्येनं कुत्री मृतावस्थेत सापडत होती. तो ही प्रकार असल्याच् काही गोष्टीतून घडला होता अशी कुजबूज होती. काही वर्षांपूर्वी एका उद्योगपतीने मृत पत्नीला जिवंत करण्यासाठी बरेच तांत्रिक विधी केले होते. नंतर त्यानं खासगी विमानातून ते पार्थिव आंध्र प्रदेशमधल्या मांत्रिकाकडं नेलं. उद्योगपतीच्या मुलाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आईचा मृतदेह वडिलांनी पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यामुळं हे प्रकरण उघड झालं होतं.अर्थातच् त्या बाई काय जिवंत झाल्या नाहीत. खूप दिवसांनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. ती सगळी माणसं उच्चस्तरीय होती. अर्थातच, पुढं हे सारं प्रकरण खूप वरच्या पातळीवरून दाबलं गेलं.
मध्यंतरी, साहिलबाबाची एक भलतीच चर्चा होती पुण्यात. बड्या राजकीय नेत्यांमध्ये, अंडरवर्ल्डमध्ये आणि उद्योगपतींमध्ये त्याची उठबस होती. जनरली आपल्याकडे असलेले गुण, नैपुण्य,कला,धन,बळ हिरावून जाऊ नये या भीतीने बरेच कलाकार, क्रीडापटू या बुवाबाबांच्या भजनी लागतात. अंडरवर्ल्डमध्ये सर्वाना जीवाची धास्ती असते, कोर्ट केसेस असतात, त्यामुळं ही मंडळी ब्लॅक मॅजिकचा आधार घेताना दिसतात. साहिलबाबा माझ्या काही जुन्या मित्रांचा मित्र. एकंदर काय प्रकरण आहे, हे बघून यावं म्हणून एकदा त्याच्याकडे गेलो. कॅम्प भागात मोक्याच्या ठिकाणी त्याचा बंगला. तिथंच दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये त्याचा मंगळवारी अन शुक्रवारी दरबार भरायचा. तिथलं वातावरण भयचकित करणारं होतं. जवळपास पंधरा-वीस फूट उंचीची बटबटीत रंगवलेली कालिमातेची उग्र मूर्ती काळजात धडकी निर्माण करणारी होती. मारुती अन म्हसोबाच्या मूर्तीही तितक्याच भव्य अन तशाच उग्र. गर्द, चमकदार शेंदूर फासलेल्या,भेदक डोळ्याच्या त्या मूर्त्याही चटकन लक्ष वेधून घ्यायच्या. तिथंच एक कुठल्यातरी पिराची मजार होती. सगळ्या मूर्ती,मजारीला,फोटोंना मोठमोठे हार घातलेले. फोडलेली कच्ची अंडी, मांस, मद्य आणि फळांचा भोग चढवला होता. उदाधुपाच्या धुरानं वातावरण भारून गेलेलं. चपाती, हा बाबाचा नोकर. तो लायनीने लोकांना वर हॉलमध्ये सोडत होता. खास माणसं बाबाला त्याच्या निराळ्या खोलीत भेटत होती. मित्र मला त्याच्याकडे घेऊन गेला. कुणीतरी दाढीधारी,
माळाबिळा घालणारा बाबा, महाराज असेल असं आधी वाटलं होतं. पण,त्याला पाहून जरा धक्काच बसला. कारण मनात योजलेल्या प्रतिमेपेक्षा त्याचं व्यक्तिमत्व बरंच निराळं होतं. जीन्सचा शर्ट, जीन्स पॅन्ट, बोटात नवग्रहांच्या बटबटीत अंगठ्या, दोन्ही हातात सोन्याची ब्रेसलेट्स, कडी, गळ्यात सोन्याचे जाडजूड गोफ अन कानात हिऱ्याच्या कुड्या घातलेला हा बाबा माझ्या पुढ्यात उभा होता. साहिलबाबा तेव्हा जेमतेम तिशीत असावा. गप्पा मारताना निरनिराळ्या ओळखी त्यानं सांगितल्या. सगळ्या देवांची नावं, दर्ग्यांचे उल्लेख त्याच्या बोलण्यातून येत होते. मुंबई पुण्यातल्या बऱ्याच वजनदार नेत्यांशी, गँगस्टर्सशी सलगी तो बोलण्याच्या ओघात दाखवत राहिला. बहुदा समोरच्याला प्रभावित करायचा त्याचा तो फंडा असावा. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी निघालो. खाली दरवाजापर्यंत सोडायला येऊन अदब दाखवायची संधी त्यानं सोडली नाही. त्यानंतर 'चित्रलेखा'तून त्याला जाम फटकवलं. पुढेही अनेकदा आमच्या भेटी झाल्या. पण, त्या लेखाबद्दल तो कधी वावगं बोलला नाही.
