Sunday, 12 October 2014

समांतर दुनियादारी
- - - - - - - - - - - - 
रात्रीचं जेवण उरकून किशोर गॅलरीत आला. पनामा शिलगावली. शांतपणे झुरके घेत तो खाली पाहत होता. त्याच्या रागविलास आणि शेजारच्या विश्वविलास या दोन सोसायट्यांमधल्या बेचक्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून श्रमिकांची वस्ती वसली होती. एका रात्री ट्रकमधनं माणसं आली आणि पालं बांधून राहूही लागली..सोसायटीवाल्यांनी विरोध केला..मग बिल्डरची माणसंच आली सांगत...आपलेच कामगार आहेत...शेजारची साईट होईपर्यंतच राहणार आहेत..काळजी करू नका...सुरूवातीला सगळ्यांनाच जड गेलं त्यांना स्विकारणं...पण हल्ली काहीशी सवय झाली होती.

तसा त्या लोकांचा सोसायटीवाल्यांना काही त्रास नव्हता.. तरीही अनेकांना सोसायटीला खेटून असलेली ती वस्ती खुपायची..किशोर तसा कामगारांच्याच चाळीत लहानाचा मोठा झालेला... त्यामुळं त्याला काहीशी आस्थाच होती या वस्तीवाल्यांबद्दल. तिथल्या चिमुरड्यांचं खेळणं, बागडणं मस्त वाटायचं त्याला. नळावर कडाकडा चालणा-या भांडणांची गंमत वाटायची. त्यांचे सण, उत्सव जोषात साजरे करायची त-हा आणि शोकही व्यक्त करण्याची पद्धत त्याच्या मनात ठसली होती....फ्लॅट संस्कृतीत आणि चाळीच्या जीवनातला एक मूलभूत फरक त्याच्या लक्षात आला होता...लोक जरा मध्यमवर्गाची पातळी ओलांडून उच्च मध्यमवर्गिय किंवा त्यावरच्या स्तरात सरकले ना..,जनातून अभिजनात किंवा अभिजनातून महाजनात सामील झाले ना...की बहुतांश लोक आपल्या भावना व्यक्त करायला बिचकतात..भावनांचं प्रदर्शन टाळण्याचा यत्न करतात....मग तो आनंद असो वा दु:ख़..भावनांचा असा अप्रत्यक्षपणे कोंडमारा होत असतो फ्लॅट्सच्या या सिमेंटच्या भिंतींत...कॉंक्रीटच्या या जंगलात आपलीच माणसं परकी वाटू लागतात...त्यांच्यात आणि शाळेतले सवंगडी, मित्र-मैत्रिणी, नात्यागोत्यातले लोक यांच्यात एक दरी पडू लागते...मोबाईल, वॉट्सअप् आणि फेसबुकसारख्या आभासी जगात ते अधिक रममाण होऊ लागतात.... सोशल मिडिया वाईट आहे असं आजिबात नाही.. याउलट त्याचे खूप चांगले फायदे आहेत....या माध्यमामुळं किती तरी दिवस आपण शोधात असलेले मित्र अवचित गवसतात...हरत-हेची माहिती हरघडीला मिळत राहते...चार चांगले समविचारी नवे मित्र मिळतात...निरनिराळ्या विचारांच्या मित्रांशी चांगले संवाद घडतात.. मेंदुची मशागत होत राहते...विचारांना, लिखाणाला नवे विषय सापडतात...माणूस अधिक हरहुन्नरी होऊ लागतो...एकप्रकारचा आगळा आत्मविश्वास त्याच्या चेह-यावर झळाळू लागतो....पण, कुठं थांबायचं हेच कळलं नाही, तर मात्र गडबड होते...माणूस फक्त या आणि याच सोशल मिडियावर विसंबून राहू लागला, याचं व्यसन जडलं तर मानसिक संतुलन ढळू लागतं..मनाची चिडचिड होऊ लागते...विरोधी मत ऐकण्याची, वाचण्याची सहनशक्ती राहत नाही..सोशिकपणा कमी होतो...वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासारखे प्रकार घडतात...टोकाचा दुराग्रहीपणा, हेकटपणा अंगी येतो...सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय बोलतोय, काय लिहितोय..याचंही भान हळूहळू जाऊ लागतं आणि इथल्या कथित भाटांमुळं आपल्या ते लक्षातही येत नाही....कारण या दुनियेत आपण आपल्या निंदकांना प्रवेशच देत नाही...निंदकाचे घर असावे शेजारी असं संत तुकाराम महाराज का म्हणाले असतील, हे आता अधिक ठळकपणे जाणवू लागलंय....या आभासी जगातील, आभासी व्यक्तींच्या रागलोभाचे परिणाम प्रत्यक्ष जीवनावर पडणं वाईटच की...त्याची तमा न बाळगता लोक या माध्यमांच्या व्यसनातून मुक्त काही होत नाहीत..काहींना ते हेतूत: व्हायचं नसतं....त्यामुळेच, प्रसंगी घरचेदारचे पाश सोडून कित्येकजण या माध्यमांच्या आणि त्यातून संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या नित्य संपर्कात राहतात याचंच अजब वाटतं..