त्याचकाळात दाशम हा एक तृतीयपंथीय जादूटोण्यासाठी प्रसिद्ध होता. बाबाची त्याची या धंद्यात स्पर्धा. त्यातून ते एकमेकांविरुद्ध करणी,मूठ असे बरेच उद्योग करतात असं बाबाच्या बोलण्यातून समजलं. दाशमचीही एकदा पुलगेट भागातल्या त्याच्या दरबारात भेट झाली. प्रथमदर्शनीच भयंकर उग्र दिसणारा दाशम बोलण्यातूनच समोरच्याला गार करून टाकायचा. त्याच्याही दरबारातलं वातावरण साधारण तसंच.
जादुटोणा करून आपण
कुणाचंही काहीही करू शकतो हा त्या दोघांचा विश्वास. त्यासाठी ते सांगत असलेले आणि करत असलेले उपाय अत्यंत अघोरी, अतर्क्य आणि अनाकलनीय असायचे. हा दाशमही चांगला परिचित झालेला. छान बोलायचा तो. पण, त्यांचं विश्वच् निराळं होतं. भलत्याच भ्रामक दुनियेत ते वावरायचे. अर्थात हे दोघेच फक्त असा उद्योग करायचे असं नव्हे, तर आताप्रमाणेच तेव्हाही अनेक तांत्रिक मांत्रिक ठिकठिकाणी होते. पण, हे दोघे लक्षात राहिले, ते त्यांच्या दाट परीचयामुळं.
मध्यंतरी, एकदा फलटणला निघालो होतो. कंटाळा आला म्हणून तरडगावच्या पुढं गाडी बाजूला घेऊन थांबलो. सहज पलीकडे लक्ष गेलं, तर तिथं काहीशी विचित्र गोष्ट दिसली. निरखून बघितलं तर तिथं उतारा टाकलेला. एका परडीत खेळण्यातली छोटीशी बैलगाडी, त्यात हिरवा कपडा,हिरव्या बांगड्या,खिळे, काळी बाहुली, हळद, कुंकू, बुक्का, लवंगा आणि बाळाप्रमाणे दिसणारी एक रबरी बाहुलीही. खूप विचित्र वाटणारा हा प्रकार होता. दोन महिन्यांनी त्याच रस्त्याने माळशिरसला निघालो होतो. तरडगावच्या अलीकडं रस्त्याचं काम चालू होतं. तो उतारा सहज आठवला. अंदाजाने साधारण त्या ठिकाणी पुन्हा थांबलो. कुणीतरी तो व्यवस्थित उचलून पलीकडं शेतात ठेवला होता. माणसाला अशा गोष्टींचं किती भय असतं हे लक्षात आलं. एखाद्या बाळंतिणीला, नवविवाहितेला,लहान बाळांना अपाय व्हावा असल्या विकृत विचारानं असले प्रकार ग्रामीण भागात सर्रास चालतात. अर्थात, अमावस्या, पौर्णिमेला असले प्रकार करणारे महाभाग शहरातही दिसतात.
मध्यंतरी, जव्हारनजिकच्या पाड्यावर एका भगताची भेट झाली. पंचक्रोशीतले आदिवासी त्याच्याकडं समस्या घेऊन येतात. मग तो पाटीवर तांदूळ मांडून काहीबाही बघतो. भस्म,ताईत मंतरुन देतो. सुलट्या, उलट्या पिसाची कोंबडी मारायचे उपाय सांगतो. त्याच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्याच्या घरातली झोपाळ्यावर बसलेली हिरवट डोळ्यांची खाष्ट म्हातारी जाम लक्षात राहिली.
कुणी,कुणावर श्रद्धा ठेवायची, कशावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा.
काळी जादु हे थोतांड आहे,याबद्दल किमान माझ्या मनात तरी संदेह नाही. पण, आजच्या प्रगत युगातही हे सगळं किती वेगानं खालपर्यंत झिरपत चाललंय हे भयानक आहे. व्यवसायामुळं, वृत्तीमुळं माझी बरीच भटकंती चालते. कुतूहलापोटी बहुतेक सर्व क्षेत्रातल्या मंडळींशी संबंध येतो. परिचय होतो, काही मित्र होतात, काहींशी दुरून का होईना संपर्क टिकून राहतो. वैयक्तिक काही अगम्य प्रश्न पडले, की त्या त्या क्षेत्रातल्या मंडळींकडं त्याबाबत विचारत राहतो. सामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असलेल्या, अर्थातच भ्रामक विश्वात विशिष्ठ घटनेबद्दल काय माहिती आहे, काय चर्चा चाललीय हे उमजत जातं. घडीभर टाईमपास होतो. गेला महिनाभर झाडावर लटकलेला कावळा मनात घर करून बसला होता. त्याबाबत मिळालेली माहिती समाधान करणारी नव्हती. मग, एकदा दाशमकडे निघालो. चिमण्या कावळ्याचे बळी द्यायचा तोडगा नेमका कुठल्या समस्येवर आहे ? कोण असलं उद्योग करतं हे जाणून घ्यायचं होतं. कॅम्पमधून जाताना साहिल बाबा आठवला. त्याच्याकडं गाडी वळवली. तिथं एरवी बंगल्याजवळ कोपऱ्यात चपाती उभा असायचा. तिथं गाडी उभी केली. कुणीतरी उभं होतंच्. जवळ गेल्यावर लक्षात आलं, की तो चपाती नाही;तर साहिलबाबा आहे. बऱ्यापैकी त्याची रया गेली होती. त्यानं एका झटक्यात मला ओळखलं. कॉफी मागवली. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग म्हटला 'अब सब काम बंद किया मैने। पिछे कुछ बिना वजह तकलीफ उठानी पडी। अपना तो कुछ है ही नही वैसा। बँकॉक मे हॉटेल ले लिया हैं पार्टनर्शीप मे। उसमे से चलता हैं सब। बाकी वो दाशम भी मर गया बीच मे.....।'
बाबाचं बोलणं ऐकून मेंदूला झिणझिण्या येत होत्या. एखादा मांत्रिक जादूटोण्यातुन कोट्यवधी रुपये जमवतो काय? विदेशात हॉटेल घेतो काय ?सगळंच चकित करून टाकणारं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर बऱ्याच बुवा बाबांची खुलेआम चाललेली दुकानं बंद झाली. बहुदा त्यामुळंच् बाबाचाही दरबार उठला असावा. मूळ प्रश्न विचारायचं राहून गेलं होतं. दाशम उरला नव्हता तर त्याच्याकडेही जायचा काही प्रश्न उरला नव्हता. घरी येऊन पडलो, तर झोप लागून गेली. रात्री बराच वेळ जोरदार हवा सुटली होती. सकाळी उरकून निघालो. डेक्कन कॉलेजच्या चौकात नेहमीप्रमाणे लक्ष गेलं. रात्रीच्या पावसात नेमकी तीच फांदी तुटून पडली होती अन कावळा काही दिसला नाही. माणसानं केलेलं पाप निसर्गानं धुवून टाकलं होतं. निष्प्राण कावळ्याला बहुदा मुक्ती मिळाली होती.

मैत्र

 मैत्र

- - -
वयाची पन्नाशी गाठत असताना अजूनही शाळेतला, पार इयत्ता पहिलीचा वर्ग जसाच्या तसा आठवतो.अश्विनीनं तेव्हापासूनची ती मैत्री निर्व्याजपणं जपलीय. नात्यातला निरागसपणा टवटवीत ठेवलाय.
तो वर्ग तसाच डोळ्यापुढं ठेवलाय. 'टप टप पडती अंगावरती फुले..' ही कविता शिकवतानाच्या जोशी बाई आणि इयत्ता चौथीचा शिवाजी मराठा शाळेतला वर्ग अजून लख्ख नजरेसमोर आहे.
कळत नव्हतं इतका लहान असल्यापासून सत्येन सावलीसारखा सोबत आहे. एसके, प्रताप, विजू आहेर, राजू चौरे, सचिन पाटील, अजय दराडे, क्रांती, माधुरी, उल्का,संजू कटारिया असे कितीतरी मित्रमैत्रिणी कॉलेजमध्ये भेटले. एसपीच्या विस्तीर्ण कॅम्पससारखंच मनही विशाल असलेल्या या मित्रांमुळं तिथल्या प्रत्येक इंचावर काही ना काही आठवणी रेंगाळल्यात. कॉलेजच्या दगडी भिंतींनाही हेवा वाटावा अशी आमच्या दुनियादारीची दास्तान आहे. प्रचंड गदगदून आल्यावर मजबूत खांदा देऊन हे दोस्त मला मोकळं करतात.