राकेश सांगत होता किशोरला.... बघ ना...लिनाला म्हणजे त्याच्या बहिणीला एक मुलगा, एक मुलगी आहे...मुलगा मोठा...नववी-दहावीला असेल..फेसबुक वगैरे सगळ्यात आक्टीव्ह आहे...पण झालं काय की काहीतरी घोटाळा झाला आणि लिनाला अनेक वर्षांनी पुन्हा दिवस गेले..नवरा-बायकोच्या गप्पांमधून मोठ्याला हे समजलं....डॉक्टरांनी मूल होऊ देण्याचाच सल्ला दिला..पुन्हा मुलगा झाला...आता हे अनेकांच्या आयुष्यात घडत असतंच की....पण मोठ्याला भलताच राग आला..त्याने फेसबुकच्या वॉलवर एका बाळाचं चित्र टाकून लिहिलं....आय बिकम ब्रदर...( नॉट बाय प्लानिंग...बट बाय आक्सिडंट...)...काय बोलायचं?? लिनाला आणि तिच्या नव-याला लाज आणली पोरानं....मग बदड बदड बदडला त्याला....
किशोर म्हणाला, अरे हे काहीच नाही...आमच्या खाली एक तरूण जोडपं राहतं..रणजीत आणि अनन्या...अधूनमधून कधीतरी दिसतात...पाच-सात वर्षांची ओळख पण हाय-बाय पलिकडं त्यांच्याशी फारसं बोलणं नाही..बाकी फेसबुकवर मारे बराचवेळ चॅटींग करतो माझ्याशी. प्रत्यक्ष दिसल्यावर चेहरा मख्ख....मध्यंतरी बरेच दिवस अनन्या दिसली नाही....रणजीत दिसायचा...त्याला विचारलं ..किधर हैं बहेनजी? तर म्हणाला मेरा फेसबुक स्टेटस नही देखा क्या? म्हणालो नाही...हमें लडका हुवा हैं...चेहरा मख्खच...मग जरा तपशील विचारला..आफीसला गेल्यावर पाहिलं त्याचं स्टेटस...जन्म झाला त्याच दिवशी काही तासांनी नवजात बाळाचा फोटो आणि हॅपी बर्थ डे....? अरे बाळ झालंय ना? मुलगा-मुलगी काही असो..करा ना जल्लोष.. त्याच्या जन्माचा...घाला ना मस्त धिंगाणा..वाटा पेढे-बर्फ़ी, जिलेबी..काहीही गोडधोड वाटा...अरे आमच्या चाळीत ना बाई गर्भार राहिल्यापासूनच सा-यांचं लक्ष असायचं...तिच्या बाळंतपणात अख्खी चाळ यायची मदतीला...आणि दवाखान्यातून बाळासह आलेल्या बाळंतिणीवर चाळीतल्या बायका भाकरतुकडा ओवाळून टाकायच्या...सारी चाळकरी मंडळी बाळ-बाळंतिणीची काळजी घ्यायचे...खूप जल्लोष असायचा..चाळीला लायटींग काय..स्पीकर्स काय..काय धमाल विचारू नका...