आंबिल ओढा कॉलनीतले मित्र आयुष्याचा मोठा हिस्सा आहेत. कसलीही पर्वा न करता अर्ध्या रात्रीत मदतीला धावून येणारे अनिल, पिंट्या,विक्रम, कमलेश,अजित,सतीशसारखे दोस्त सगळ्यांना मिळायला हवेत. त्यांनी जगणं बिनधास्त केलं. कॉलनीचं भक्कम पाठबळ असल्यानं कधी कुणाचं भय वाटलं नाही. प्रॉब्लेम्स फाट्यावर मारून कसं जगायचं हे तिथं नकळत शिकत गेलो.
पत्रकारितेच्या निमित्तानं समाजाच्या बहुतेक सगळ्या,चांगल्या वाईट क्षेत्रातली खूप माणसं भेटत गेली. मुकुंददादा पंडित, अण्णा थोरात, प्रताप परदेशी, उदय जगताप,अजय तायडे, बाळा जगताप ही मंडळी मित्र तर बनली; जगायचा आधारही ठरली. औषधाची गोळी देणारे डॉ. अविनाश भोंडवे, डॉ.कुमार मांढरे, डॉ.गोजीरा, डॉ. शिल्पा छान मित्र झाले, अन बंदुकीची गोळी अधिकृतपणे बाळगणारे राजेंद्र जोशी, राम जाधव, भानुप्रताप बर्गे, राजेंद्र जोशी, रेखा साळुंखे,नीलम जाधव,स्मिता जाधव, क्रांती पवार अशा मित्रांनी जगणं समृद्ध केलं.
काश्मीरचा विमलवैना सुंबली, जयपूरचे जुगल प्रजापती, माथेरानचे संतोष पवार, पाचगणीचे सुनील कांबळे, कोल्हापूरची मीना पोतदार, गोव्याचा केदार वझे, सांगलीचे गणेश जोशी अन साताऱ्याचे श्रीकांत कात्रे, मुंबईची दीप्ती, तेजल,थेट भंडाऱ्याच्या मौसमी अशा कितीतरी मंडळींशी किती जुनी मैत्री आहे याचा हिशेब लावणंच चुकीचं आहे. कितीतरी लांबून दादुस अशी निरागस साद देणाऱ्या
विरारच्या रीमाला कसं विसरू शकतो ?
अक्कलकोटला गेल्यावर खूप आपुलकीने थेट स्वामींच्या पुढ्यात उभे करणारे गणेश दिवाणजी, जव्हारसारख्या दुर्गम भागात भेटलेल्या डॉ.अनिता तसंच राजेश आणि दीपाली या तेंडुलकर दाम्पत्यामुळं तिथं कधी परकं वाटलं नाही. त्यांच्या निर्लेप मैत्रीनं तिथं जायची ओढ निर्माण झाली. त्या भागाशी कायमचे बंध जुळले.
विश्वजीत आणि कपिल हे दोघं भेटूनही आता बरीच वर्षे झालीत. दोघे उत्तम फोटोग्राफर आणि जानी दोस्त. आमच्या तिघांचाही जन्म सातारा जिल्ह्यातल्या फलटणचा. एकाच हॉस्पिटलमधल्या, एकाच
वॉर्डमधला. अर्थातच निरनिराळ्या वर्षातला. बहुदा नाळ एकाच जागेवर पुरली असणार, त्यामुळंच मैत्री इतकी गहरी झालीय.
जवळच आहे, मैत्रीही आहे; पण भेटलो नाही अशीही काही नाती आहेत. अस्सल देशमुखी थाटात आब राखून संवाद साधणाऱ्या मीनल जाधव अन् पीएसआय ते सिनियर पीआय असा ज्यांचा प्रवास पाहत आलो त्या वर्षा पाटील यांचीही मैत्री संस्मरणीय आहे. परस्परांना नेहमी पाहत आलोय, पण कधीच कसलाही संवाद नाही. अव्यक्त राहूनही त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात मैत्रीची निकोप भावना दडलीय हे ही अनेकांच्या नजरेतून जाणवतं .
नीलमशी मुलीपेक्षा मैत्रीचं नातं दाट आहे. ती खूप जवळची, घट्ट दोस्त आहे. मल्हार माणूस नाही म्हणून काय झालं ! श्वान जन्म घेतलेला तो एक गोड अन तितकाच हट्टी दोस्त आहे. बाबाजी गुरू आहेत,मार्गदर्शक आहेत; तितकेच हळव्या मनावर फुंकर घालणारे मित्रही आहेत.
हे मैत्र, ही हिरे माणकं हीच अस्सल संपत्ती. आयुष्याच्या कोंदणात या रत्नांनी शान वाढवलीय. त्यांच्यामुळं जगणं सुसह्य झालं. जगायची उमेद वाढली. लखलखीत
रत्नांइतकीच ही नाती सदासतेज चमकदार राहतील हे नक्की..

मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.