हे झालं आनंदाचं...पण दु:खाच्या प्रसंगीही वस्त्यांमध्ये असाच खरा एकोपा... ख-या रसरशीत भावना दिसायच्या...मध्यंतरी पाडळकर मावशी गेल्या आणि कुणी काही सांगायच्या आत कॉलनीतल्या वाण्याचं दुकान बंद...गिरणी बंद झाली...व्यवहार मंदावले...कामावर गेलेले चाकरमानी पुन्हा घराकडं धावले. तरूण पोरांनी अंत्यसंस्काराची तयारी केली...मावशींच्या घरात शोकाला पारावर उरला नव्हता .. चाळीवरही शोककळा पसरली होती....कितीतरी मुलाबाळांना मावशींनी अंगाखांद्यावर खेळवलं होतं....चिऊकाऊचे घास भरवले होते....मावशींच्या मुला-मुलींनी रडून रडून घर डोक्यावर घेतलं होतं..त्यांना सावरताना शेजा-यापाजा-यांच्याही डोळ्यांतलं पाणी सरत नव्हतं...चाळीतल्या एका कुटुंबाशी मावशींच्या मुलांचं मागे कधीतरी भांडण झालं होतं...त्यांच्यात अबोला होता....पण त्या दिवशी अंत्ययात्रेत त्याच कौस्तुभने मावशींना त्यांच्या मुलाच्या बरोबरीनं खांदा दिला...त्याच कुटुंबानं भात आमटी करून मावशींच्या नातलगांना भरवली...चाळीत दुपारी कुणाच्याच घरात चूल पेटली नव्हती......महिन्याभरानंतर जमदाड्यांच्या मायाला मुलगी झाली अन त्यानंतरच मावशींच्या शोकाचं सावट सरलं....
हे एक चित्र झालं.... आणि परवाचं भलतंच... प्रीतीची आई गेल्याची पोस्ट फेसबुकावर पाहिली..खूप वाईट वाटलं..अखेर,कुणाची का असेना माऊलीच ना ती....पण लगेच दोन दिवसांत प्रीतीची...हो...प्रीतीचीच पोस्ट...आई गेल्याची वेदना व्यक्त करणारी कुठल्याशा कवितेची ओळ..? अक्षरश: किव करावीशी वाटली...अरे काय लाज, शरम आहे की नाही?? आई गेलीय ना तुझी??? काही शोक, सुतक आहे की नाही?? लगेच निघाली फेसबुकवर?? शोक व्यक्त करायला?? ही तुमची पद्धत? हे संस्कार? ही संस्कृती तुमची?? जनाची नाही तर मनाची तरी काय वाटते की नाही? अरे आपले भाऊ-बहिण आहेत...काका मामा आहेत...मित्र-मैत्रिणी आहेत...मुल बाळं आहेत...रड ना बिंधास्त कुणाच्याही खांद्यावर डोकं ठेवून....रडायची लाज वाटते की खांदा भरवशाचा वाटत नाही....ख-या जगातल्या ख-या माणसांवर विश्वासच नाही? आणि काय तर माझे फेसबुकचे फ्रेंडस अमके अन तमके..माझ्या फोटोला एवढ्या लाईक मिळाल्या अन इतक्या कमेंट मिळाल्या...करायचंय काय? तुम्ही तुमच्या वास्तव जागातून बाजूला पडत चाललाय... उपयोग काय या सा-याचा? तुमचे डोळे तेजहीन झालेत..चमक गेलीये....वय झालंय...तरी आपलं मॉडेलिंग करीत असल्यासारखे फोटो टाकता..शरम नाही वाटत?? ज्या माऊलीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं...शिक्षणासाठी खस्ता खाल्या...नोकरीसाठी वणवण केली....तिच्या जाण्याच्या भावना तुम्ही अशा प्रदर्शित करता? अहो काळजाचा तुकडा नव्हे काळीजच गेलंय तुमचं.... याची तरी जाणीव झालीय का? की पूर्ण बथ्थड झाला आहात??? कठीण आहे बुवा सगळं.....दम लागला राकेशला बोलून...डोळे तांबरले होते...त्याचा संताप स्वाभाविक होता.....

राकेशचं बोलणं ऐकून किशोर अस्वस्थ झाला....दुसरी सिगारेट शिलगावत किशोर म्हणाला, '' हे बघ काय आहे ना...हे लोक समांतर जगातच अधिक जगताहेत असं वा्टू लागलय मला...तसं तर कुठल्याही भावनेचं प्रदर्शन फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मिडियावर करणं गैर नाही....पण टायमिंग महत्वाचं...म्हणजे आनंदाचा क्षण तुम्ही पुरेपूर जगा..मनसोक्त उपभोगा...मुलं बाळं झाली...त्यांचे वाढदिवस असले किंवा काहीही आनंदाचे सण ते उत्सवासारखे साजरे करा....आणि मगच सोशल मिडियावर जा...काहीच हरकत नाही...पण, त्या लेकराचा वाढदिवस आधी चांगला साजरा करा...छान केक भरवा..आधीच फेसबुकसाठी कोणता फोटो चांगला येईल हा विचार करून मग त्यानुसार वागणं मात्र आजिबात तर्कसंगत नाही....शोकाचंही तसंच आहे....मी नाही म्हणत की कोणतंही दु:ख कायमच उराशी कवटाळून धरा...पण, दु:खाचं असं जाहीर प्रदर्शन पटतं का हो मनाला...स्मशानातल्या गव-यातली धुगधुगी अजून गेली नाही अन तुम्ही फेसबुकवर त्याचं प्रदर्शन करता? खरंच पटत नाही....या समांतर जगात महत्वाच काय आहे माहितीय?...इथं आपले मित्र आपल्याला निवडता येतात....मैत्रिणी निवडीचं स्वातंत्र्य आहे...कुणाशी बोलायचं हे ठरवता येतं...एखादा आपल्या तालावर नाचत नाही म्हटल्यावर त्याला ब्लॉक करता येतं..अनफ्रेंड करता येतं....आपले फोटोंवर पिकल्या पानांच्या वाहवा मिळवून खोटं समाधान मिळवता येतं...इकडच्या तिकडच्या कविता पेरून कौतुक मिळवता येतं...भलीभली मंडळी लोचटपणे आपल्यामागं कशी येतात याचा वृथा अभिमान मिरवता येतो....लाईक्स आणि कमेंटसच्या आकडेवारीवरून आपलं स्टेटस वाढलं असल्याची भावना मनाला खोटी उभारी देते..इथं खाष्ट पती किंवा पत्नी नसते... करडी नजर ठेवणारे सासु सासरे नसतात...टोमणे मारणा-या नणंदा नसतात...त्यांच्या रुपात भेटणा-या मित्र-मैत्रिणींना अनफ्रेंड करता येतं...इथल्या आभासी जगात भेटणारे दादा, काका, मामा, ताया आणि सर्वात महत्वाचे
' डिअर्स ' यांच्यात हरवलेले कित्येक लोक ख-याखु-या आयुष्याकडं,वास्तव जगातील ख-या नात्यांकडं पाठ फिरवतात हे कटुसत्य आहे. त्यांना पतीची, पत्नीची कुरकुर नको असते..सासु-सास-यांचे मोलाचे सल्ले नको असतात...नणंदेचे टोमणे नको असतात....काका-मामा-मावश्यांचे संबंध नको असतात....ख-या आयुष्यातील त्यांना वाटत असलेल्या कथित जाचासाठी ही मंडळी या समांतर दुनियेत इतकी टोकाची वाहवत जात असावीत...त्यांची ही समांतर दुनियादारी चिंताजनक आहे हे नक्की...

गप्पा थांबल्या होत्या..खालून जोरजोरात हलगीचे, ढोलाचे ताशांचे आवाज येऊ लागले होते...किशोरने राकेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं...अरे, ती जमनाबाई होती ना म्हातारी.... ती निवर्तलीये... संध्याकाळपासूनच काही गडबड चालली होती तिथं... मग ढोल -ताशे कशाला?
त्यांच्यात पद्धत आहे....पार्थिव ढोल ताशे वाजवत नेतात.....
आणि गेल्या आठवड्यात सकाळ-सकाळी कसले आवाज येत होते?
अरे ती आपल्या सोसायटीत रखमा येते ना? मोलकरीण...तिच्या मुलीला बाळ झालं....हे लोक असाच एंजॉय करतात...दिवसभर राडा चालला होता...ढोल काय.. ताशे काय...गुलाल काय...स्पीकर काय..सा-या वस्तीला शिरापुरीचं जेवण काय ..फुल्ल कल्ला चालला होता....
किशोर विचार करीत पाहत बसला....वाजंत्री वाद्ये वाजवत होते...त्यामागून खांद्यावर तिरडी घेऊन माणसं चालली होती...त्यामागून जवळपास अख्खी वस्ती जमनाबाईला अखेरचा निरोप द्यायला निघाली होती. काही बाया तोंडात पदराचा बोळा कोंबून हमसाहमशी रडत होत्या...काहीजण खांद्यावरच्या टॉवेलचा शेव तोंडात कोंबून रडू दाबत होते.. एक बाई पदराने मर्तिकाला वारं घालत होती..काहीजण फुले ...काहीजण चिल्लर उधळत होते....अवचित पावसाची हलकी सर आली...काही बाया पुढे धावल्या....साड्यांचे पदर मर्तिकावर धरत त्या झपाझप पुढे चालू लागल्या....आकाशातून सरी अधिक जोमाने कोसळू लागल्या होत्या....आणि किशोरच्याही डोळ्यांतील सरी त्यात मिसळल्या....